अहमदनगर म्हणजे बेलाग किल्ले, सुंदर ऐतिहासिक वाडे व अनेक गढ्या असणारा जिल्हा. या नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात जामगाव या गावी महादजी शिंदे यांचा वाडा असणारा भुईकोट किल्ला आहे. याला भुईकोट म्हणण्यापेक्षा नगरकोट म्हणणे जास्त योग्य ठरेल कारण कधीकाळी संपुर्ण जामगाव या किल्ल्यात वसले होते. पुणे–अहमदनगर रस्त्यावर शिरूर गाव ओलांडले की पारनेर हे तालुक्याचे गाव गाठायचे. पारनेर-भाळवणी रस्त्यावर पारनेरपासुन १२ कि.मी.वर जामगावच्या अलीकडे हा भुईकोट किल्ला आहे. जामगाव किल्ला पारनेर- जामगाव रस्त्याला लागून असुन गावाच्या अलीकडेच किल्ल्याची आजही सुस्थितीत असणारी तटबंदी पहायला मिळते. जामगावचा भुईकोट एका टेकडीच्या आधारे बांधलेला असुन बाहेरील किल्ल्याची तटबंदी टेकडीच्या दोन बाजूंना जोडलेली आहे. जामगाव किल्ल्याचे साधारण दोन भाग पाडलेले असुन एक भाग म्हणजे गावाभोवती असणारा भुईकोट व दुसरा भाग म्हणजे राजपरीवारासाठी या भुईकोटाच्या आतच एका टोकाला टेकडावर बालेकिल्यासारखा असणारा अधिक सुरक्षीत असा बालेकिल्ला अथवा गढी. या गढीत असणारा महादजी शिंदे यांचा भव्य वाडा आजही उत्तम स्थितीत उभा आहे. या वाड्यात सध्या रयत शिक्षण संस्थेचे डी.एड कॉलेज भरत असल्याने किल्ला त्यांच्या ताब्यात आहे. किल्ल्याचा हा भाग सोडल्यास उर्वरीत भुईकोट पुर्णपणे ओसाड आहे. साधारण गोलाकार आकाराचा हा किल्ला ८७ एकरवर पसरलेला असुन किल्ल्याच्या बाहेरील तटबंदीत १९ बुरुज आणि ४ दरवाजे आहेत. किल्ल्याच्या पुर्व बाजुस टेकडी असल्याने दक्षिणेला एक,पश्चिमेस एक व उत्तरेस दोन अशी यांची रचना आहे. त्यातील ३ दरवाजे दगड लावुन बंद केलेले असून जामगाव पारनेर रस्त्यावर पश्चिमेला असलेल्या पुर्वाभिमुख दरवाजाने किल्ल्यात जाता येते. दरवाजाच्या बाजूचे दोन भक्कम बुरुज आणि तटबंदी आजही सुस्थितीत आहे. आहे. या दरवाजासमोर रस्त्याच्या पलिकडे १२ फुट उंच हनुमान मुर्ती असलेले मंदिर आहे. किल्ल्यात शिरुन सर्वप्रथम डावीकडील वाटेने पुढे गेल्यावर दगडी बांधकामातील रामाचे मंदिर व त्याच्यासमोर घुमटीवजा हनुमानाचे मंदिर पहायला मिळते. या मंदिरात राम- लक्ष्मण- सीता यांच्या मुर्ती आहेत. राममंदिरासमोर विठ्ठल रखुमाईचे मंदिर आहे.हि दोन्ही मंदिरे वापरात नसल्याने त्यांची निगा राखली जात नाही व मंदिरे अस्वच्छ आहेत. या मंदिराच्या मागच्या बाजूला काही अंतरावर किल्ल्याचे बंद केलेले दोन दरवाजे आहेत. दोन्ही मंदिरे पाहून परत वाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर जाताना वाटेत दोन्ही बाजूला अनेक वास्तूंचे चौथरे दिसतात. यात उजव्या बाजूला ३ कमानी असलेली एक इमारत दिसते तर डाव्या बाजूला एक वीटांनी बांधलेली पडकी इमारत पाहायला मिळते. येथुन समोरच काही अंतरावर दुहेरी तटबंदीत असणारा महादजी शिंदे यांचा वाडा आपले लक्ष वेधून घेतो. वाड्याला अधिक संरक्षण मिळावे यासाठी त्याला पुढील बाजूने परकोट अथवा जिभी घातलेली आहे. या वाडयाला देखील चहुबाजूने अखंड दगडी तटबंदी असुन या तटबंदीत मुख्य दरवाजाशेजारी दोन व तटबंदीमध्ये सहा असे भक्कम ८ बुरुज आणि पूर्व पश्चिम व उत्तर बाजूस ३ मोठे दरवाजे आहेत. यातील पुर्वेकडील एक दरवाजा दगडांनी बंद केलेला आहे. मुख्य दरवाजाच्या आतील दोन्ही बाजूने वरील बाजुस जाण्यासाठी