जिल्हा - अमरावती

श्रेणी  -  सोपी

दुर्गप्रकार- भुईकोट

अचलपूर हे अमरावती जिल्ह्यातील मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेले एक महत्वाचे तालुक्याचे शहर. अचलपुर शिवाय वऱ्हाडचा इतिहास पुर्ण होऊच शकत नाही असे या शहराबाबत म्हटले जाते. जैनधर्मीय इल राजाने हे नगर वसवल्याने त्याला एलिचपूर असे नाव पडले व काळाच्या ओघात त्याचे अचलपुर झाले. काही काळ विदर्भाची राजधानी असलेले हे शहर बिच्छन नदीतीरावर एका भुइकोटाच्या आत वसलेले असुन मध्ययुगीन काळात वऱ्हाडातील एक महत्वाचे ठिकाण होते. मध्ययुगीन काळातील वैभवाची साक्ष देणाऱ्या वास्तु आजही या शहरात विखुरलेल्या अवस्थेत पहायला मिळतात. अचलपुर किल्ला अमरावती बुऱ्हाणपूर मार्गावर अमरावती पासुन ५० कि.मी.अंतरावर तर परतवाडा शहरापासुन ४ कि.मी.अंतरावर आहे. अचलपुर शहरात आपला प्रवेश या किल्ल्याच्या दरवाजातूनच होतो. भक्कम पोलादी तटबंदीत असलेल्या या शहरात आजही त्याच्या सौंदर्याने नटलेल्या वास्तु दुर्लक्षित झालेल्या आहेत. शहराभोवती असलेली भक्कम तटबंदी, त्यातील बुरुज व कोरीवकामाने सजलेले सहा बुलुंद दरवाजे आजही या शहराचे वैभव आहे. या वास्तु आपल्याला कळत नकळत मध्ययुगीन काळात घेऊन जातात. या सर्व दरवाजावर असलेले पर्शियन शिलालेख त्या दरवाजाची माहिती देतात पण या शिलालेखांचे एकत्रित वाचन कोठेही आढळून येत नाही. हे दरवाजे दुल्हा दरवाजा, खिडकी दरवाजा, जिवनपुरा दरवाजा, माळीपुरा दरवाजा, बुंदेलपुरा दरवाजा आणि हिरापुरा दरवाजा या नावांनी ओळखले जातात. ३०० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला दुल्हा दरवाजा इस्माईल खान याने बांधल्याचा शिलालेख त्या दरवाजावर कोरलेला आहे. या दरवाजाची वाट दुल्हा रहेमान यांच्या दर्ग्याकडे जात असल्याने या दरवाजाचे नाव दुल्हा दरवाजा असे पडले. शहराबाहेरील तटबंदी सुलतानखानचा मुलगा नवाब इस्माईलखान याने बांधल्याचा शिलालेख एका दरवाजावर कोरण्यात आला आहे. किल्ला फिरताना तटबंदीखाली काही ठिकाणी सांडपाण्याचे मार्ग तर काही ठिकाणी किल्ल्यात येणारे पाणीमार्ग तसेच या पाण्यासाठी बांधलेले उच्छ्वास पहायला मिळतात. यातील एक उच्छवास आपल्याला दुल्हा दरवाजाच्या आत समोर पहायला मिळतो. बहामनी काळात बिच्छन नदीवर धरण बांधुन खापरी नळाने नगरात सात ठिकाणी पाणी पुरवठा करण्यात आला होता. सातभुळकी नावाने ओळखली जाणारी हि व्यवस्था बंद झाली असली तरी त्याचे अवशेष व टाक्या अजूनही पहायला मिळतात. अचलपूर शहरात नबाबांच्या नावावर ३५ पेक्षा जास्त पुरे अस्तित्वात असुन त्यांना वसवणाऱ्या नबाबांच्या नावाने ते ओळखले जातात. समरसखानने (१७२४) साली वसवला तो समरसपुरा, सुल्तानखानने (१७२७) साली वसवला तो सुल्तानपुरा, सलाबतखानच्या बेगमच्या नावावरून अन्वरपुरा, नामदारगंज, नसीबपुरा, अब्बासपुरा, अशी या वस्त्यांची नावे आहेत. गावाबाहेर असलेली बेबहा बाग या ठिकाणी इस्माईल खान याचे व इतर अनेक छोटी मोठी थडगी आहेत. सुंदर नक्षीकाम केलेल्या वास्तु, जाळीदार खिडक्या, कमानीदार दरवाजे अशा सौंदर्याने नटलेल्या या वास्तु सध्या उजाड झाल्या आहेत. गावापासुन दोन कि.