जिल्हा - भंडारा
श्रेणी  -  सोपी
दुर्गप्रकार-
गिरीदुर्ग

भंडारा जिल्ह्यात असणारा एकमेव गिरीदुर्ग म्हणजे अंबागड. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात सातपुडा डोंगररांगेत असणारा हा किल्ला भंडारा शहरापासून ४० कि.मी. वर तर तुमसरपासून १२ कि.मी.अंतरावर आहे. अंबागड गावापासुन किल्ल्याचा पायथा ५ कि.मी. अंतरावर असुन तिथे जाण्यासाठी कच्चा पण चांगला गाडीमार्ग असल्याने खाजगी वाहन असल्यास थेट गडाच्या पुर्वेला पायथ्याशी असलेल्या हनुमान मंदीरापर्यंत जाता येते अन्यथा हे अंतर पायी पार करावे लागते. मंदिराच्या आवारात एक जुनी विहीर असुन मंदिराच्या मागील भागात नव्याने बांधलेली विहीर आहे. या नव्याने बांधलेल्या विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. २०१५-१६ साली किल्ल्याचे संवर्धन करताना गडाचा दरवाजा ते हनुमान मंदीर या मार्गावर जवळपास ५५० पायऱ्या नव्याने बांधून काढलेल्या आहेत. या पायऱ्यांनी साधारण अर्ध्या तासात आपण दोन बुरुजांमध्ये बांधलेल्या गडाच्या उत्तराभिमुख दरवाजाजवळ पोहोचतो. या दरवाजाची बांधणी गोमुखी पध्दतीची असुन दरवाजावर चुन्यामध्ये कोनाडे व नक्षी कोरलेली आहे. तटबंदी व बुरुजाच्या भिंतीत बंदुकीच्या मारगीरीसाठी जंग्या दिसुन येतात. दरवाजाच्या या दोन्ही बुरुजावर तोफा ठेवण्यासाठी गोलाकार चौथरा बांधलेला असुन एका बुरुजाच्या टोकावर लहान मिनार बांधलेला आहे. दरवाजाच्या आतील भागात डावीकडे व समोर पहारेकऱ्यासाठी खोल्या असुन डावीकडील खोलीतुन दरवाजाच्या वरील भागात जाण्यासाठी जिना आहे. या खोल्याबाहेर वरील बाजुस चुन्यामध्ये केलेले नक्षीकाम व खोल्याचा आकार पहाता हे पहारेकऱ्याचे राहण्याचे ठिकाण नसुन या ठिकाणी किल्ल्याची सदर असावी असे वाटते. बुरुजावरील तोफेच्या जागेवरून किल्ल्याच्या अंतर्भागात पाहीले असता किल्ल्याचा खूप मोठा भाग नजरेस पडतो. लंबगोलाकृती आकाराचा हा किल्ला साधारण ४ एकर परिसरावर पुर्वपश्चिम पसरलेला असुन किल्ल्याचे बांधकाम माची व त्यावर लहानसा बालेकिल्ला असे दोन भागात विभागलेले आहे. किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची १४९० फुट तर पायथ्यापासून उंची ४८० फुट आहे. किल्ल्याच्या आत उजव्या बाजुस असलेल्या लहानशा उंचवट्याला माचीच्या दिशेने वेगळी तटबंदी बांधुन त्याचा बालेकिल्ला करण्यात आला आहे. संपुर्ण किल्ल्याच्या तटबंदीमध्ये एकुण १४ बुरुज असुन त्यातील १० बुरुज किल्ल्याच्या बाहेरील तटबंदीत ३ बुरुज बालेकिल्ल्याच्या तटबंदीत तर एका बुरुजाचा उंचवटा बालेकिल्ल्याच्या अंतर्गत भागात आहे. दरवाजा समोरील भागात एक भलीमोठी खोल विहीर असुन हि विहीर खोदताना निघालेला दगड किल्ल्याच्या बांधकामात वापरला असावा. सध्या हि विहीर कोरडी पडलेली आहे. या विहिरीच्या उजव्या बाजुला झाडाखाली असलेल्या घुमटीत शेंदुर फासलेला तांदळा असुन त्या शेजारी तुटलेले चुन्याच्या घाण्याचे चाक नजरेस पडते. पुरातत्व खात्याने केलेल्या संवर्धनामुळे किल्ल्याची तटबंदी पूर्णपणे दुरुस्त झाली असुन या तटबंदीवरून संपुर्ण किल्ल्याला फेरी मारता येते. या तटावरील फेरीत संपुर्ण किल्ला पहाता येतो. दरवाजातुन डावीकडील तटबंदीच्या पायवाटेने फिरायला सुरवात केल्यावर सर्वप्रथम वाटेच्या डावीकडे तटाच्या दिशेने एक शेवाळलेले पाणी असलेला लहान हौद पहायला मिळतो. तटबंदीवर फिरताना तोफा ठेवण्याचे चौथरे केवळ बुरुजावरच नव्हे तर काही ठिकाणी तटबंदीवर देखील बांधलेले दिसतात. पायवाटेने पुढे आल्यावर बालेकिल्ल्याच्या खालील भागात दगडी बांधकामातील भलामोठा तलाव असुन