महाराष्ट्रातील काही किल्ले हे त्यांच्या नावापेक्षा त्या किल्ल्याखाली असलेल्या गावामुळे प्रसिध्द आहे. असेच काहीसे भाग्य तळबीड गावाला लाभले आहे. आणि त्याला कारण आहे तळबीड येथे असलेली सेनापती हंबीरराव मोहिते यांची समाधी. तळबीड गावाने स्वराज्याच्या यज्ञकुंडात एक नव्हे तर सेनापती हंबीरराव मोहिते व रणरागिणी ताराबाई यांच्या रूपाने दोन आहुत्या दिल्या आहेत. तळबीड गावात असलेले सेनापती हंबीरराव मोहिते यांची समाधी जरी लोकांना परिचित असली तरी या गावामागे असलेला वसंतगड मात्र तसा अपरीचीतच आहे. वसंतगडावर जाण्यासाठी तळबीड तसेच वसंतगड या दोन्ही गावातुन वाटा असुन या दोन्ही वाटांनी साधारण तासाभरात आपण गडावर पोहोचतो. मुंबई बंगळुर महामार्गावरील उंब्रज येथुन वसंतगड गावात जाण्यासाठी फाटा असुन उंब्रज चिपळूण या मार्गाने हे अंतर १६ कि.मी. आहे. वसंतगडावर जाणारी दुसरी वाट तळबीड गावातुन असुन मुंबई बंगळुर महामार्गाने कराडकडे जाताना उंब्रजपासुन ६ कि.मी.अंतरावर तळबीडला जाणारा फाटा असुन उंब्रज तळबीड हे अंतर १० कि.मी.आहे. तळबीड गावातुन गेल्यास सेनापती हंबीरराव मोहीते यांच्या समाधीचे दर्शन होत असल्याने बहुतेक गडप्रेमी याच वाटेचा वापर करतात. गावात प्रवेश करताना समोरच सेनापती हंबीरराव मोहीते यांची समाधी नजरेस पडते. या समाधीशेजारी दोन तोफा असुन यातील एक तोफ अर्धवट तुटलेली आहे. या समाधी चौथऱ्याशिवाय गावात अजुन तीन समाधी चौथरे असुन यातील एका चौथऱ्याला चार विरगळ टेकवुन ठेवल्या आहेत. तळबीड गावातील शाळेपासुन गडावर जाण्यासाठी मळलेली वाट आहे. पावसाळा वगळल्यास गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने पुरेसा पाणीसाठा घेऊनच गड चढण्यास सुरवात करावी. तळबीड गावातुन जाणारी वाट व किल्ल्याच्या दक्षिण पायथ्याशी असलेल्या वसंतगड गावातून येणारी वाट या दोन्ही वाटा गडाच्या मुख्य दरवाजा अलीकडे एकत्र येतात. वाटेच्या सुरवातीस नव्याने बांधलेल्या पायऱ्या असुन गडावरील चंद्रसेन मंदिरात गावकऱ्यांची ये-जा असल्याने वाट पुर्णपणे मळलेली आहे. या वाटेने गडाच्या उध्वस्त पुर्वाभिमुख दरवाजाने आपला गडावर प्रवेश होतो. दरवाजा बाहेरील तटबंदीत डावीकडे एका घुमटीत गणेशाची कोरीव मुर्ती असुन घुमटीसमोर पत्र्याचा निवारा उभारला आहे. दरवाजासमोर कातळात कोरलेल्या वळणदार पायऱ्या असुन गडाचा दरवाजा तटबंदीच्या आतील बाजुस बांधला आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूस बुरुज असुन यातील एका बुरुजाच्या ध्वजस्तंभावर भगवा फडकताना दिसतो. दरवाजातुन आत शिरल्यावर समोरच एका वास्तुचा चौथरा असुन डाव्या बाजूस पत्र्याच्या निवाऱ्याखाली मारूतीची मुर्ती ठेवलेली आहे. वसंतगडाची समुद्रसपाटीपासून उंची २९३० फुट असुन पायथ्यापासुन हि उंची ७५० फुट आहे. वसंतगड किल्ल्याचा माथा म्हणजे ७० एकरमध्ये पसरलेले अस्ताव्यस्त पठार असुन या संपुर्ण पठारास तटबंदी दिसुन येते. हि तटबंदी व त्याखालील फांजी आजही शिल्लक असुन या फांजीवरून संपुर्ण गडाला फेरी मारता येते. मारुती मुर्तीकडील तटाच्या फांजीवरून गडफेरीला सुरवात केल्यास संपुर्ण गडाला फेरी मारत आपण याच ठिकाणी परत येऊ शकतो. गडाच्या बाहेरील तटबंदीत अनेक लहान लहान बुरुज असुन गडाच्या चारही टोकावर चार मोठे बुरुज दिसुन येतात. हे बुरुज गडाच्या अंतर्गत भागात असुन या सर्व बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. या बुरुजामुळे गडाच्या केवळ बाहेरील भागातच नव्हे तर अंतर्गत भागातही लक्ष ठेवता येते. गडफेरीस सुरवात केल्यावर पहिला बुरुज पार केल्यावर तटाखाली असलेले शौचकुप पहायला मिळते. गडाच्या पठारावर मोठया प्रमाणात दगड विखुरलेले दिसतात पण वास्तुचे चौथरे मात्र दिसत नाहीत. गडाच्या तिसऱ्या बुरुजाच्या अलीकडे तटालगत एक कोठार दिसुन येते. हे बहुदा दारूगोळ्याचे कोठार असावे. तिसरा बुरुज ओलांडल्यावर काही अंतरावर गडाच्या तटबंदीत असलेला दुसरा पश्चिमाभिमुख गोमुखी दरवाजा पहायला मिळतो. या दरवाजाची कमान व शेजारील बुरुज आजही सुस्थितीत असुन दरवाजा बाहेरील चौकटीवर मारुतीचे शिल्प कोरले आहे. या दरवाजातुन गडावर येणारी पायवाट मात्र वापरात नसल्याने मोडली आहे. तटावरून गडफेरी करताना आपल्याला पठारावर लहानमोठी सहा तळी पहायला मिळतात. यातील चार तळी पावसाळी साचपाण्याची असुन उर्वरित दोन तळी जरी खोदीव असली तरी उन्हाळ्यात त्यात पाणी शिल्लक राहत नाही. हे दोन्ही तलाव सध्या कोयनातळे व कृष्णातळे म्हणुन ओळखले जात असुन या तलावाच्या काठावर असलेल्या झाडीत काही बांधीव समाधी व सतीशीळा पहायला मिळतात. तलाव पाहुन उत्तरेकडील चौथ्या बुरुजावर आल्यावर आपली तटावरील फेरी पूर्ण करून गडाच्या मध्यभागी दिसणाऱ्या मंदिराकडे निघावे. बुरुजाकडून मंदिराकडे जाताना आपल्याला सर्वप्रथम एका भल्यामोठ्या वास्तुचे अवशेष दिसुन येतात. वास्तुचे एकंदरीत अवशेष व ठिकाण पहाता हि वास्तु म्हणजे गडावरील राजवाडा असावा. राजवाडा पाहुन मंदिराकडे जाताना मंदिराच्या मागील बाजूस असलेला चुन्याचा घाणा व त्याचे चाक पहायला मिळते. गडावरील मंदिर शुर्पणखेचा पुत्र चंद्रसेन याचे असुन पठारावरील उंच भागात असलेल्या या मंदिराला कधीकाळी चारही बाजुंनी प्राकारची भिंत होती. आज या भिंतीचे केवळ अवशेष व त्यातील दरवाजा शिल्लक आहे. मंदिराच्या पुर्वेस असलेल्या भिंतीवर या मंदिराच्या जीर्णोद्धाराबद्दल देवनागरी लिपीत कोरलेला शिलालेख दिसुन येतो. या शिलालेखानुसार मंदिराचा जीर्णोद्धार शके १७१० म्हणजेच १७८८ ते १७८९ दरम्यान करण्यात आला असुन या शिलालेखात जीर्णोद्धारासाठी आलेला खर्च व बांधकाम करणाऱ्या गवंडीची नावे कोरली आहेत. मंदिराच्या आवारात एक मोठा समाधी चौथरा असुन दोन दीपमाळा आहेत. या दीपमाळाना लागुन काही भग्न मुर्ती ठेवलेल्या आहेत. मंदीर परिसरात एक पुरातन शिवमंदीर तसेच अलीकडील काळात बांधलेली तीन मंदिरे असुन एकात प्राचीन गजलक्ष्मी शिल्प व दुसऱ्यात नवीन विठ्ठलरुक्मीणी मुर्ती तर तिसऱ्यात रामलक्ष्मण सीता यांची संगमरवरी मुर्ती आहे. मंदीर परिसरात मोठया प्रमाणात असलेले उध्वस्त अवशेष पहाता गडाची मुख्य वस्ती याच भागात असावी. या अवशेषात एका ठिकाणी सदरेचे अवशेष दिसुन येतात. सदर पाहुन प्रवेश केलेल्या ठिकाणी आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. गडावर फारसे अवशेष नसले तरी गडाचा घेरा मोठा असल्याने गड फिरण्यास दोन तास लागतात. गडावरून सुंदरगड,गुणवंतगड, अजिंक्यतारा, सज्जनगड, सदाशिवगड, मच्छिंद्रगड हे किल्ले सहजपणे दिसुन येतात. घाटावरून कोकणात उतरणाऱ्या प्राचीन मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी १२ व्या शतकात शिलाहार राजा भोज याने वसंतगडाची निर्मिती केली. इ.स. १६५९ मध्ये शिवरायांनी वसंतगड स्वराज्यात सामील करून घेतला. अफजलखान स्वराज्यावर चालून आला असता आदिलशाहीच्या ताब्यात असलेल्या या प्रांतावर गडाजवळील मसुरचे महादजी जगदाळे वतनदार होते व वसंतगड त्यांच्या ताब्यात होता. महादजी जगदाळे हे आदिशाहाचे चाकर असल्याने अफजलखानास जाऊन मिळाले. अफजलखानच्या वधानंतर त्याच्या फौजेची दाणादाण उडाली व मराठ्यांनी छापा घालून जगदाळेस पकडून वसंतगडावर आणले. महाराजांनी त्याचा शिरच्छेद केला आणि वसंतगड स्वराज्यात सामील झाला. १६ डिसेंबर १६८४ रोजी मोगलांशी लढताना वाई येथे तोफगोळा लागून हंबीरराव धारातीर्थी पडले. त्यांची समाधी त्यांच्या तळबीड गावात बांधली गेली. जिंजीहून परत आल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज काही दिवस (२० जुलै १६९९) दरम्यान वसंतगडावर मुक्कामास होते. राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत रामचंद्रपंत अमात्य कराड प्रांताचा कारभार या किल्ल्यावरून पहात होते. २५ नोव्हेंबर १६९९ रोजी औरंगजेबाने हा किल्ला जिंकला व त्याचे नाव मिफातीहल फतुह म्हणजे यशाची किल्ली असे ठेवले. इ.स. १७०८ साली मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकला. पुढे ताराबाईनी रामचंद्रपंत प्रतिनिधींच्या पायात रुप्याच्या बेडया घालून त्यांना येथे कैदेत ठेवले होते. इ.स. १८१८ मध्ये वसंतगड इंग्रजांच्या ताब्यात गेला.------------सुरेश निंबाळकर

वसंतगड

जिल्हा - सातारा  
श्रेणी  -  मध्यम
दुर्गप्रकार- गिरीदुर्ग