पारसगड

जिल्हा - बेळगाव

श्रेणी  -  सोपी

दुर्गप्रकार- गिरीदुर्ग

महाराष्ट्र व कर्नाटकात प्रसिद्ध असलेले यल्लम्मा देवीचे ठिकाण बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यात आहे. महाराष्ट्रातुन मोठया प्रमाणात भाविक व पर्यटक यल्लम्मा देवीचे मंदीर असलेल्या या डोंगराला भेट देतात पण याच डोंगरसपाटीवर मंदिरापासून काही अंतरावर शिवाजी महाराजांनी दुरुस्त केलेला पारसगड किल्ला असल्याचे कोणाला ठाऊक नसते. गडपायथ्याशी असलेल्या येडरावी गावामुळे येडरावी किल्ला म्हणुन ओळखला जाणारा पारसगड किल्ला मंदिरापासून केवळ ४ कि.मी.अंतरावर आहे. स्वराज्यात असणारा हा प्रांत भाषावार प्रांतरचना करताना कर्नाटक राज्याला जोडला गेला. बेळगाव जिल्ह्यातील बहुतांशी किल्ले हे भुईकोट अथवा गढी प्रकारातील असुन एखादा दुसरा अपवाद वगळता उंच गिरीदुर्ग फारच कमी आहेत. गिरीदुर्ग म्हणता येतील असे किल्ले लहानशा उंचवट्यावर अथवा टेकडीवर आहेत. पारसगड देखील असाच एका कमी उंच टेकडीच्या पश्चिम काठावर बांधलेला असुन या टेकडीला मोठया प्रमाणात पठार लाभलेले आहे. सौंदत्ती हे तालुक्याचे शहर बेळगावपासुन ८७ कि.मी. अंतरावर असुन शहरात प्रवेश करताना शहरामागील डोंगरावर पारसगड किल्ल्याचे बुरुज तटबंदी दिसायला सुरवात होते. सौंदत्ती येथुन गडावर जाण्यासाठी दोन मार्ग असुन येथुन ३ कि.मी.वर असलेल्या येडरावी गावात गेल्यास काही पायऱ्या चढुन १५ मिनिटात आपण गडाच्या पश्चिम दरवाजाने गडावर प्रवेश करतो तर खाजगी वाहनाने यल्लम्मा देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याने ५ कि.मी.अंतरावर पठारावरील गडाच्या पश्चिम दरवाजात जाता येते. गडाचा पठाराकडील भाग १६५० फुट लांब तटबंदी व त्यात १० बुरुज बांधुन संरक्षित करण्यात आला आहे. ओबडधोबड दगडात बांधलेल्या या तटबंदीची उंची साधारण १५-१८ फुट असुन त्यात बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या बांधलेल्या आहे. येथुन गडावर प्रवेश करण्यासाठी ५ रुपये प्रती व्यक्ती प्रवेशशुल्क आकारले जाते. आत कोणत्याही प्रकारच्या सुविधा व स्वच्छता नसुन हे कशासाठी आकारले जाते ते कळत नाही. गडाच्या मुख्य दरवाजासमोर गोमुखी बांधणीतील दुसरा दरवाजा असुन हे दोन्ही बांधकाम वेगवेगळ्या काळातील आहे. या गोमुखी दरवाजाची बांधणी बहुधा शिवकाळातच करण्यात आली असावी. हा दरवाजा दोन बुरुजामध्ये बांधलेला असुन बुरुजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या तसेच तटावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. येथुन आतील मुख्य दरवाजाकडे जाणारा मार्ग अतिशय चिंचोळा असुन दोन्ही बाजूने पुर्णपणे बंदीस्त आहे. या वळणदार मार्गाने आपण गडाच्या पुर्वाभिमुख मुख्य दरवाजासमोर पोहोचतो. हा दरवाजा देखील दोन बुरुजात बांधलेला असुन त्या शेजारील बुरुजात आत जाण्यासाठी दुसरा लहान दरवाजा आहे. संपुर्ण गडाची तटबंदी ओबडधोबड दगडांनी बांधलेली असली तर हा दरवाजा मात्र घडीव दगडात बांधलेला आहे. दरवाजाच्या आतील बाजुस आल्यावर तटावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. या पायऱ्यांनी मुख्य दरवाजाच्या वरील भागात आल्यावर संपुर्ण किल्ला पहायला मिळतो. समुद्रसपाटीपासून २७५० फुट उंचावर असलेल्या या किल्ल्याच्या मध्यभागी दोन बुरुजांचा भग्न राजवाडा असुन २-४ उध्वस्त चौथरे वगळता कोणतीही वास्तु दिसुन येत नाही. किल्ल्याचा परिसर ४० एकरवर पसरलेला असुन एका घळीने दोन भागात विभागलेला आहे. घळीच्या उतारावर काही पायऱ्या बांधलेल्या दिसतात. टेकडीखालुन पठारावर येण्यासाठी या घळीतून वाट आहे. दरवाजा पाहुन घळीच्या दिशेने जाताना उजवीकडे उध्वस्त हनुमान मंदीर आहे. या मंदिरामागे काही अंतरावर दोन उध्वस्त चौथरे आहेत. घळीकडे जाणारी वाट चांगली मळलेली असुन काही ठिकाणी बांधीव आहे. वाटेने पुढे आल्यावर ५ मिनिटात आपण वाड्याशेजारी येतो. १५० x १५० फुट