नांदोस

जिल्हा - सिंधुदुर्ग

श्रेणी  - सोपी

दुर्गप्रकार- भुईकोट

कोकणातील काही किल्ले आज काळाच्या उदरात नष्ट झाले असुन काही किल्ल्यांचे अवशेष व नोंद नावापुरती इतिहासाच्या पानात उरली आहे. नांदोस येथे असलेली गढीदेखील याला अपवाद नाही. मालवण तालुक्यात असलेली नांदोस गढी आज केवळ अवशेष रुपात शिल्लक आहे. नांदोस गढी मालवण शहरापासुन १९ कि.मी.अंतरावर तर कसालपासून १५ कि.मी. अंतरावर आहे. नांदोस येथे २००३ साली गुप्तधनाच्या लालसेने घडलेला नरबळी प्रकार हा नांदोस गढीच्या परिसरात घडल्याने स्थानिक लोक या गढीबद्दल काहीही सांगायला अथवा बोलायला तयार होत नाहीत. गावातील तरुण मंडळी मात्र या गढीचे निश्चित ठिकाण दाखवतात व इतर माहीती देखील देतात. किल्ला नांदता असताना किल्ल्यावर असलेल्या लोकांचे वंशज आजही नांदोस गावात रहात असुन ते गडकरी हे आडनाव लावतात. नांदोस गावात असलेल्या गिरोबा पंचायतन या देवस्थानाच्या उजव्या बाजुस टेकडीच्या उतारावर एक पाण्याची टाकी दिसुन येते. या टाकीच्या पुढील भागात नांदोस गढीची उध्वस्त तटबंदी व बुरुज आहेत. आम्हाला या ठिकाणी पोहोचण्यास अंधार झाल्याने व स्थानिकांनी अंधारात गढीकडे जाण्यास मज्जाव केल्याने प्रत्यक्षात गढी पाहणे व छायाचित्र घेणे झाले नाही. इ.स.१८०५ मध्ये वाडी संस्थानात झालेल्या वारसाहक्काच्या अंतर्गत भांडणाचा फायदा घेऊन करवीर सैन्याने वाडी संस्थान घेण्याचे ठरवले. त्यासाठी करवीर सैन्याने नांदोस येथे तळ दिला व तेथे गढीवजा किल्ला बांधला. वाडीचे सरदार धोंडो गोविंद सावंत येथे झालेल्या लढाईत करवीरकरांकडून मारले गेले. त्यानंतर वाडीचे सरदार रामचंद्र खानविलकर व चंद्रोबा सुभेदार यांनी केलेल्या हल्ल्यात करवीरकरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले व त्यांना आपले येथील बस्तान उठवावे लागले. यावेळी सावंतवाडीकरांनी हा किल्ला पाडून टाकला. इ.स.१८६२मध्ये ब्रिटीशानी केलेल्या किल्ल्याच्या पहाणीत नांदोस येथील गढी सुस्थितीत असल्याची नोंद आहे. --------------सुरेश निंबाळकर