जिल्हा - नंदुरबार  
श्रेणी  - सोपी   
दुर्गप्रकार - भुईकोट

मंदाणे

एकेकाळी खानदेशात असणारे नंदुरबार खानदेशच्या विभाजनानंतर स्वतंत्र जिल्हा म्हणुन अस्तित्वात आले. नंदुरबार जिल्ह्यातून वाहणाऱ्या तापी नदीमुळे या जिल्ह्याचे उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग झालेले असुन जिल्ह्याच्या सीमा थेट मध्यप्रदेश व गुजरात राज्याला भिडल्या आहेत. अदीवासी बहुल असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात एकेकाळी एक दोन नव्हे तर तब्बल १५ किल्ले गिरीदुर्ग, भुईकोट व गढी या स्वरुपात अस्तित्वात होते. दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांचे महाराष्ट्रातील गडकिल्ले या पुस्तकातील ७ किल्ले वगळता इतर कोठेही या किल्ल्यांचा उल्लेख दिसुन येत नाही. आजच्या संगणकाच्या युगात आंतरजालावरही या किल्ल्यांची माहिती दिसुन येत नाही. आमच्या दुर्गभरारी या समुहाने या सर्व किल्ल्यांचा अभ्यासपुर्ण दौरा केला असता मिळालेली माहिती या संकेतस्थळावर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. यात १३ गढीकिल्ले असुन त्यात १ गिरिदुर्ग, ३ भुईकोट २ नगरकोट तर उरलेल्या ७ गढी आहेत. यातील बहुतांशी गढीकोटात गावे वसलेली असल्याने गावातील वाढत्या वस्तीने या कोटांच्या अवशेषांचा घास घेतला आहे तसेच स्थानिकांची उदासीनता देखील या कोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे. मंदाणे गढी हि त्यापैकी एक. एकेकाळी खानदेशाचा भाग असणारे मंदाणे गाव खानदेशच्या विभाजनानंतर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्याचा भाग बनले. मंदाणे गढी दक्षिण नंदुरबार भागात राज्य महामार्ग क्र.१ वर मंदाणे गावात शहादा पासुन १६ कि.मी. अंतरावर आहे. मंदाणे गढीला भेट देण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम नंदुरबार अथवा शहादा गाठावे लागते. नंदुरबार मंदाणे हे अंतर ५३ कि.मी.असुन प्रकाशा- शहादामार्गे तेथे जाता येते. मंदाणे गढीचे अवशेष म्हणजे एक बुरुज व केवळ एका बाजूस शिल्लक असलेली ढासळलेली तटबंदीची भिंत. या बुरुजावरून खाली तटबंदीबाहेर पडण्यासाठी एक लहान मार्ग आहे जो सध्या बंद करण्यात आला आहे. गढीत असलेल्या वस्तीने गढीचे आतील अवशेष तटबंदी व बुरुज पुर्णपणे नष्ट केले आहेत. गढीत सध्या राहत असलेल्या मोरे कुटुंबीयांकडे गढीबाबत माहिती विचारली असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हि गढी मूळ मोरे कुटुंबियांच्या मालकीची नसुन त्यांच्या आजोबांनी तीन पिढ्यापुर्वी विकत घेतली आहे. त्यामुळे गढीच्या इतिहासाबाबत त्यांना काहीच माहिती नाही. मात्र गढीत ते साठ वर्षापासुन राहत असल्याने मूळ गढीचा विस्तार व अवशेष याबाबत त्यांनी माहिती दिली. साधारण एक एकरमध्ये पसरलेल्या या चौकोनी आकाराच्या गढीला प्रत्येक टोकाला एक असे चार बुरुज व पुर्व दिशेला मुख्य दरवाजा होता. यातील एक बुरुज पुर्वीच ढासळलेला असुन दोन बुरुज अलीकडील काळात नष्ट झाले आहेत. गढीबद्दल इतकीच माहिती उपलब्ध होते. गढीचे फारसे अवशेष नसल्याने १५ मिनिटात गढी पाहुन होते. याशिवाय गावाबाहेर भवानी देवीचे जीर्णोद्धार केलेले मंदिर असुन या मंदिराबाहेर एक प्राचीन दिपमाळ आहे. या दीपमाळेच्या आतील बाजूस वर जाण्यासाठी एक लहान जिना आहे. मंदिराच्या मागील बाजूस गोलाकार घुमट असलेले शिवमंदीर असुन या मंदिरात काही प्राचीन मुर्ती ठेवलेल्या आहेत. -------------सुरेश निंबाळकर