सोनोरी

जिल्हा - पुणे 
श्रेणी  -  सोपी   
दुर्गप्रकार - भुईकोट

मराठेशाहीच्या उत्तरार्धात तोफखाना प्रमुख सरदार पानसें यांनी पुण्याजवळ दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. पुण्यापासुन ३० कि.मी.वर तर सासवड पासुन ६ कि.मी.वर असलेल्या या गडास भेट देण्यास अनेक दुर्गप्रेमी जातात पण या गडाच्या पायथ्याशी असलेल्या सोनोरी गावात सरदार पानसे यांची गढी अनेकांना ठाऊक नसते. प्रथमदर्शनी एखादा भुईकोट शोभावा अशी हि गढी आजही सुस्थितीत आहे पण आतील वाडयाच्या वास्तु मात्र ढासळत चालल्या आहेत. गावाच्या एका टोकाला असलेली हि गढी ३ एकरपेक्षा जास्त परिसरात पसरलेली असुन गढीच्या तटबंदीत चार टोकाला चार व दरवाजा शेजारी दोन असे एकुण सहा बुरुज आहेत. गढीची घडीव व ओबडधोबड दगडांनी बांधलेली तटबंदी २० फुट उंच व ८ फुट रुंद असुन असुन त्यात बंदुकीच्या व तोफांच्या माऱ्यासाठी जंग्या ठेवल्या आहेत.गढीचे मुख्य प्रवेशद्वार पुर्वाभिमुख असुन आतील बाजूस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत तर पश्चिमेस असलेले दुसरा दरवाजा तोडुन गावकऱ्यांनी त्यातुन रस्ता काढला आहे. मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूस सरदार भिवराव पानसे यांचा समाधी चौथरा असुन शेजारी त्यांच्या सती गेलेल्या पत्नी उमाबाई यांचे वृंदावन आहे.समाधीसमोर एका चौथऱ्यावर विठ्ठल रुक्मीणी व राममंदिर असुन काही अंतरावर रामतीर्थ नावाचे पायऱ्या असलेले चौकोनी कुंड आहे. गढीत शिरल्यावर सर्वप्रथम रस्त्याच्या शेवटी असलेल्या पश्चिमेकडील दरवाजाकडे जावे. रस्ता बांधताना हा दरवाजा तोडला असुन त्याची अर्धी कमान आजही शिल्लक आहे. दरवाजाच्या डाव्या बाजूस तटबंदीला लागुन घोड्याच्या पागा असुन टोकाला तटाला लागुनच गणपतीचे मंदिर आहे. येथुन तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. हे पाहुन परत फिरल्यावर वाटेच्या डाव्या बाजुस लक्ष्मीनारायण मंदिर आहे. मंदिरासमोर पाण्याच सुकलेल टाक आहे. हे मंदिर म्हणजे पंचायतन असुन या मंदिराच्या चार कोपऱ्यात देवी, सूर्य, गणपती व महादेव यांची मंदिरे आहेत. मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात लक्ष्मीनारायणाची संगमरवरी मुर्ती आहे. या मुर्तीत गरूडाच्या खांद्यावर बसलेला विष्णू व त्याच्या डाव्या बाजूला लक्ष्मी दाखवलेली आहे. हि मुर्ती ७ मार्च १७७१ रोजी कर्नाटक स्वारीत मेळेकोट येथे केलेल्या लुटीत कृष्णराव पानसे यांना मिळाली होती. याशिवाय सोनोरी गावात मुरलीधराचे मंदिर असुन मंदिरात अत्यंत देखणी अशी काळ्या पाषाणात घडवलेली श्रीकृष्णाची मुर्ती आहे. या सर्व मंदिरातील देवाच्या पुजेअर्चेसाठी पेशव्यांनी वनपुरी गांव इनाम दिला होता. मंदिराच्या मागील बाजूस पायऱ्या व कमान असलेली मोठी गोलाकार विहिर आहे. या विहिरीशेजारी विटांनी