मळणगाव

महाराष्ट्राला गडकिल्ल्याचा वारसा इतक्या मोठया प्रमाणात लाभला आहे कि कित्येक गढीकोटांची नोंद सरकारी दफ्तरात किंवा दुर्गप्रेमींच्या यादीतही दिसत नाही. मराठयांच्या उत्तरकाळात पेशवे सत्तेच्या केंद्रस्थानी असताना महाराष्ट्रात बरेच भुईकोट व गढ्या बांधल्या गेल्या. यातील काही भुईकोट वाडे हे खाजगी स्वरूपाचे असुन त्यांचा उपयोग महसूल जमा करण्यासाठी व स्वसंरक्षणसाठी होत होता. वतने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या या गढीकोटाची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने बहुतांशी गढीकोट उध्वस्त होत चालले आहेत तर काही ठिकाणी वाढत्या कुटुंबामुळे व कामधंद्याच्या निमित्ताने गढीमालक इतरत्र स्थलांतरीत झाल्याने गढ्या ओस पडुन इतिहास जमा झाल्या आहेत. स्थानिकांची या वास्तुप्रती असलेली उदासीनता देखील या गढीकोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे. कागदोपत्री गढी अथवा कोट अशी कोणतीही नोंद नसलेली मळणगाव गावात असलेली गढी त्यापैकी एक. या गढीवजा कोटाची माहिती आंतरजाल व इतर कोठेही सापडत नसल्याने या गढीची ओळख करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात मळणगाव येथे असलेल्या या गढीला भेट देण्यासाठी आपल्याला सांगली-मिरज अथवा कवठेमहांकाळ शहर गाठावे लागते. मळणगाव सांगली-मिरज पासुन ३२ कि.मी.अंतरावर असुन कवठेमहांकाळ मळणगाव अंतर १२ कि.मी. आहे. मळणगावात हि गढी शिंदे सरकार वाडा म्हणुन ओळखली जाते. साधारण आयताकृती आकार असलेली हि गढी एक एकर परीसरात पसरलेली असुन गढीची मोठया प्रमाणात पडझड झाल्याने तिच्या बांधकामाबाबत नेमका अंदाज करता येत नाही. एका लहान उंचवट्यावर बांधलेल्या या गढीच्या काही भिंती व दोन बुरुज आजही काही प्रमाणात शिल्लक असुन इतर बांधकाम मात्र पुर्णपणे नष्ट झाले आहे. गढीचे शिल्लक बांधकाम पहाता गढीची २० फुट उंच तटबंदी ओबडधोबड दगडांनी बांधलेली असुन बांधकामात चिकणमातीचा वापर केला आहे. गढीच्या आतील भागात मोठया प्रमाणात काटेरी झाडी वाढलेली असल्याने आपल्याला गढीच्या आतील भागात मोठया कष्टाने शिरावे लागते.आत नव्याने बांधलेली एक घुमटी असुन त्यात तांदळा स्थापन केलेला आहे. गढीत पाण्याची कोणतीही सोय दिसुन येत नाही. गढीच्या परीसरात गढीचे मालक शिंदे यांचे काही वंशज आजही वास्तव्यास असुन त्यांची घरे आहेत. संपुर्ण गढी पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो. काही काळाची सोबती असलेल्या ह्या गढीचे साक्षीदार होण्यासाठी या गढीला लवकरात लवकर भेट दयायला हवी.--------------सुरेश निंबाळकर

जिल्हा - सांगली

श्रेणी  -  सोपी

दुर्गप्रकार- भुईकोट