महाराष्ट्र गिरीदुर्ग,जलदुर्ग,स्थलदुर्ग,वनदुर्ग अशा विविध प्रकारच्या दुर्गानी नटला आहे. यातील गिरीदुर्गात चंदन-वंदन.साल्हेर-मुल्हेर, यासारखे अनेक जोडदुर्ग आहेत पण सागरी दुर्गात केवळ एकच दुर्गजोडी आढळते ती म्हणजे जयगड-विजयगड. जयगड खाडी जेथे समुद्राला मिळते त्या ठिकाणी खाडीच्या उत्तर तीरावर विजयगड तर खाडीच्या दक्षिण तीरावर जयगड आजही इतिहासाची साक्ष देत ठामपणे उभे आहेत. जयगड खाडीमार्गे चालणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांची निर्मिती केली गेली. रत्नागिरी जिल्ह्यात असणारी हि दुर्गजोडी शास्त्री नदीच्या मुखाशी असलेल्या डोंगरउतारावर वसलेली असुन जयगड हा रत्नागिरी तालुक्यात तर विजयगड हा गुहागर तालुक्यात आहे. डोंगरी किल्ले ज्याप्रमाणे एखाद्या खिंडीने वेगळे होतात त्याप्रमाणे हे दोन्ही किल्ले शास्त्री नदीच्या पात्राने वेगळे झाले आहेत. शास्त्री नदीच्या संरक्षणासाठी व टेहळणीसाठी जयगडच्या बरोबरीचा वाटा उचलणाऱ्या विजयगडच्या वाटयाला मात्र उपेक्षाच आली आहे. जयगडचा उपदुर्ग विजयगड इतकीच याची ओळख. आजही हा किल्ला मोठया प्रमाणात अपरिचित असुन किल्ले फिरणाऱ्याच्या यादीत याचे नावच नाही. आज आपण याच विजयगडला भेट देणार आहोत. चिपळूण- तवसाळ हे अंतर ६० कि.मी असुन रत्नागिरी- तवसाळ हे अंतर ५० कि.मी आहे तर गुहागरपासून ३० कि.मी.अंतरावर तवसाळ गाव आहे. तवसाळ गावातुन तवसाळ जेट्टीकडे जाताना वाटेवरच उजवीकडे एक लहानसा घाट उतरताना विजयगडची तटबंदी व बुरुज दिसुन येतात. बऱ्याच पुस्तकात विजयगडचे वर्णन जयगडचा उपदुर्ग, लहानसा किल्ला किंवा विजयगड गढी असे असले तरी प्रत्यक्षात मात्र हा बालेकिल्ला व त्याखाली पडकोट असलेला परिपूर्ण असा किल्ला आहे. एखाद्या वास्तुकडे पुर्णपणे दुर्लक्ष केल्यास त्याची किती भयानक अवस्था होऊ शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे विजयगड किल्ला. बऱ्याच लोकांना हा किल्ला माहित नसुन सध्या गावातील लोक येथे वर्षातुन एकदा शिवजयंती निमित्ताने येत असल्याने त्यांना हा किल्ला तवसाळचा किल्ला म्हणुन परीचीत आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा किल्ला खाजगी मालकीचा असून त्याचा सुर्वे कुटुंबीयाच्या नावे सातबारा आहे. विजयगडची रचना जयगड,यशवंतगड,गोपाळगड यांच्यासारखीच असुन डोंगराच्या पठाराकडील भागात भक्कम तटबंदीचा बालेकिल्ला व समुद्राकडे उतरत जाणारी पडकोटाची तटबंदी अशी याची बांधणी आहे. रस्त्यावरून आपल्याला जो झेंडा लावलेला बुरुज दिसतो त्यावरून खाली उतरणाऱ्या तटबंदीच्या शेवटी बालेकिल्ल्याचे पुर्णपणे उध्वस्त झालेले प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वार वळणदार असुन दरवाजाच्या आत दोन्ही बाजूस पहारेकऱ्याच्या अर्धवट कोसळलेल्या देवड्या आहेत. यातील एका देवडीत दिवा लावण्यासाठी देवळी आहे. पुर्वपश्चिम पसरलेल्या या संपुर्ण गडाचे क्षेत्रफळ साधारण दोन एकर असुन बालेकिल्ल्याचा मुख्य दरवाजा पुर्वाभिमुख आहे. येथुन डाव्या बाजुने गेल्यावर गडाची उंच तटबंदी व बुरुज दिसुन येतो व पुढे या तटबंदीवर चढता येते. या वाटेवर डाव्या बाजुला एक वास्तुचा चौथरा दिसुन येतो. किल्ल्यावर अतोनात