नाशिक – हरसूल रस्त्यावर नाशिक पासून ४५ कि.मी. अंतरावर वाघेरा हे घाटमाथ्यावरचं गाव आहे. या गावामागे असलेल्या धरणाच्या पलीकडे त्रिकोणी आकाराचा उत्तुंग गडमाथा लाभलेला पण आता फक्त अवशेषांच्या रूपाने शिल्लक असलेला वाघेरा किल्ला उभा आहे. नाशिक-त्रिंबक– जव्हार या प्राचीन व्यापारी मार्गावरील दमणगंगेच्या खोऱ्यातील सती घाटावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली गेली. गावात शिरल्यावर उजव्या बाजूस असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात एक मोठा वाटोळा दगड तसेच मागील बाजूस एक भलामोठा नंदी, शिवलिंग व गणेशमुर्ती दिसुन येतात. गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार वाघेरा हा प्राचीन किल्ला असुन काश्यप ऋषींची तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या किल्ल्यावर काश्यपी नदीचे उगमस्थान आहे. पुढे हि नदी गोदावरी नदीस जाऊन मिळते. सध्या असलेले वाघेरा गाव हे किल्ल्याचे पायथ्याचे गाव नसुन राजविहीर वाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव वाघेरा गावापासुन ४ कि.मी. अंतरावर आहे. पुर्वी वाघेरा गाव राजविहीर वाडीच्या वरच्या भागात असल्याचे ग्रामस्थ सांगतात. राजविहीर वाडीला राजविहीर हे नाव पडण्याबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. राजविहीर म्हणजे राजाची विहीर. वाघेरा किल्ल्यावरील राजाची माणसे या वाडीतील दगडी बांधणीच्या विहिरीतून पाणी नेत असतं म्हणून या विहिरीला राजविहीर असे नाव पडले पण आता मात्र ही विहीर पूर्णपणे नव्याने बांधलेली आहे. वाघेरा किल्ला वसलेल्या डोंगराची एक सोंड थेट राजविहीर वाडीकडे उतरलेली आहे. या सोंडेवर सुरवातीचे एक झाड वगळता सावलीसाठी एकही झाड नसल्याने व किल्ल्यावर पिण्याचे पाणी नसल्याने पुरेसे पाणी घेऊन सकाळी लवकरच किल्ल्यावर जाण्याचे नियोजन करावे. वाडीत उतरलेल्या या डोंगरसोंडेवरून गडाची माची गाठायला एक तास पुरेसा होतो. वाडीतून १५ मिनिटांच्या चढाईनंतर आपण पठारावर येउन पोहोचतो. या पठारावर पुर्वी येथे असलेल्या वाघेरा गावातील घरांचे विखुरलेले अवशेष दिसतात. वाघेरा गावचा मारूती व शिवलिंग आजही येथे उनपाऊस खात उघडयावर पडले आहेत. येथुन पाउण तासात आपण गडाखालील माचीवर येऊन पोहोचतो. पण येथवर येताना चांगलीच दमछाक होते. माचीवरून वाघेऱ्याचा उंचावलेला सुळकेवजा गडमाथा दिसतो. येथुन सपाटीवरील दहा मिनिटांच्या चालीनंतर आपण गडमाथ्याच्या सुळक्याखाली येऊन पोहोचतो. येथे पहारेकऱ्याच्या चौकीचे अवशेष असुन थोडेसे प्रस्तरारोहण करून समोर असलेल्या उंचवट्यावर चढले कि आपला उध्वस्त बुरुजावरून गडावर प्रवेश होतो. हा तटबंदीच्या आतील माचीचा भाग असुन येथे उजव्या बाजुला एक लहानसे तोंड असलेले टाके नजरेस पडते. हे टाके पुर्णपणे पाण्याने भरले असले तरी यातील पाणी पिण्यायोग्य नाही. सोबत आलेल्या वाटाड्याच्या सांगण्यानुसार या टाक्याच्या आतील बाजुस दगडी खांब आहेत पण पाणी भरल्याने ते दिसत नाहीत. त्रिकोणी आकाराचा हा गड दक्षिणोत्तर पसरलेला असुन गडाच्या माचीचा पसारा आठ एकरमध्ये सामावलेला आहे. माचीच्या उजव्या बाजुला ढासळलेली तटबंदी असुन या तटबंदीत चार बुरुज आहेत तसेच या भागात काही घडीव व कोरीव दगड पडलेले असुन एक उध्वस्त चौथरा दिसुन येतो. इथून गडमाथा गाठायला दोन वाटा आहेत. गडमाथा उजवीकडे ठेवत वळसा घालून पुढे गेल्यावर माथ्यावर चढत जाणारी घसाऱ्याची वाट आहे. या वाटेने जाताना आपल्याला तटबंदी व