नंदाणे

जिल्हा - धुळे  
श्रेणी  - सोपी   
दुर्गप्रकार - भुईकोट

धुळ्याहून मुंबई- आग्रा महामार्गावरील सर्वंड फाट्यावरून लामकानी येथे जाताना वाटेत नंदाने म्हणुन एक छोटेसे गाव लागते. या गावाला मुद्दाम थांबुन पहावे अशी एक ब्रिटीश काळात बांधलेली किल्ल्याच्या दरवाजाप्रमाणे वेस आहे. वेशीच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूस दोन गोलाकार बुरुज असुन दरवाजाच्या आत दोन्ही बाजूस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. अतिशय सुंदर अशी कमान असलेल्या या दरवाजाच्या व बुरुजाच्या वरील बाजूस दोन मजले आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस असलेल्या जिन्याने तेथे जाता येते. रस्त्याने जाताना सहजपणे नजरेस पडणारी हि वास्तु आवर्जुन पहावी अशीच आहे. अगदी अलीकडच्या काळात बांधल्या गेलेल्या या वास्तुचा इतिहासाशी काहीही संबंध नाही. आम्हाला काही काळ या वास्तुने थांबविल्याने मुद्दामच या वास्तुचा येथे उल्लेख करत आहे. जे आहे ते जतन करायचे नाही व उगीचच त्यासारखे काहीतरी बांधायचे असे या वास्तुबाबत सांगता येईल. किल्ल्याच्या भव्य दरवाजाप्रमाणे भासणारी हि वास्तु गाडीतुन सहजपणे दिसत असली तरी जवळ जाऊन छायाचित्रे घेण्याचा मोह आवरत नाही. धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यात नंदाने गावात भुईकोट-किल्ल्यासारखी दिसणारी वास्तु म्हणुन या वास्तुची येथे नोंद घेत आहे इतकेच. -----------------सुरेश निंबाळकर