बांधलेला मनोरा असुन त्यातील हौदातुन खापरी नळाने संपुर्ण वाड्यात पाणी फिरवले होते. विहिरीच्या पुढील बाजूस पानसे यांचा वाडा असुन या वाड्याला चारही बाजूंनी तटबंदी व त्यात दोन दरवाजे आहेत. मुळात हा एक वाडा नसुन चार वाड्याचा समूह आहे. यातील एक वाडा भुईसपाट झाला असुन दुसरा अवशेष रूपाने शिल्लक आहे. एकेकाळी तीन मजली असलेले उर्वरित दोन वाडे मोडकळीस आले असुन केवळ एक मजली राहीले आहेत. या वाड्यातील शिसवी देवघर पहाण्यासारखे आहे. यातील एका वाडयाच्या आतील बाजुस लहान विहीर असुन बाहेर दुसरी मोठी विहीर आहे. याशिवाय वाडयाच्या पश्चिमेस असलेल्या बुरुजाबाहेर एक मोठा पाणीसाठा दिसुन येतो. गढीच्या बांधकामासाठी येथुन दगड काढल्याने हा पाणीसाठा तयार झाला आहे. वाडा पाहील्यावर आपली गढीची फेरी पूर्ण होते. वाड्यात दरवर्षी जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या निमित्ताने सर्वत्र विखुरलेली पानसे मंडळी एकत्र येतात. शाहू महाराजांच्या काळात महादेव शिवदेव पानसे यास पागेत चाकरी होती. थोरल्या बाजीरावांच्या कर्नाटक मोहीमेत (१७२६) महादेव शिवदेव आपल्या पागेसह सामील झाले. बाजीराव पेशव्यांच्या शिफारसीने शाहु महाराजांनी महादेवराव यांस पेशव्यांच्या दिमतीस दिले (इ.स.१७३५). महादेवरावांच्या हाताखाली यशवंतराव व त्यांचे धाकटे बंधू महिपतराव हे दोघे काम करीत होते. पानीपतच्या लढाईत भाऊसाहेबांबरोबर असलेल्या सैन्यात महिपतराव लक्ष्मण पानसे होते. पानिपताहून जिवंत परत आलेल्या मंडळीत सरदार महिपतराव पानसे यांचा समावेश होतो. या काळात पेशव्यांकडे स्वतंत्र असा तोफखाना नव्हता. नानासाहेब पेशव्यांनी तोफखाना महादेवरावांच्या ताब्यात दिला व महादेवराव पानसे हे पानसे घराण्यातील पहिले सरदार झाले. या काळात महादेवराव पानसे यांनी तोफखान्यात बऱ्याचशा सुधारणा केल्या. महादेव शिवदेव पानसे यांना १७५३ साली सोनोरी येथे १५ बिघे जमीन इनाम मिळाली. सोनोरीतील गढीवजा वाडा कृष्णराव महादेव व भिवराव यशवंत पानसे यांनी इ.स.१७६०–१७६२ दरम्यान बांधला असावा. सरदार भिवराव पानसे यांच्यावर पेशव्यांचा खूप विश्वास होता. इ.स.१७७१–७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे मल्हारगडावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात त्यावेळी कदाचित ते या गढीवर देखील आले असावेत. भिवराव पानसे यांच्या अनेक लढाया गाजल्या. इ.स. १७७७ मध्ये हैदरअलीच्या मोहिमेवर झालेली भिवरावांची निवड त्यांनी सार्थ ठरविली. पेशवाईच्या उत्तरकाळात भिवराव पानसे हे नाना फडणवीस यांच्या पक्षात होते. इ.स. १७७८ मध्ये वडगांवच्या लढाईत भिवरावांनी आपल्या तोफगोळ्यांनी इंग्रजांना नामोहरम केले. इ.स.१७७८ मध्ये सरदार भिवरावांचा मृत्यु झाला. त्यांचे मागे त्यांची पत्नी उमाबाई या सती गेल्या. ------------सुरेश निंबाळकर