नेर्ली

संकेश्वर- गोकाक महामार्गाने हुक्केरीकडे जाताना संकेश्वरहुन ८ कि.मी.अंतरावर नेर्ली नावाचे लहानसे गाव आहे. या गावात इनामदाराची गढी म्हणुन ओळखली जाणारी किल्लेवजा गढी आहे. गढीच्या आत इनामदारांचा वाडा असुन जिंर्ण झालेली हि वास्तु आजही वापरात आहे. ह्या संपुर्ण गढी भोवती खंदक खोदलेला असल्याने हि गढी असावी कि भुईकोट यावर प्रश्नचिन्ह उभे रहाते. बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यात असलेली हि गढी हुक्केरी या तालुक्याच्या ठिकाणापासुन ७ कि.मी.अंतरावर आहे. नेर्ली गावात आल्यावर इनामदारांचा किल्ला विचारल्यावर आपण थेट गढीच्या दरवाजासमोर असलेल्या खंदकाजवळ पोहोचतो. खंदकाचा हा भाग आता मातीने बुजवलेला असुन पायवाटेने आपण गढीच्या दरवाजात पोहोचतो. पायवाटेच्या दोन्ही बाजुस असलेल्या खंदकात आजही काही प्रमाणात पाणी जमा असल्याचे दिसते. खंदक पार केल्यावर उजव्या बाजुस दगडी बांधकामातील एक लहान मंदीर पहायला मिळते. या मंदिरापुढे नव्याने सभामंडप बांधलेला आहे. येथुन पुढे तटबंदीतील बंदीस्त वाटेने आपण गढीत प्रवेश करतो. येथे वाटेच्या उजव्या बाजुस दुसरे लहान मंदीर असुन त्यात देवीचा तांदळा स्थापन केला आहे. गढीचा आतील एकुण परिसर ३ एकर असुन तटबंदीत चार बुरुज आहेत. तटबंदी व बुरुजांची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे.तटबंदीतील ४ बुरुज वगळता तटाच्या अलीकडे अजुन एक उंच बुरुज आहे. या बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या असुन तेथे नव्याने बांधलेले देवीचे मंदीर आहे. गढीतील हे सर्वात उंच ठिकाण असुन येथुन गढीबाहेर असलेले नेर्ली गाव नजरेस पडते. गढीत आजही इनामदारांचे वंशज वास्तव्यास असुन त्यांची परवानगी घेऊन नंतरच गाढीस फेरी मारावी. वाडयाच्या मागील बाजुस दगडी बांधणीतील विहीर असुन या विहिरीचे पाणी आजही वापरात आहे.गढीतील काही वास्तु मोडकळीस आल्या असुन काही वास्तु नव्याने बांधलेल्या आहेत. तटावरून फेरी मारताना तटबंदीत असलेले चारही बुरुज पहाता येतात. पण २ बुरुज वगळता इतर बुरुजावर जाता येत नाही. गढीच्या तटाकडील भागात मोठया प्रमाणात झाडी वाढलेली असुन थोडे सांभाळूनच या भागात फिरावे. गढी फिरण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो. गढीचा इतिहास उपलब्ध नसला तरी गढीमालक इनामदार यांनी दिलेल्या माहीतीनुसार १६ व्या शतकात आदिलशाही काळात या इनामदारांना आसपासची सात गावे इनाम होती. यांचा मुळ पुरुष रुद्रोजी पुरषोत्तम कोकणातील कणकवली भागातुन येथे आला व त्याने नेर्ली गाव वसवले. या इनामदारांचे मुळ आडनाव मुतालीक सरदेसाई असे आहे. शिवकाळात मराठयांच्या ताब्यात असलेला हा परिसर त्यानंतर करवीरकरांच्या ताब्यात तर नंतर काही काळ पटवर्धनांच्या ताब्यात होता.------------------------सुरेश निंबाळकर

जिल्हा - बेळगाव

श्रेणी  -  सोपी

दुर्गप्रकार- भुईकोट