प्राचीन इतिहास असलेल्या सांगली जिल्ह्याने शिलाहार,चालुक्य, यादव, बहमनी,आदिलशाही, मुघल व मराठा सत्तांचा उत्कर्ष व ऱ्हास अनुभवला. सांगली शहराच्या नावाबद्दल अनेक वेगवेगळी मते आहेत. मध्ययुगीन काळात हा प्रदेश कुंडल या नावाने ओळखला जाई. सध्या कुंडल नावाचे एक लहान गाव सांगली शहराजवळ आहे. इ.स.बाराव्या शतकात चालुक्य साम्राज्याचे कुंडल हे राजधानीचे ठिकाण होते. काहींच्या मते कृष्णा नदी काठावर असलेल्या सहा गल्ल्यामुळे या ठिकाणास सांगली नाव पडले तर काहींच्या मते येथे असलेल्या गावाला कानडी भाषेत सांगलकी म्हणत त्याचे मराठीत सांगली असे झाले. एका कथेनुसार वारणा व कृष्णा नद्यांचा संगम येथे होत असल्याने संगम शब्दाचा अपभ्रंश होऊन सांगली हे नाव पडले. शिवाजी महाराजांचे सेनापती नेताजी पालकर यांनी १६६९ साली आदिलशहाकडून सांगली, मिरज व ब्रह्मनाळ जिंकून घेतले. थोरल्या माधवराव पेशव्यांनी १७७२ मध्ये गोविंदराव पटवर्धनांना मिरजेचा किल्ला आणि आसपासचा प्रदेश जहागीर म्हणून दिला. पेशवाईच्या काळात सांगली हे मिरज संस्थानाचाच एक भाग होते. या संस्थानांवर पटवर्धन घराण्याची सत्ता होती. परशुरामभाऊ पटवर्धन यांच्या मृत्यूनंतर १८०१ साली पटवर्धन कुटुंबात गृहकलह निर्माण झाल्याने मिरज जहागिरीची वाटणी झाली. त्यात सांगली मिरजपासुन वेगळी झाली. हि घटना पेशवाईच्या उत्तरार्धात घडली. मिरज या मुळ जहागिरीतुन वेगळे होत चिंतामणराव पटवर्धन यांनी वेगळे संस्थान निर्माण केलं आणि सांगली या कृष्णाकाठच्या गावात त्याची राजधानी स्थापन केली. सांगलीचे संस्थानाचे हे मुळपुरुष. एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीस त्यांनी नियोजनपूर्वक सांगली शहर वसविले व गावाच्या संरक्षणासाठी गणेशदुर्ग हा भुईकोट उभारला. ८ मार्च १९४८ रोजी सांगली संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले. कृष्णेकाठी वसलेले सांगली शहर हे सांगली जिल्ह्याचे मुख्यालय असून गावात मध्यभागी गणेशदुर्ग हा किल्ला आहे. साधारण २० एकरमध्ये पसरलेल्या अष्टकोनी आकाराच्या या किल्ल्याभोवती असलेला खंदक आज मोठया प्रमाणात बुजलेला असुन केवळ दोन बाजुंनी हा खंदक शिल्लक आहे. किल्ल्याभोवती फेरी मारताना या खंदकाजवळील दोन बुरुज तसेच मुख्य प्रवेशद्वाराशेजारील दोन बुरुज व दरवाजासमोरील गणेश बुरुज असे पाच बुरुज आज पहायला मिळतात. यातील चार बुरुज किल्ल्याच्या तटबंदीत असुन दरवाजासमोर असलेला गणेश बुरुज मात्र तटबंदीपासुन वेगळा आहे. सांगली शहरातील राजवाडा चौकासमोरच आपल्याला गणेशदुर्गाचे मुख्य प्रवेशद्वार व त्याशेजारील दोन बुरुज पहाण्यास मिळतात. किल्ल्याचा बहुतांशी भाग शहरीकरणात झाकोळला असला तरीही तटबंदी आणि प्रवेशद्वार मात्र सुस्थितीत आहे. किल्ल्याच्या मुळ बांधकामात असलेला हा एकमेव उत्तराभिमुख दरवाजा. या मुख्य दरवाजाला संरक्षण देण्यासाठी त्याच्या अलीकडे दोन लहान बुरुज बांधुन दरवाजाला आडोसा निर्माण करण्यात आला आहे. या प्रवेशद्वारास असलेला लाकडी दरवाजा आजही सुस्थितीत असुन त्यावर अणकुचीदार खिळे ठोकलेले आहे. दरवाजाच्या वरील बाजुस नगारखाना असुन आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. या दरवाजासमोरच एक भलामोठा स्वतंत्र बुरुज आहे. या सर्व बांधकाम मराठा शैलीत आहे. या बुरुजाच्या पुढील भागात तीन कमानी असलेला दरवाजा आहे. या दरवाजाच्या बांधकामावर मात्र आंग्लशैलीचा प्रभाव जाणवतो. या कमानीतुन प्रवेश केल्यावर समोरच दरबार हॉलची इमारत दिसुन येते. दरबार हॉलच्या बाहेरील बाजुस लोखंडी चाके असलेल्या दोन तोफा पहायला मिळतात. दरबार हॉलच्या आतील बाजुस असलेल्या राजगादीच्या ठिकाणी गणेशाची मुर्ती स्थापन करण्यात आली आहे. दरबार हॉलसारखी वारसांच्या ताब्यात असलेली इमारत वगळता किल्ल्याचा बहुतांशी भाग सरकारी कचेऱ्या व लहान-मोठी दुकाने यांनी व्यापून टाकला आहे. किल्ल्यात एक लहानसे संग्रहालय देखील पहायला मिळते. किल्ल्यात नव्याने दक्षिण व पुर्व बाजुस दोन दरवाजे पाडण्यात आले आहेत.--------------सुरेश निंबाळकर

सांगली- गणेशदुर्ग

जिल्हा - सांगली

श्रेणी  -  सोपी

दुर्गप्रकार- भुईकोट