मस्तगड

जिल्हा - जालना

श्रेणी  -  सोपी

दुर्गप्रकार- भुईकोट

जालना शहराच्या मध्यभागी मस्तगड नावाचा अपरीचीत किल्ला आहे. दुर्गप्रेमींच्या यादीत नसलेला हा किल्ला खुद्द जालना शहरात राहणाऱ्या अनेकांना माहीत नाही. जालना नगरपरिषदेच्या ताब्यात असलेल्या या किल्ल्याची आज केवळ दुर्लक्षामुळे वाताहत झाली आहे. नगरपरिषदेचे येथे असलेले कार्यालय आता दुसरीकडे स्थलांतरीत झाले असुन या ठिकाणाला कुणीही वाली उरला नाही. कुंडलिका नदीकाठी असलेला बालेकिल्ल्याचा हा भाग शहरातील उंचवट्यावर असल्याने येथे शहराला पाणीपुरवठा करणारी टाकी बांधलेली आहे. निजाम उल मुल्क याने १८ व्या शतकाच्या सुरवातीस जालना शहरात बांधलेल्या या किल्ल्याचा आज केवळ बालेकिल्ला शिल्लक आहे. हा भाग मस्तगड या नावानेच ओळखला जात असल्याने आपण येथे येऊन पोहोचतो पण किल्ला मात्र कुणालाही ठाऊक नाही त्यामुळे येथे आल्यावर नगरपालिकेचे जुने कार्यालय अशी चौकशी करावी. चौकोनी आकाराचा हा किल्ला साधारण २ एकर परिसरात पसरलेला असुन किल्ल्याची रस्त्याकडील तटबंदी वगळता उर्वरित तीन बाजुची तटबंदी आजही शिल्लक आहे. किल्ल्याचे तळातील बांधकाम घडीव दगडांनी चुन्यामध्ये केलेले असुन वरील बांधकाम मात्र विटांमध्ये केलेले आहे. बालेकिल्ल्याच्या पुर्वाभिमुख दरवाजाची कमान व त्यातील लाकडी दरवाजे आजही शिल्लक असुन दरवाजाच्या कमानीवर हा दरवाजा असफजहाने १७२३ मध्ये् बांधल्याचा पर्शियन भाषेतील शिलालेख कोरला आहे. नगरपरिषदेची वहाने आत ये-जा करण्यासाठी हा दरवाजा कायमचा बंद करून त्याशेजारील तटबंदी फोडुन आत जाण्यासाठी रस्ता बांधण्यात आला आहे. येथूनच आपला किल्ल्यात प्रवेश होतो. बालेकिल्ल्यात नगरपालिकेचे कार्यालय बांधताना आतील इमारती भुईसपाट करण्यात आल्या असाव्यात पण इतर वास्तु म्हणजे किल्ल्याची तटबंदी,त्यावरील फांजी,तटातील ओवऱ्या व जंग्या या सर्व गोष्टी आजही शिल्लक आहे. किल्ल्यात प्रवेश करताना या सर्व गोष्टी पहायला मिळतात. किल्ल्यात शिरल्यावर उजवीकडील तटबंदीला लागुन नदीच्या दिशेने असलेल्या बुरुजावर जाता येते. या बुरुजावरून आपल्याला नदीच्या दिशेने असलेले उर्वरित दोन बुरुज पहायला मिळतात. याशिवाय किल्ल्याच्या पश्चिमेला असलेल्या मधल्या बुरुजावर एका सुफी संताची कबर आहे. या कबरीशेजारी तटावर उर्दु भाषेत लेख कोरलेला आहे. किल्ल्याच्या आवारात एका चौथऱ्यावर दोन मध्यम आकाराच्या तोफा पहायला मिळतात. किल्ल्याला बाहेरील बाजूने फेरी मारल्यास नदीकडील बाजुस तीन,पश्चिमेला दोन तर पुर्वेला एक असे सहा बुरुज किल्ल्याच्या तटबंदीत पहायला