जिना असुन दोन्ही बाजूस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. किल्ल्याचा दरवाजा अजूनही भक्कम स्थितीत असून या बुरुजांवर उभे राहून लांबवर नजर टाकली असता किल्ल्याची दूरवर पसरलेली तटबंदी नजरेत भरते. दरवाजातून आत गेल्यावर डाव्या बाजूला घोड्यांच्या पागा दिसतात तर समोरच पायऱ्याच्या वरील बाजुला जमिनीपासून साधारण १५ फूट उंचीवर २१० फुटर x १२० फुट आकाराचा वाडा दिसतो. हा वाडा तीनमजली व दोनचौकी असुन वाड्यासमोर उजव्या बाजूला दगडी बांधकामाची १५० फुट खोल प्रशस्त विहिर आहे. विहीरीतील पाणी खेचण्यासाठी मोटेची व्यवस्था केलेली आहे. वाड्याच्या प्रवेशद्वारावर नक्षीकाम केलेले असून शिंदे घराण्याचे राजचिन्ह कोरलेले दिसते. सुट्टीच्या दिवशी गेल्यास वाडा पूर्णपणे फिरता येतो. दरवाज्यातून आत शिरताच उजवीकडे राजदरबाराची जागा दिसते. राजदरबाराच्या चौकामधे असणाऱ्या प्रत्येक खांबावर सुबक नक्षीकाम आहे. वाड्याच्या एका कोपऱ्यात महादेवाचे लहानसे मंदिर आहे. वाड्याच्या मजल्यावर जाण्यासाठी सोप्यांमध्ये दोन्ही बाजूला जिने काढलेले आहेत. वाड्यातील महालांना रंगमहाल, मछलीमहाल, आंबेमहाल व मुदपाकखाना अशी नावे दिलेली आहेत. दोन्ही मजल्यावर लाकडात कोरीवकाम केलेल्या खांबाशिवाय फ़ारसे कोरीवकाम किंवा नक्षीकाम दिसत नाही. वाड्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याची पडझड झालेली असून तिसऱ्या मजल्यावर भिंतीमधे काही ठिकाणी कोठारे आढळतात. वाड्याच्या भिंतीतही जंग्या असुन वाड्याच्या गच्चीवरून किल्ल्याचा संपूर्ण परिसर दिसतो. वाडा पाहून विहिरीजवळच्या उत्तर दरवाजाने बाहेर पडावे व सरळ तटबंदीपर्यंत चालत जाऊन तेथून तटबंदीला वळसा घालत मुख्य प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. संपुर्ण किल्ला पाहाण्यासाठी तीन ते चार तास लागतात. किल्ला पाहाण्यासाठी शनिवार रविवार किंवा सुट्टीचा दिवस निवडावा कारण इतर दिवशी वाड्यात रयत शिक्षण संस्थेचे डी.एड कॉलेज भरत असल्याने वाडा पाहाता येत नाही. वाड्याची आता पडझड होत असुन तो सांभाळणे रयत शिक्षण संस्थेला जड जात आहे. जामगाव किल्ल्याबाहेर असलेले मध्ययुगीन चक्रधर मंदीर देखील प्रेक्षणीय असुन जामगाव किल्ल्यासोबत ते देखील पहाता येते. थोरले बाजीराव पेशव्यांचे सरदार राणोजी शिंदे यांचे महादजी हे सर्वात कर्तबगार असे पाचवे पुत्र. महादजी हे शंकराचे निस्सीम भक्त होते. उत्तरेत मराठा सत्ता स्थापन करून दिल्लीवर भगवा झेंडा फडकवणारे महादजी शिंदे हे खूप मोठे पराक्रमी योद्धे. मध्यप्रदेशातील उज्जैन येथे महादजी यांचे सर्वात जास्त काळ वास्तव्य होते आणि येथूनच जवळपास २१ वर्ष त्यांनी हिंदुस्थानचे प्रशासक म्हणून काम केले. पानिपतच्या लढाईनंतर महादजी शिंदे यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून दिली. इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा फौजांनी काही लढायांमध्ये ब्रिटिशांचा पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. १२ फेब्रुवारी १७९४ रोजी महादजी यांचे निधन झाले. महादजी यांचे वंशज जिवाजीराव शिंदे यांनी जामगावचा हा वाडा १९५५ साली रयत शिक्षण संस्थेला बक्षीस करून दिला. -----------सुरेश निंबाळकर

जामगावचा किल्ला 

जिल्हा - नगर  
श्रेणी  - सोपी   
दुर्गप्रकार - भुईकोट