चौकोनी आकाराचा हा वाडा आज मोठया प्रमाणात भग्न झाला असुन त्याचा पुर्व दिशेस असलेला दरवाजा आज पुर्णपणे नष्ट झाला आहे. येथुन काही पायऱ्या उतरून आपण घळीच्या वरील बाजुस येतो. येथे घळीच्या उतारावर आडवी भिंत घालुन वरील बाजुने वहात येणारे पाणी अडविले आहे. येथे जास्त प्रमाणात पाणीसाठा करण्यासाठी घळीतच मोठे टाके खोदलेले आहे. घळीत उतरण्यासाठी सिमेंटच्या पायऱ्या बांधल्या असुन घळीमुळे पठाराचे दोन भाग झाले आहेत. पठाराच्या या दोन्ही बाजु तटाबुरुजांनी बंदीस्त केलेल्या आहेत. यातील उजवीकडील पठारावर उत्तरेच्या बाजुस कोपऱ्यावर तिहेरी तटबंदी दिसुन येते. तर डावीकडील पठारावर वस्तीचे अवशेष दिसुन येतात. पठाराच्या या दोन्ही भागावर एकुण १२ बुरुज आहेत. घळीतील पायऱ्या उतरून आपण घळीच्या तोंडावर बांधलेल्या किल्ल्याच्या पश्चिमाभिमुख दरवाजात येतो. कमानीदार असलेला हा दरवाजा आजही सुस्थितीत असुन याच्या वरील बाजुस ध्वजस्तंभ आहे. दरवाजाच्या वरील बाजुस असलेल्या भिंतीत बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या आहेत. येथुन घळीत उतरणारा पायरीमार्ग तीव्र उताराचा असुन दोन्ही बाजुस भिंत घालुन बंदीस्त केलेला आहे. या भिंतीत दोन ठिकाणी लहान कमानी असुन या कमानीतुन बाहेर गेल्यास कातळात कोरलेल्या पहारेकऱ्याच्या गुहा आहेत. पायऱ्या उतरून आपण कडयाला लागुन असलेल्या थोडयाशा सपाटीवर येतो. हा भाग कमी उंचीवर असल्याने पुर्णपणे तटबुरुजांनी बंदीस्त केलेला आहे. खाली उतरताना डाव्या बाजुस या तटबंदीत गडाचा पाश्चिमाभिमुख दरवाजा आहे. येडरावी गावातुन येणारी वाट या दरवाजातुन वर येते पण या वाटेचा कोणी फारसा वापर करताना दिसत नाही. गडाच्या या सपाटीवर कातळाच्या पोटात खोदलेली गुहा असुन या गुहेत जमदग्नी,परशुराम यांच्या मुर्ती असुन इतर काही देवतांच्या मुर्ती आहेत. या गुहेशेजारी पाण्याने भरलेली दुसरी मोठी नैसर्गिक गुहा असुन स्थानिक लोक या गुहेस रामतीर्थ म्हणुन ओळखतात. या गुहेतील पाणी तीर्थ म्हणुन पिण्यासाठी वापरतात. पठारावरून संपुर्ण किल्ला फिरत खाली सपाटीवर येण्यास साधारण दोन तास लागतात. येथुन पायऱ्यांच्या वाटेने १० मिनिटात येडरावी गावात जाता येते. बेळगावमधील हुळी मागोमाग दुसरे प्राचीन शहर म्हणजे सौंदत्ती. बेळगाव परिसरावर राष्ट्रकुट, रट्ट, शिलाहार, विजयनगर, देवगिरी, बहामनी, निजाम, आदिलशाही, मोंगल, मराठे, ब्रिटीश यासारख्या अनेक राजवटींची सत्ता होती. सौंदत्ती शहरात इ.स.८७५ ते १२२९ या दरम्यानचे सहा शिलालेख सापडले आहेत. त्यांत या गांवाचा उल्लेख सुगंधवतीं, सबंधवट्टी, आणि सवधवट्टी असा केलेला आढळतो. त्यावेळीं हें प्रांताचे मुख्य ठिकाण होतें. येथील रट्ट राजे बेळगांवला स्थानांतरित होईपर्यंत म्हणजे इ.स.१२१० पर्यंत सौदंत्ती हे (इ.स.८५०-१२५०) त्यांच्या राजधानीचें शहर होतें. येथे सांपडलेल्या शिलालेखांवरून रट्ट राजे जैन धर्मीय असुन त्यांनी इ.स.८७६ आणि इ.स.९८१ मध्यें दोन जैन मंदिरें येथे बांधली असें दिसतें. येडरावी गावातील भरमप्पा मंदिराजवळ एका चौथऱ्यावर शके ९०१ साली कोरलेला शिलालेख असुन यात येडरावी गावाचा उल्लेख इलारामे असा येतो. येथें इ.स. १२३० च्या सुमारास मल्लिकार्जुनाचें एक शैव दैऊळ बांधलेलें आहे. शिवकाळात आदिलशहाच्या अंमलाखाली असलेला हा भाग मराठयांच्या ताब्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजानी १६७४मध्ये दक्षिण मोहिम हाती घेतली. त्यावेळेस बेळगाव जिंकून हुबळीस जाताना सौंदत्ती जवळील पारसगड किल्ला दुरूस्त केल्याची नोंद येते. महाराजांच्या मृत्यूनंतर हा भाग मोगलांकडे गेला पण १७०७ ला औरंगजेबच्या मृत्यूनंतर हा किल्ला मराठय़ांच्या अंमलाखाली आला. त्यानंतर म्हैसूरच्या हैदरअलीने हा किल्ला ताब्यात घेतल्यावर येथील देसाई त्याला सामील झाले परंतु लवकरच पेशव्यानी हैदरअलीकडून हा किल्ला ताब्यात घेतला.-------------सुरेश निंबाळकर