भुपतगड

मुंबईमुळे कोकण प्रांताचे उत्तर कोकण व दक्षिण कोकण असे दोन भाग पडले आहेत. वसई ते दमण हा पट्टा उत्तर कोकण म्हणुन तर अलीबाग ते कारवार हा पट्टा दक्षिण कोकण म्हणुन ओळखला जातो. निसर्गसौंदर्याच्या बाबतीत दक्षिण कोकण इतके वरदान लाभुन व मुंबईच्या अगदी जवळ असुनही या भागाचा पर्यटनासाठी म्हणावा तितका विकास झाला नाही. उत्तर कोकणातील पुर्वीचा ठाणे (नव्याने पालघर) जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात गर्द झाडीने वेढलेला भुपतगड किल्ला उभा आहे. मुंबईहुन स्वतःच्या वाहनाने एका दिवसात सहजपणे करता येण्यासारखी हि दुर्गभ्रमंती असुन आदिवासीबहुल असलेल्या या भागात एस.टी.बसची सेवा नियमित नसल्याने शक्यतो खाजगी वाहनाचा वापर करणे उत्तम. मुंबईहुन भुपतगडचा पायथा साधारण १४० कि.मी.अंतरावर असुन मुंबई-वाडा–जव्हार- झाप-चिंचवाडी हा एक मार्ग असुन मुंबई-वाडा–जव्हार-राजेवाडी-कुर्लोद असा दुसरा मार्ग आहे. चिंचवाडी गावातुन किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी कच्चा गाडीमार्ग असल्याने खाजगी वाहनाने गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. भुपतगडावर जाण्यासाठी कुर्लोद व चिंचवाडी हि दोन पायथ्याची गावे असुन कुर्लोद गावातुन आल्यास दीड तासाचा उभा चढ चढुन किल्ल्याच्या दक्षिण दरवाजाने आपला गडावर प्रवेश होतो तर चिंचवाडी गावातुन आल्यास आपण थेट किल्ला असलेल्या टेकाडाच्या पायथ्याशी येतो. चिंचवाडी गावातुन भुपतगड नजरेस पडत नसल्याने कच्च्या रस्त्याने गावासमोरील टेकडीला वळसा घालून आपण भुपतगडाकडे जाणाऱ्या पायवाटेपाशी पोहोचतो. चिंचवाडी गावातुन इथपर्यंत येण्यास अर्धा तास लागतो. येथे गावकऱ्यांनी झेंडा रोवलेला असुन त्या ठिकाणी एक कोरीव शिळा व पादुका कोरलेले दोन दगड पहायला मिळतात. या दगडांना गावकरी सीतेची पावले म्हणुन ओळखतात. येथुन समोरच गर्द झाडीने भरलेला किल्ला व त्याच्या डावीकडील बुरुज आपले लक्ष वेधुन घेतो. गडावर जाणारी पायवाट मळलेली असुन या वाटेने गडाची तटबंदी डाव्या बाजुस ठेवत १५ मिनिटात आपण गडाच्या पुर्वाभिमुख दरवाजात पोहोचतो. गडाचा दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला असुन दरवाजाच्या दोन्ही बाजुस असलेले बुरुज कसेबसे त्यांचे अस्तित्व टिकवून आहेत. किल्ल्याचा डोंगर दक्षिणोत्तर ८ एकरवर पसरलेला गडमाथा समुद्रसपाटीपासुन १५३० फुट उंचावर आहे. दरवाजातुन आत आल्यावर डावीकडे व उजवीकडे अशा दोन वाटा फुटतात.येथुन डावीकडील तटबंदीवरून गडफेरीस सुरवात करावी. या वाटेने आपण गडाच्या उत्तर टोकावरील उध्वस्त बुरुजावर पोहोचतो. या बुरुजाचे केवळ तळातील बांधकाम शिल्लक आहे. हा बुरुज पाहुन तटाच्या दुसऱ्या बाजुने गडाच्या दक्षिण टोकाकडे निघावे. या वाटेने जाताना काही घरांचे चौथरे तसेच उजवीकडील उंचवट्यावर बालेकिल्ल्याची घडीव तटबंदी पहायला मिळते. चौकोनी आकाराच्या या बालेकिल्ल्याला चार टोकाला चार बुरुज आहेत. पण तेथे न जाता सर्वप्रथम गडाच्या दक्षिण टोकावर जावे. गडाचा हा खाली उतरत जाणार भाग असुन हा संपुर्ण भाग रचीव दगडांच्या तटबंदीने बंदीस्त केला आहे पण या तटबंदीत असलेला गडाचा दुसरा दरवाजा मात्र पुर्णपणे उध्वस्त झाला आहे. तटबंदीच्या कडेने तसेच पुढे आल्यावर डोंगरउतारावर बांधलेला तलाव पहायला मिळतो. तलावाच्या केवळ एका बाजुस असलेल्या भिंतीची मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन आत दगडमाती साठली आहे. तलाव पाहुन पुढे आल्यावर बालेकिल्ल्याच्या खालील भागात उतारावर खडकात खोदलेला चार टाक्यांचा समुह पहायला मिळतो. पाण्याची पातळी वाढावी यासाठी टाक्यावरील भिंती तसेच उतरकडील बाजु दगडांनी बांधली आहे. यातील एका टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. वाटेच्या पुढील भागात तटबंदीला लागुन चौकीचे अवशेष तसेच एक मुर्ती ( हनुमान?) पहायला मिळते. मुर्ती पाहुन पुढे बालेकिल्ल्याच्या दिशेने आल्यावर बालेकिल्ल्याचा दरवाजा दिसतो. दरवाजाच्या अलीकडे खडकात खोदलेले एक कोरडे टाके असुन या टाक्याच्या तळाशी जाण्यासाठी दुसऱ्या बाजुस भुमीगत दरवाजा खोदला आहे. बालेकिल्ल्याच्या आतील बाजुस कोणतेही अवशेष दिसुन येत नाही. बालेकिल्ल्यातुन आल्या वाटेने मागे फिरल्यावर आपण प्रवेश केलेल्या दरवाजाजवळ येतो. येथे आपली गडफेरी पुर्ण होते. संपूर्ण गडमाथा फिरण्यास एक तास पुरेसा होतो. गडावरुन त्रिंगलवाडी, हरिहर, त्र्यंबकेश्वर, जव्हार, मोखाडा असा दूरवरचा परिसर दिसतो. भूपतगड किल्ला डहाणू बंदरापासून नाशिक बाजारपेठेत जाणाऱ्या थळघाट या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला असावा. इतिहासात या किल्ल्याचे उल्लेख आढळत नसले तरी जव्हार प्रांताशी असलेली याची जवळीक पहाता हा तेथील कोळी राजांच्या ताब्यात असावा.------------------सुरेश निंबाळकर

जिल्हा - ठाणे

श्रेणी  -  सोपी

दुर्गप्रकार- गिरीदुर्ग