वर्धा जिल्हा म्हटले कि आपल्याला आठवते महात्मा गांधी यांचे सेवाग्राम पण विदर्भातील या वर्धा जिल्ह्यात एकेकाळी बरेच किल्ले गिरीदुर्ग, भुईकोट व गढी स्वरुपात अस्तित्वात होते. वर्धा जिल्ह्यातील किल्ल्यांची शोधयात्रा करताना आम्हाला एकुण १० कोट अवशेष रुपात पहायला मिळाले. आजच्या संगणक युगात आंतरजालावरही या किल्ल्यांची माहिती दिसुन येत नाही. या किल्ल्यांचा दौरा केला असता मिळालेली माहिती मी दुर्गभरारी या संकेतस्थळावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यातील बऱ्याच गढी पुर्णपणे नष्ट झाल्या असुन केवळ तटबंदीची एखादी भिंत अथवा एखादा बुरुज वा दरवाजा असे उर्वरित अवशेष काळाशी झुंज देत आहेत. या १० किल्ल्यात २ लहान गिरिदुर्ग १ सराई तर उरलेल्या ७ गढी आहेत. यातील बहुतांशी गढीकोटात गाव, मंदिरे वा दर्गा असल्याने या वास्तुनीच या कोटांच्या अवशेषांचा घास घेतला आहे तसेच स्थानिकांचे या वास्तु बद्दलचे अज्ञान व उदासीनता देखील या कोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे. देवळी तालुक्यात कुरझडी फोर्ट नावाने ओळखल्या जाणाऱ्या गावात असलेल्या कुरझडी गढीची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. कुरझडी फोर्टला भेट देण्यासाठी आपल्याला वर्धा किंवा पुलगाव शहर गाठावे लागते. वर्धा ते कुरझडी फोर्ट हे अंतर २६ कि.मी. असुन पुलगाव ते कुरझडी फोर्ट हे अंतर मलकापुरमार्गे फक्त १२ कि.मी. आहे. पुलगाव येथुन कुरझडी फोर्टला जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध आहेत. कुरझडी फोर्ट गावात उतरून गढीकडे जाताना रस्त्याच्या उजव्या बाजुस मारुती मंदिर व त्यासमोर विहीर तर डाव्या बाजूस एका लहानशा घुमटीत उमामहेश व गणपतीची मुर्ती पहायला मिळते. यशोदा नदीच्या काठावर असलेली चौकोनी आकाराची हि गढी १ एकर परिसरावर पसरली आहे. उंचवट्यावर चार टोकाला चार बुरुज अशी रचना असलेल्या या गढीचा आज केवळ उत्तरेकडील तटबंदीचा पायाकडील भाग केवळ शिल्लक आहे. गढीच्या आतील वास्तु पुर्णपणे भुईसपाट झाल्या असुन तेथे घोडमारे कुटुंबाची घरे आहेत. सध्या विरूळ येथे स्थायीक असलेले कुरझडीकर यांच्याकडे मालगुजारी असलेल्या ४ गावांपैकी कुरझडी हे एक गाव होते. सोनेगाव येथे असलेली गढी कुरझडीकर यांनी संत आबाजी यांना दान दिली व फार पुर्वीच कुरझडी येथील मुक्काम हलवून विरूळ येथे स्थायिक झाल्याने गढी ओस पडली. तटबंदीच्या तळातील भिंतीशिवाय गढीचा कोणताही अवशेष शिल्लक नसल्याने गढी पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो.------------------सुरेश निंबाळकर

जिल्हा - वर्धा
श्रेणी  -  सोपी
दुर्गप्रकार- भुईकोट

कुरझडी