जिल्हा - नंदुरबार  
श्रेणी  - सोपी   
दुर्गप्रकार - भुईकोट

कोंढवळ

एकेकाळी खानदेशात असणारे नंदुरबार खानदेशच्या विभाजनानंतर स्वतंत्र जिल्हा म्हणुन अस्तित्वात आले. अदीवासी बहुल असलेल्या या नंदुरबार जिल्ह्यात एकेकाळी एक दोन नव्हे तर तब्बल १५ किल्ले डोंगरी, भुईकोट व गढी या स्वरुपात अस्तित्वात होते. दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांचे महाराष्ट्रातील गडकिल्ले या पुस्तकातील ७ किल्ले वगळता इतर कोठेही या किल्ल्यांचा उल्लेख दिसुन येत नाही. आजच्या संगणकाच्या युगात आंतरजालावरही या किल्ल्यांची माहिती दिसुन येत नाही. आमच्या दुर्गभरारी या समुहाने या सर्व किल्ल्यांचा अभ्यासपुर्ण दौरा केला असता मिळालेली माहिती या संकेतस्थळावर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. यात १३ गढीकिल्ले असुन त्यात १ गिरिदुर्ग, ३ भुईकोट २ नगरकोट तर उरलेल्या ७ गढी आहेत. स्थानिकांची उदासीनता या गढीकोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे. आजही पुर्णपणे सुस्थितीत असलेल्या कोंढवळ किल्ल्याची केवळ दुर्लक्ष झाल्यामुळे दुर्दशा होत आहे. कोंढवळ किल्ला दक्षिण नंदुरबार भागात शहादा तालुक्यात शहादा पासुन १८ कि.मी. अंतरावर आहे. कोंढवळ किल्ल्याला भेट देण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम नंदुरबार अथवा शहादा गाठावे लागते. नंदुरबार कोंढवळ हे अंतर ५५ कि.मी.असुन प्रकाशा- शहादा-कहातुल-जयनगर मार्गे तेथे जाता येते. गावाबाहेर नदीकाठी रस्त्याला लागुनच हा किल्ला असुन या किल्ल्याभोवती आता वस्ती वसण्यास सुरवात झाली आहे. हि संपुर्ण वस्ती या किल्ल्याचा शौचासाठी वापर करत असल्याने आत भयानक दुर्गंधी पसरली आहे. किल्ल्यात पसरलेली काटेरी झुडपे व पायाखालील घाण संभाळत हा किल्ला पाहणे म्हणजे एक दिव्य आहे. साधारण अर्धा एकरमध्ये पसरलेल्या या किल्ल्याच्या चार टोकाला चार मोठे बुरुज असुन उत्तरेला एकमेव प्रवेशद्वार आहे. तटबंदीची उंची २५-३० फुट असुन बुरुजांची उंची त्यापेक्षा जास्त आहे. तटबंदी व बुरुजाचे खालील बांधकाम दगडात केलेले असुन वरील बांधकाम विटांनी केलेले आहे. त्यात जागोजाग बंदुकीच्या मारगीरीसाठी जंग्या ठेवलेल्या असुन बुरुजावर तोफांसाठी झरोके ठेवलेले आहेत. तटबंदी मधील दरवाजाची कमान आजही शिल्लक असुन दरवाजा मात्र नाहीसा झाला आहे. किल्ल्याच्या आतील अवशेष पुर्णपणे जमीनदोस्त झाले असुन त्यावर काटेरी झुडपे उगवली आहे. किल्ल्याचे चारही बुरुज दुमजली असुन त्यात अनेक कोनाडे आहेत तसेच वरील बाजूस चुन्याचा गिलावा केला आहे. किल्ल्याच्या मध्यभागी एक खोल विहीर असुन इतर अवशेष दिसुन येत नाही. किल्ल्यातील बुरुजावरून खुप लांबवरचा प्रदेश दिसुन येती. दुर्गंधीमुळे इच्छा असुनही किल्ल्यात फारवेळ थांबता येत नाही व आपली गडफेरी आटोपती घ्यावी लागते. किल्ल्याबाहेर पुर्वेला मारुतीचे मंदिर आहे. स्थानिकांसाठी हा किल्ला म्हणजे केवळ शौचालय असुन इतर काहीही माहिती सांगता येत नाही. सकाळच्या वेळेत किल्ल्यात शौचासाठी रांग लागत असल्यने नंतरच्या वेळेत किल्ला पाहण्याचे नियोजन करावे. येथे राहण्याची वेळ आल्यास ३ कि.मी. अंतर असलेल्या जयनगर मधील हेरंब गणेश मंदिराच्या भक्त निवासात सोय होऊ शकते. -------------सुरेश निंबाळकर