मी. अंतरावर हौज कटोरा ही षट्कोनी इमारत पहायला मिळते. साधारण ३०० फुट गोलाकार आकाराच्या तलावात ८० फूट उंचीची तीन मजली इमारत उभारण्यात आली होती. या इमारतीचे खालील दोन मजले दगडी बांधकामातील असुन तिसरा मजला विटांनी बांधलेला आहे. किल्ल्याचे सर्व दरवाजे व वास्तु शहरात अनेक ठिकाणी विखुरले असल्याने स्थानिक रिक्षा घेऊन किल्ल्याची भटकंती करणे हा सर्वात योग्य पर्याय आहे. या भटकंतीत संपूर्ण किल्ला व गावाबाहेर असलेला हौजकटोरा व बेबहा बाग हे सर्व पाहण्यासाठी साधारण तीन ते चार तास लागतात. या संपुर्ण भटकंतीत आपल्याला ३०-३५ शिलालेख पहायला मिळतात. जैनधर्मीय इल राजाने वसवलेले एलीचपुर हे नगर देवगिरीच्या यादवांनंतर इ.स.१३४७ मध्ये नरनाळा व गाविलगड किल्ल्यांसह महंमद तुघलकच्या ताब्यात गेले. महंमद तुघलकाचा पुतण्या व जावई इमाद-उल-मुल्क याने वऱ्हाड आणि खानदेशचा सुभेदार असताना १३४७ मध्ये इदगाह बांधल्याचा शिलालेख याठिकाणी आढळतो. याकाळात या परिसराचा कारभार तो एलिचपूर येथुन पाहत असल्याचा उल्लेख गुलशने इब्राहमी या ग्रंथात येतो. इ.स.१३४७ मधील बहामनी सत्तेच्या उदयानंतर इ.स.१३९९ मध्ये फिरोजशहा बहामनी व खेडल्याचा राजा नरसिंगराय यांच्यातील युद्धानंतर शरण आलेला नरसिंगराय फिरोजशहाच्या भेटीसाठी अचलपूरला थांबल्याची नोंद आढळते. गावाबाहेर असलेली हौजकटोरा ही इमारत अहमदशहा बहामनी याने बांधली. बहामनी काळात बिच्छन नदीवर धरण बांधुन खापरी नळाने नगरात पाणीपुरवठा करण्यात आला होता. बहामनी राज्याचे तुकडे होऊन निर्माण झालेल्या इमादशाहीत इ.स.१४९० ते इ.स.१५७४ पर्यंत वऱ्हाडातील कारभार हा गाविलगड, नरनाळा या किल्ल्यांमधून सांभाळला गेल्याने काही प्रमाणात अचलपुरचे महत्त्व कमी झाले. इमादशाहीच्या अस्तानंतर १५७४ ला वऱ्हाड प्रांत निजामशाहीत सामील झाला व इ.स.१५९८ मध्ये अकबराच्या स्वारीनंतर वऱ्हाड प्रांत मोगल साम्राज्याला जोडला गेला व अबुलफजल वऱ्हाडचा सुभेदार बनला. मोगल दरबाराच्या बातमीपत्रांमध्ये एलिचपूर किल्ल्यांचे अनेक उल्लेख येतात. २ एप्रिल १६९४ च्या नोंदीनुसार एलिचपूर हे सरकारी रसद ठेवण्याचे ठिकाण होते. औरंगजेबच्या काळात नवाब अलीवर्दीखान याने १०८ खांबांची आणि १५ मीटर उंचीची भव्य जुम्मा मशीद बांधली. सध्या अस्तित्वात असलेली शहराबाहेरील तटबंदी सुलतानखानचा मुलगा नवाब इस्माईल खान याने बांधली. नबाबाचा महाल आणि देवडी ही बहिलोलखान व सलाबतखान याने बांधली. गुलाम हुसैनखान याच्या काळात इमामवाडा व बेबहा बाग बांधण्यात आली. या ठिकाणी इस्माईलखान याचे थडगे आहे. मोगल काळात मराठय़ांनी वऱ्हाड जिंकण्यासाठी अनेक स्वाऱ्या केल्या. इ.स.१६९८ मध्ये मराठ्यांनी वऱ्हाड प्रांत जिंकला. ११ मे १७०३ च्या बातमीपत्रानुसार मराठय़ांचे सैन्य वऱ्हाडची राजधानी असलेल्या एलिचपूरवर चाल करून आले व त्यांनी मोगलांचा नायब सरंदाज खानकडे चौथाईची मागणी केली. यानंतर शाहू महाराजांनी परसोजी भोसले अमरावतीकर यांना वऱ्हाड प्रांताची जहागिरी दिली. १७४४ ते १७५० पर्यंत हा भाग निजामांच्या ताब्यात होता पण नागपूरचे रघुजीराजे भोसले यांचा मुलगा मुधोजी याने नंतर एलिचपूर ताब्यात घेतले. मुधोजी भोसले यांनी बालाजी व श्रीरामाचे देऊळ तसेच शहा इस्माईलखाँ या सुफी संताच्या कबरीचे बांधकाम केले. १८०३ मधील नागपूरकर भोसले व इंग्रज यांच्या युद्धानंतर अचलपुर इंग्रजांच्या ताब्यात गेले.----------सुरेश निंबाळकर

अचलपुर