या तलावात उतरण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. तलावा शेजारी एका लहान वास्तुचा दरवाजा दिसतो. येथुन बालेकिल्ल्यावरील बांधकाम व त्यातील बुरुज ठळकपणे दिसुन येतो. बालेकिल्ल्यावरील जागा फारच कमी असल्याने येथे दुमजली महालाचे बांधकाम तटबंदीला लागुन केले असुन महालाच्या भिंतीतच बंदुकीच्या मारगीरीसाठी जंग्या बांधलेल्या आहेत. चर्या-कमानी-गवाक्ष-नक्षीदार कोनाडे असे सुंदर बांधकाम असलेला हा महाल व बुरुज आज मोठया प्रमाणात उध्वस्त झाला आहे. तलाव पाहुन आपण किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या बुरुजावर येतो. या बुरुजावर असलेली दुमजली वास्तु आजही शिल्लक असुन दोन दालने असलेल्या या वास्तुच्या एका दालनातुन बुरुजाबाहेर जाण्याचा मार्ग आहे. या बुरुजासमोरील तटबंदीवरून आपण बालेकिल्ल्यात असलेल्या महालात प्रवेश करतो. महालाची मोठया प्रमाणात पडझड झाली असली तरी त्याच्या भिंतीत असलेली गवाक्षे, कमानी व दरवाजे त्याच्या मुळ सौंदर्याची जाणीव करून देतात. महालाच्या सुरवातीला असलेल्या डावीकडील गवाक्षातुन समोरील बुरुजाकडे पहिले असता या बुरुजाच्या तळात बाहेरील बाजुस एक चोरदरवाजा दिसतो पण महालाची मोठया प्रमाणात पडझड झाल्याने या महालातुन त्या दरवाजापर्यंत जाण्याचा मार्ग गाडला गेला आहे. महालाखाली जमीनीत सहा कमानी असलेले तळघर असुन या तळघरात हवा खेळती रहावी यासाठी महालाच्या जमीनीत झरोके आहेत. सध्या या झरोक्यातुन खाली पावसाचे पाणी गळाल्याने तळघरात पाणी साठले आहे. या तळघरात उतरण्यासाठी महालात लहान दरवाजा असुन त्यातुन तळघरात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. हि जागा कैद्यांची अंधारकोठडी म्हणुन ओळखली जाते पण ते शक्य नाही कारण राजनिवासाच्या इतक्या जवळ कैदखाना असणे शक्य वाटत नाही. याच्या पुढील भागात असलेल्या महालाचे दोन मजले असुन यातील तळातील मजला व त्याचा दरवाजा अर्ध्याहुन अधीक जमीनीत गाडले गेले आहेत. महालापुढे बाहेरील भागात एक कोरडा पडलेला लहान बांधीव हौद असुन या हौदाच्या काठावर एक छत्री बांधलेली आहे. या हौदात उतरण्यासाठी बाहेरील बाजूने भुमीगत दरवाजा व पायऱ्या आहेत. छत्रीच्या पुढील भागात असलेल्या उंचवट्यावर बालेकिल्ल्यातील तोफ ठेवण्यासाठी सुटा बुरुज असुन या बुरुजावरून किल्ल्याच्या अंतर्गत भागात तसेच बाहेर नजर ठेवता येते. बुरुजाच्या डावीकडील तटबंदीवरून खाली जाताना तटबंदीमध्ये एक शौचकुप पहायला मिळते. तटावरून सरळ खाली उतरत गेल्यावर आपण किल्ल्याच्या दरवाजात पोहोचतो व येथे आपली गडफेरी पुर्ण होते. पुरातत्व खात्याने संवर्धनासाठी मोठा खर्च केला असला तरी सध्या गडाची निट देखरेख होत नसल्याने गडावर मोठया प्रमाणात झाडी वाढली असुन हा सर्व खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. या झाडीमुळे अनेक वास्तू कोसळलेल्या दिसतात. संपुर्ण गडाला फेरी मारण्यासाठी एक तासाचा अवधी पुरेसा होतो. गवळी राजसत्तेच्या पराभवानंतर १६ ते १८ व्या शतकात मोगलांचे मांडलिक असलेल्या गोंडराजांची विदर्भावर सत्ता होती. १७ व्या शतकात गोंड राजा बख्तबुलंद शहाचा सुभेदार राजखान पठाण या सरदाराने इ.स.१६९० मध्ये या किल्ल्याची निर्मिती केली. गौंड सत्तेच्या अस्तानंतर अंबागड नागपूरकर भोसल्यांच्या ताब्यात आला व शेवटी इंग्रजांच्या ताब्यात गेला. गडाची एकुण सरंक्षण रचना पहाता हा या भागातील एक महत्वाचा किल्ला असावा. या किल्ल्याचा वापर महत्वाचे राजकीय कैदी ठेवण्यासाठी देखील झाल्याचे वाचनात येते. ------------------सुरेश निंबाळकर

अंबागड