वाढलेल्या काटेरी झुडूपांमुळे आत मोकळेपणाने फिरता येत नसले तरी बालेकिल्ल्याचा हा काही भाग वाट काढत पहाता येतो परकोटात मात्र अजिबात उतरता येत नाही. कदाचित समुद्राच्या बाजुने तेथे जाता येत असावे पण आम्हाला समुद्रावर जाण्याची वाटदेखील दिसली नाही. तटबंदीवर फेरी मारताना डाव्या बाजूस एक खडकात खोदलेले टाके दिसुन येते. हे टाके पाहुन पुढे गेल्यावर खाली न उतरता बालेकिल्ल्याच्या तटबंदीवरूनच पुढे जावे लागते. या वाटेवर आता उजव्या बाजूस एका वास्तुचा चौथरा व त्यावरील भिंती दिसुन येतात. या भिंतीत पुढील बाजूस दोन व मागील बाजूस एक असे तीन दरवाजे दिसतात. या वास्तुच्या बाजुला दुसरा एक मोठा चौथरा दिसुन येतो. या फेरीत आपल्याला एकुण सहा बुरुज व दोन ठिकाणी तटावर जाणाऱ्या पायऱ्या व एका ठिकाणी पडकोटात उतरणारी वाट दिसुन येते. हे सर्व पाहुन झाल्यावर मूळ वाटेवर यावे व तेथुन रस्त्यावरून दिसणाऱ्या मोठया बुरुजावर जावे. या बुरुजावर एक बुजलेले टाके असुन हे गडावरील सर्वात उंच ठिकाण आहे. येथुन पडकोटात उतरत जाणारी तटबंदी, जयगड खाडी तसेच तिच्या पलीकडच्या काठावरील जयगड, खाडीतून ये-जा करणारी फेरीबोट इतका दूरवरचा परीसर दिसुन येतो. येथे आपली बालेकिल्ल्याची फेरी पूर्ण होते. रत्नागिरी किंवा गुहागर येथून एका दिवसात विजयगड व जयगड हे किल्ले पाहुन परत जाता येते. विजयगड किल्ल्याची सध्याची अवस्था फार बिकट आहे. पूर्वीपासुनच विजयगड किल्ल्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे तसेच झाडीमुळे तटबंदी नष्ट होत असल्याने किल्ल्याचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. गेली अनेक वर्षे येथील झाडी न काढल्याने किल्ल्याची मोठया प्रमाणात हानी झाली आहे. विस-पंचवीस वर्षांपूर्वी सुस्थितीत असलेला हा किल्ला आज अत्यंत दयनीय बनला आहे. विजयगडाची उभारणी केव्हा आणि कुणी केली याविषयी ठोस पुरावे उपलब्ध नाहीत परंतु याची बांधणी शिवपुर्वकाळात झाली. १३४७ मध्ये अब्दुल मुज्जफर अल्लाउद्दीन बहामनी यांच्या आधिपत्याखाली हा किल्ला होता. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या कालखंडात किल्ल्यावर मराठ्यांचे स्वामित्त्व राहिलं. इ.स.१६९८ला राजाराम महाराजांनी सरखेल कान्होजी आंग्रे यांना विजयगडाचे अधिकार दिले. १६९८ पासून कान्होजी आंग्रे यांच्याकडे असणारा हा किल्ला नंतर काही काळ सिद्दीकडे गेला तो १७३३ साली मे महिन्यात मराठयांच्या ताब्यात आला. कान्होजी आंग्रेचे पुत्र संभाजी आंग्रे हे बाणकोट व विजयगड सिद्दीला देऊन तह करणार ही बातमी छत्रपती शाहूंना कळल्यावर त्यांनी डिसेंबर १७३५ मध्ये संभाजी अंग्रे यांना पत्र लिहून हा तह थांबवला व विजयगड आंग्रे यांच्याकडे राहिला. सन १७५६ मध्ये नानासाहेब पेशव्यांनी तुळाजी आंग्रे यांचा पराभव करून विजयगड आपल्या ताब्यात घेतला. सन १८१८मध्ये इंग्रजांनी पेशव्यांकडून विजयगड आपल्या ताब्यात घेतला तो शेवटपर्यत इंग्रजांच्याच ताब्यात राहिला. इंग्रजांच्या राजवटीनंतर हा किल्ला सुर्वे यांच्या नावे सातबारा वर नोंदवला गेला.------------सुरेश निंबाळकर

विजयगड

जिल्हा -रत्नागिरी  
श्रेणी  - सोपी 
दुर्गप्रकार-सागरीं किल्ला