जिल्हा - पालघर

श्रेणी  -  मध्यम

दुर्गप्रकार- गिरीदुर्ग

टकमकगड

मुंबईमुळे कोकण प्रांताचे उत्तर कोकण व दक्षिण कोकण असे दोन भाग पडले आहेत. दक्षिण कोकणात रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग जिल्हे येतात तर उत्तर कोकणात ठाणे पालघर जिल्हे येतात. निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेल्या व मुंबईजवळ असलेल्या उत्तर कोकणात आपल्याला जलदुर्ग,गिरीदुर्ग,वनदुर्ग,स्थळदुर्ग असे सर्व प्रकारचे किल्ले पहायला मिळतात. पुर्वीचा ठाणे (नव्याने पालघर) जिल्ह्यातुन जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद या महामार्गाला लागुन वसई तालुक्यात गर्द झाडीने वेढलेला टकमकगड उभा आहे. मुंबई ठाण्याहून अगदी जवळ असलेला हा किल्ला चढाईसाठी कठीण नसला तरी किल्ल्याखाली असलेले घनदाट जंगल किल्ल्याच्या दुर्गमतेत भर घालते. मुंबईहुन ट्रेनने अथवा स्वतःच्या वाहनाने टकमक गडाची भटकंती एका दिवसात करता येते. सकवार हे टकमक गडाच्या पायथ्याचे गाव मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असुन मुंबईपासून ८० कि.मी.वर महामार्गाच्या उजव्या बाजुस आहे. रेल्वेने टकमकगडास जात असल्यास पश्चिम रेल्वेवरील वसई अथवा विरार स्थानक गाठावे लागते. सकवार गाव वसई रेल्वे स्थानकापासून २२ कि.मी.वर तर विरार रेल्वे स्थानकापासून २० कि.मी. अंतरावर आहे. सकवार गावात प्रवेश करताना गावामागे पुर्व दिशेला दक्षिणोत्तर पसरलेला डोंगर म्हणजेच टकमकगड. या डोंगराची दक्षिणेकडील सोंड गावाच्या दिशेने उतरताना दिसते. या सोंडेवरूनच किल्ल्यावर जाणारी वाट आहे. किल्ल्यावर जाणारी वाट पुर्णपणे मळलेली असली तरी गावामागील शेतातुन या सोंडेखाली जाणारी सपाटीवरील १५ मिनिटाची वाट काहीशी गोंधळात टाकणारी आहे त्यामुळे हि वाट गावातुन नीट समजुन घ्यावी किंवा वाटेला लागेपर्यंत काही वेळासाठी वाटाडया सोबत घ्यावा. एकदा का या वाटेला लागले कि कोठेही चुकण्याची शक्यता नाही. हि वाट आपल्याला थेट गडावरच घेऊन जाते. वाट चढणीची असली तरी तासाभराची हि वाट दाट जंगलातुन जात असल्याने चढाईचा थकवा फारसा जाणवत नाही. नंतरची वाट मात्र उघडया पठारावरून जात असल्याने बऱ्यापैकी थकवते. या वाटेने आपण गडाच्या दक्षिण टोकापासून सुटावलेल्या सुळक्याखाली पोहोचतो. सकवार गावातुन इथपर्यंत येण्यास दीड तास लागतात. या सुळक्याला वळसा घालत हि वाट वर डोंगराच्या दिशेने चढत जाते. या वाटेवर काही ठिकाणी कातळात पायऱ्या खोदल्या आहेत. या वाटेने दहा मिनिटात गडाच्या उध्वस्त तटबंदीतुन आपला गडावर प्रवेश होतो. तटावर आल्यावर तटबंदीच्या डाव्या बाजुस काही अंतरावर गडाचा ढासळलेला उत्तराभिमुख दरवाजा व त्याखाली काही गाडलेल्या पायऱ्या दिसतात. दरवाजाचा आकार पहाता हा गडाचा मुख्य दरवाजा नसावा. तटबंदीवरून गडावर प्रवेश केल्यावर उजवीकडील वाट गडाच्या दक्षिण टोकावर जाते. गडाचे दक्षिण टोक म्हणजे टेहळणीचा बुरुज असुन या टोकावरून सकवार गावातुन गडावर येणारी संपुर्ण वाट तसेच गडाच्या दक्षिण बाजुचा दूरवरचा प्रदेश नजरेस पडते. गडमाथा दक्षिणोत्तर ७ एकरवर पसरलेला असुन समुद्रसपाटीपासुन १७८० फुट उंचीवर आहे. येथुन मागे फिरत तटबंदीकडे येऊन समोरील वाटेने गडफेरीस सुरवात करावी. वाटेच्या सुरवातीस असलेल्या उंचवट्यावर दोन खडकात खोदलेली पाण्याची टाकी असुन या टाक्यात फेब्रुवारीपर्यंत पिण्याचे पाणी