त्यातील बुरुज तसेच उतारावर खडकात कोरलेली पाण्याची पण सध्या मातीने भरलेली तीन टाकी पहाता येतात. हे सर्व आपल्याला माथ्यावरून उतरल्यावर देखील पहाता येते. दुसरी वाट म्हणजे कातळावरून १५-२०फुटांचं सोपं प्रस्तरारोहण करून सरळ माथ्यावर जाणे. या वाटेवर आपल्याला खडकात खोदलेला ५x५ फुट आकाराचा एक चर दिसुन येतो. या चरातील पाणी बाहेर जाण्यासाठी छिद्र कोरले आहे पण या चराचे प्रयोजन लक्षात येत नाही. माथ्यावर उघड्यावर एक शिवलिंग असुन त्यासमोर एक नंदी व भग्न गणेशमुर्ती आहे. गडाचा हा माथा समुद्रसपाटीपासून ३४१८ फूट उंचावर आहे. गडाचा हा सर्वात उंच भाग असुन येथुन माचीवर खुप मोठया प्रमाणात विखुरलेले उध्वस्त अवशेष दिसतात तसेच ब्रम्हगिरी, अंजनेरी, रांजणगिरी, घरगड, सोनगिरी, खैराई, रामसेज, देहेरगड व भोरगड हे किल्ले व त्यांच्या आसपासचा परीसर दिसुन येतो. या उंचवट्यावरून घसाऱ्याच्या पायवाटेने खाली उतरल्यावर समोरच एका भल्यामोठ्या वाड्याचे व शेजारी सदरेचे अवशेष दिसतात. त्या शेजारी इतरही काही वास्तुंचे अवशेष विखुरलेले आहेत. वाटेच्या उजव्या बाजुला आधी वर्णन केलेली तटबंदी व टाक्या असुन डाव्या बाजुला गडमाथ्याला लागुन एका सलग रांगेत कोरलेली ४ मातीने बुजलेली टाकी दिसुन येतात. यातील एका टाक्यात भले मोठे उंबराचे झाड आहे. या टाक्याच्या पुढे एक साचपाण्याचा तलाव असुन कडयाच्या दिशेला उतारावर अजून एक कातळात खोदलेले टाके दिसुन येते. येथुन मागे फिरून परत वाडयाच्या अवशेषांकडे यावे. वाडयाच्या समोरील बाजुस ढासळलेल्या दोन बुरूजामध्ये कधीकाळी गडावर प्रवेश करण्यासाठी पुर्वाभिमुख दरवाजा असल्याच्या खुणा दिसुन येतात. येथुन खडकात कोरलेल्या पायऱ्यांनी आपण गडावरील माचीच्या खालील भागात येतो. या भागात बऱ्यापैकी झाडे असुन मोठया प्रमाणात घरांचे अवशेष आहेत. येथे असलेली झाडे पहाता येथे पाण्याची टाकी असण्याची शक्यता आहे. येथे असलेल्या झाडाखाली काही काळ विश्रांती घेऊन किल्ल्याला समांतर असलेल्या पायवाटेने परतीच्या प्रवासाला सुरवात करायची. गडाच्या पायथ्यापासून माथ्यापर्यंत संपूर्ण गडफेरीस साधारण ३ ते ४ तास लागतात. वाघेरा हा वाघेरचा अपभ्रंश आहे. वाघेर ही राजस्थानची जमात आदिवासी म्हणून ओळखली जाते. वाघेरांच्या ताब्यात असल्यामुळे या किल्ल्याला वाघेरा हे नाव पडले असावे असे गावातील मंडळी सांगतात मात्र वाघेराचा तसा उल्लेख कुठे मिळत नाही. पेशवाईत सवाई माधवराव यांच्या लग्नात स्वयंपाकी व व्यवस्थेसाठी नाशिकच्या वाघेरातून लोक नेल्याची नोंद पेशवे दफ्तरात मिळते. इ.स.१८०३ मध्ये वाघेरा जमातीने वाघेराचे नायक पात्रामल माणेक यांच्या नेतृत्वाखाली बडोद्याच्या गायकवाडांविरूद्ध बंड पुकारले व त्यापुढील काळात मुलू माणेक व त्याचा भाऊ बेरसी माणेक यांनीही उठाव केले. वाघेरांचे इंग्रज व बडोद्याविरोधात वारंवार बंड होत असल्याने खंडेराव गायकवाडांनी इंग्रजांच्या मदतीने वाघेरांचा बंदोबस्त केला. पेशव्यांच्या ताब्यात असलेला वाघेरा किल्ला १८१८मध्ये इंग्रजंच्या ताब्यात गेला. त्यावेळी कॅ.जॉन ब्रिग्जने किल्ल्याला भेट दिली असता त्याला घरांशिवाय तेथे काहीच आढळले नाही. १८५७ च्या उठावात वाघेरचे सरदार जोधा माणेक यांनी स्वतःला ओखामंडळचा राजा म्हणून जाहीर केले व नानासाहेब पेशव्यांचे सरदार बनले पण कर्नल डोनोव्हन यांच्या सैन्याने त्यांचा पराभव केला.-------------सुरेश निंबाळकर

जिल्हा - नाशिक 
श्रेणी  -  मध्यम  
दुर्गप्रकार - गिरीदुर्ग

वाघेरा