हलीयाळ

धारवाड जिल्ह्यात असलेले हलीयाळ हे तालुक्याचे शहर महाराष्ट्रात तसे फारसे कुणाला माहीत नाही पण मराठा साम्राज्य ज्यावेळी तुंगभद्रा कावेरी पर्यंत पसरले होते त्यावेळी हलीयाळ मराठा साम्राज्याचा एक भाग होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हलीयाळ येथे कोट बांधल्याचे अथवा दुरुस्त केल्याचे उल्लेख येतात. हलीयाळ हे तालुक्याचे शहर असल्याने कर्नाटकातील बहुतेक मुख्य शहरांशी जोडले गेले आहे. बेळगावपासून हे शहर ८० कि.मी. वर असुन धारवाडहुन ३५ कि.मी. अंतरावर आहे. हलीयाळ शहरात असलेल्या सोमेश्वर तलावाच्या काठावरच हलीयाळ किल्ला वसलेला आहे. किल्ल्याचा परिसर साधारण २४ एकरवर पसरलेला असुन गोलाकार आकाराच्या या किल्ल्यात खंदक, बुरुज, तटबंदी,मंदीर असे मोजकेच अवशेष शिल्लक आहेत. किल्ल्याच्या आत वनविभागाचे कार्यालय तसेच उदयान असुन त्याने किल्ल्याचा बराच भाग व्यापलेला आहे. हलीयाळ गावातुन जाताना आपण उध्वस्त पुर्वाभिमुख दरवाजातून किल्ल्यात प्रवेश करतो. किल्ल्याचा दरवाजा आज पुर्णपणे नष्ट झाला असुन त्या ठिकाणी आता नव्याने कमान उभारण्यात आली आहे. या दरवाजाच्या आसपास किल्ल्याची ओबडधोबड दगडातील तटबंदी पहायला मिळते. तटबंदीची उंची पहाता येथे असलेला दरवाजा चांगलाच प्रशस्त असावा. दरवाजाच्या आतील दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन त्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. गोमुखी बांधणीच्या या दरवाजाच्या आतील बाजुस असलेला दुसरा दरवाजा देखील नष्ट झाला असुन या दरवाजाशेजारी दोन्ही बाजुस उंच बुरुज आहेत. या दोन्ही दरवाजामधील भागात रणमंडळाची रचना केलेली आहे. यातील डावीकडील बुरुजात बुजलेले कोठार असुन दरवाजाच्या आतील बाजुस उजवीकडील बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दरवाजा पाहुन सरळ रस्त्याने पुढे निघाल्यावर उजवीकडे वनखात्याचे उदयान आहे तर डावीकडे वनखात्याचे कार्यालय व त्यापुढे विश्रामगृह आहे. रस्त्याच्या उजवीकडे पुर्णपणे वनखात्याचे उदयान असुन त्याच्या टोकावर ढासळलेली तटबंदी वगळता काहीही शिल्लक नाही. विश्रामगुहाच्या मागील बाजुस गेल्यास एक जुनी विहीर पहायला मिळते. या विहिरीला नव्याने कठडा बांधलेला आहे. विहीरीच्या पुढील भागात गडाची पश्चिम भागातील तटबंदी आहे. तटबंदी मोठ्या प्रमाणात ढासळलेली असुन तटावर चढल्यावर किल्ल्याच्या बाहेरील बाजुस असलेला खंदक पहायला मिळतो. तटबंदी पाहुन पुन्हा रस्त्यावर येऊन सरळ पुढे गेल्यास आपल किल्ल्याच्या दुसऱ्या टोकास पोहोचतो. येथे डावीकडे एक दर्गा असुन दर्ग्याच्या वाटेवर एक झिजलेला शिलालेख तर दर्ग्यामागे पाण्याचे तळे आहे. रस्त्याच्या उजवीकडे सोमेश्वर मंदीर असुन मंदिराच्या अलीकडे तटावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. या पायऱ्याच्या सुरवातीस दोन बाजुस कन्नड भाषेत कोरलेले दोन मोठे शिलालेख असुन एक शिलालेख स्पष्ट तर दुसरा झिजलेला आहे. येथील तटबंदी बऱ्यापैकी शिल्लक असुन तटाच्या बाहेरील बाजुस दूरवर पसरलेला सोमेश्वर तलाव आहे. या तलावाचा या दिशेस खंदक म्हणुन वापर केलेला आहे. या भागातील तटबंदी व रचना पहाता या ठिकाणी किल्ल्याचा दुसरा दरवाजा असावा. तलावाच्या काठावरील सोमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केलेला असुन मंदिराच्या काही प्राचीन शिल्प पहायला मिळतात. यात एक विरगळ व गजलक्ष्मी शिल्प उल्लेखनीय आहे. याठिकाणी आपली तासाभराची गडफेरी पुर्ण होते. गडाचा फारसा इतिहास ज्ञात नसला तरी इ.स.१६८० साली शिवाजी महाराजांनी धारवाड भाग स्वराज्यास जोडला त्यावेळी हलीयाळ किल्ल्याची बांधणी अथवा पुनर्बांधणी केल्याचे उल्लेख येतात. नंतरच्या काळात हा किल्ला मोगलांच्या ताब्यात व नंतर करवीरकरांच्या ताब्यात आला. बाबूजी नायक व फत्तेसिंग भोसले यांचा या भागावर फारसा प्रभाव पडत नाही हे पाहुन इ.स.१७४७ साली सदाशिवरावभाऊनी सखाराम बापू व महादजीपंत पुरंदऱ्यासोबत या भागात स्वारी केली. त्यांनी तुंगभद्रेपर्यंत जाऊन कित्तुर, गोकाक, परसगड, बदामी, बागलकोट, तोरगळ, हलीयाल, नारगुंद, यादवाड, बसवपट्टण असे ३५ परगणे काबीज करत सावनूरकर नवाब व या भागातील देसाईंना जरब बसवली. नंतर मात्र या किल्ल्याचे फारसे उल्लेख दिसुन येत नाही. स्थानिकांशी संवाद साधताना भाषेतील अडचणीमुळे फारशी माहीती देखील मिळत नाही.----------सुरेश निंबाळकर

जिल्हा - धारवाड

श्रेणी  -  सोपी

दुर्गप्रकार- भुईकोट