असते. टाक्याच्या शेजारी कातळात खोदलेले चर व खड्डे असुन हे चर म्हणजे कातळावरील भिंत रचण्यासाठी पाया तर तर खड्डे भिंतीत खांब रोवण्यासाठी खोदले आहेत. टाकी पाहून डावीकडून पुढे जाताना पायवाटेच्या दोन्ही बाजुला दाट वाढलेल्या कारवीच्या रानात अनेक वास्तूंचे चौथरे दिसतात. वाटेच्य पुढील भागात कड्यावर चौकीचे अवशेष असुन येथे एक वाट उजवीकडे जाते. उजवीकडील या वाटेवर दोन तुटलेल्या तोफा व लहान मंदिराचे अवशेष पहायला मिळतात. तोफा पाहून परत आल्यावर वाटेच्या पुढील भागात एका वाट कड्याला लागुन पुढे जाते तर दुसरी वाट वर पठारावर जाते. डाव्या बाजूच्या कड्यालगत असलेल्या वाटेने पुढे आल्यावर वाटेवर शेवाळलेल्या पाण्यानी भरलेली तीन टाकी दिसतात. टाक्याच्या वरील बाजुस एक टाके अर्धवट खोदलेले आहे. वाटेच्या पुढील भागात एका रांगेत सहा टाकी खोदली आहेत. हि सर्व टाकी दगडांनी बुजलेल्या अवस्थेत असुन या टाक्याच्या काठावर टाकी फोडण्यासाठी सुरुंगाची छिद्रे पाडली आहेत. या भागात खालील बाजुस मोठया प्रमाणात तटाचे दगड पडलेले दिसतात. शेवटचे टाके पाहुन पुढे जात वळसा घालुन टाक्याच्या वरील भागातील उंचवट्यावर यावे. हे गडाचे उत्तर टोक असुन येथुन समोरील डोंगरावर भगवा ध्वज फडकताना दिसतो. मराठे व पोर्तुगिज यांच्यात झालेल्या लढाईत मराठ्यांनी येथुनच दरवाजाकडे पळ काढला होता. गडाचे येथे असलेले प्रवेशव्दार काळाच्या ओघात पुर्णपणे नष्ट झाले असावे अथवा गाडले गेले असावे. या उंचवट्यावर आपल्याला दोन मोठे गोलाकार खड्डे खोदलेले दिसतात. हि बहुदा टकमक गडाची ढालकाठीची म्हणजेच झेंड्याची जागा असावी. या वाटेने मागे फिरून डाव्या बाजुने तटबंदीची फेरी करताना वाटेत खडकात खोदलेली दोन टाकी तसेच मातीने बुजलेले एक टाके पहायला मिळते. येथुन तटबंदीच्या कडेने सुरवातीस पाहिलेल्या दोन टाक्याकडे आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण गडफेरी करण्यास एक तास पुरेसा होतो. गडाच्या माथ्यावरून दक्षिणेला कामणदुर्ग तर पश्चिमेला वैतरणा खाडी दिसते. फेब्रुवारीनंतर गडावर पिण्यासाठी पाणी उरत नाही त्यामुळे गडावर निघण्यापूर्वी सकवार गावातुन पुरेसे पाणी सोबत घेऊनच निघावे. माहिम (केळवे) म्हणजेच पुर्वीचे महकावती या राजधानी पासून घाटावर जाणाऱ्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बिंबदेव राजाचा पुत्र राजा भीमदेव याने १२ व्या शतकात टकमक गडाची उभारणी केली. त्यानंतर हा गड गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात गेला. कोहज-अशेरी गडांबरोबर मराठयांनी जिंकलेला हा गड नंतरच्या काळात पोर्तुगिजांच्या ताब्यात गेला. वसई मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात इ.स.१७३२ मध्ये मराठ्यांनी टकमकगड पोर्तुगिजांकडून जिंकून घेतला पण तहाप्रमाणे हा गड पोर्तुगिजांच्या ताब्यात राहीला. नंतरच्या काळात वसई मोहिमेत ८ एप्रिल १७३७ रोजी पंताजी मोरेश्वर यांनी हा किल्ला पोर्तुगिजांकडून जिंकून घेतला. टकमक गडाचा सरंजाम म्हणुन चिमाजी अप्पांनी त्यांना २५ गावे नेमुन दिली. १८ व्या शतकाच्या सुरवातीस इंग्रजांनी कैदखाना म्हणून या किल्ल्याचा वापर केला पण १८५७ च्या उठावानंतर इतर अनेक किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्यावरील इमारती,पाण्याची टाकी व वर जाण्याचे मार्ग सुरुंग लावुन उध्वस्त केले.-----------सुरेश निंबाळकर