मिळतात. नदीच्या बाजूने या तटबंदीची उंची साधारण ३५ फुट आहे. मध्ययुगीन काळात जालना हे एक गजबजलेले शहर व महत्वाची बाजारपेठ होती. या शहरात मोठया प्रमाणात विणकामाचा व्यवसाय चालत होता. जालना शहराचे मूळ नाव हिरवळ असल्याचा उल्लेख लीळाचारित्रात येतो. काळाच्या ओघात त्यात जालनापुर-जालना असे बदल होत गेले. अकबराच्या काळात जालना शहर मुघलांच्या ताब्यात होते. अकबरनामा या ग्रंथाचा कर्ता अबू फजल काही काळासाठी या ठिकाणी वास्तव्यास होता. त्यानंतर हा भाग निजामशाहीत सामील झाला. मलिकअंबरच्या काळात या शहराचा मोठया प्रमाणात विकास झाला.त्याच्या काळात जमशेदखान याने जालना शहराच्या पश्चिमेस मोती तलाव खोदला तसेच शहरात धर्मशाळा बांधल्या. शहरातील मक्का दरवाजाजवळ काळी मशीद याच्या काळात उभारली गेली. याशिवाय त्याने शहरात ५ लहान तलाव बांधले. दिलेरखान विजापुरावर चालुन आला असता महाराजांनी भिमानदीपासुन गोदावरी नदीपर्यंत मोगलांचा मुलुख लुटला. धरणगाव, चोपडा शहरे लुटल्यावर १६ नोव्हेंबर १६७९ रोजी ते औरंगाबादच्या उत्तरेस कुंडलीका नदीकाठी असलेल्या जालना शहरात आले. यावेळी शहजादा मुअज्जम जवळच असलेल्या औरंगाबाद शहरात होता पण त्याची पर्वा न करता महाराजांनी जालना शहरावर हल्ला चढवला व संपूर्ण शहर लुटून साफ केले. हि लुट चार दिवस चालू होती. हि लुट करून २२ नोव्हेंबर १६७९ रोजी संपुर्ण लुटीसहीत महाराज व मराठा सैन्य अकोल्याजवळील पट्टा किल्ल्यावर पोहचले. जालना शहर हे मोगलांची एक मोठी बाजारपेठ असल्याने या संपुर्ण शहराभोवती कोट होता व या कोटाला मुर्ती वेस व मिर्झा (हैद्राबाद) दरवाजा असे दोन दरवाजे होते. शहराची वाढ झाल्याने या नगरकोटाची संपुर्ण तटबंदी नष्ट झाली असली तरी किल्ल्याचे दोन्ही दरवाजे आजही अस्तिवात आहेत. यावेळी मस्तगड अस्तित्वात नव्हता. निजाम उल मुल्क असफजहा याने इ.स.१७२३ मध्ये काबीलखान या आपल्या सरदारास जालना शहरात किल्ला बांधण्यास सांगितले व त्याने शहराच्या पुर्वेस कुंडलीका नदीकाठी असलेल्या उंचवट्यावर किल्ला बांधला. हाच किल्ला आज मस्तगड म्हणुन ओळखला जातो. पेशवेकाळात जालन्याचा महसुल मराठे गोळा करत पण सत्ता बदलल्याने त्यात अनेकदा बदल होत असत. काही काळ येथे शिंदे घराण्याचे वर्चस्व होते. इ.स.१८०३मध्ये भोकरदन जवळील असईच्या लढाईत कर्नल स्टीव्हनसन याने मराठयांचा पराभव केल्याने मराठ्यांचे या भागातील वर्चस्व कमी झाले व हा प्रांत निजामाच्या ताब्यात गेला. स्वतंत्र भारतात मराठवाडा मुक्ती संग्रामानंतर जालना तालुका औरंगाबाद जिल्ह्याला जोडला गेला.------सुरेश निंबाळकर