जिल्हा - नाशिक
श्रेणी  -  मध्यम
दुर्गप्रकार- गिरीदुर्ग

कात्रा

नाशीक जिल्ह्याची दुर्गभटकंती करताना आपल्याला अनेक परिचित अपरीचीत किल्ले पहायला मिळतात. यात परिचित किल्ल्यापेक्षा अपरीचीत किल्ल्यांचीच संख्या जास्त आहे. सतत उपेक्षित राहिलेल्या या किल्ल्यांकडे दुर्गभटक्यांची पाऊले देखील अभावानेच वळतात. नाशिक जिल्हय़ात सहय़ाद्रीच्या मुख्य रांगेबरोबर सेलबारी- डोलबारी-अजंठा-सातमाळ अशा विविध उपरांगा दिसतात. या उपरांगापैकी अजंठा-सातमाळ या डोंगररांगेतील अंकाई-टंकाई किल्ल्यापासुन काहीशी अलिप्त झालेली एक डोंगररांग आहे. या डोंगररांगेच्या सुरवातीला गोरखगड किल्ला त्यामागे शंभुमहादेव डोंगर तर टोकाला अपरीचीत असा कात्रा किल्ला आहे. तीन दिवसाचा अवधी व सोबत खाजगी वाहन असल्यास अजंठा-सातमाळ या रांगेवर असलेल्या अंकाई-टंकाई-गोरखगड-कात्रा-मेसणा-राजदेहेर-नस्तनपुर-माणिकपुंज अशा अनेक अपरिचित किल्ल्यांना भेट देता येते. यातील मनमाड परिसरात असलेले सुरवातीचे ५ किल्ले फिरताना आपण सतत एका सुळक्याभोवती घिरटया घालत रहातो. या भागात हा सुळका हडबीची शेंडी म्हणुन ओळखला जातो. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील कातरवाडी हे या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव नाशिककहुन निफाड –लासलगावमार्गे ७५ कि.मी. अंतरावर तर चांदवड-मनमाडमार्गे ९५ कि.मी.अंतरावर आहे. मनमाड शहरापासुन कातरवाडी गाव १३ कि.मी. अंतरावर असुन मनमाड- येवला मार्गावर अंकाई लोहमार्ग स्थानकाकडून कातरवाडी गावात जाणारा फाटा आहे. या फाटय़ावरून किल्ल्याचा पायथा पाच कि.मी. अंतरावर आहे. कातरवाडी गावाच्या मागील बाजुस कात्रा किल्ल्याशेजारील शंभुमहादेव डोंगराच्या पायथ्याशी कपिलमुनींचा आश्रम आहे. गावातुन या आश्रमापर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. सोबत खाजगी वाहन असल्यास या वाहनाने कपिलमुनी आश्रमापर्यंत जाता येते. आश्रमाच्या अलीकडे काही अंतरावर मारुतीचे मंदीर आहे. मंदिराच्या आवारात अलीकडील काळातील काही स्मारकशिळा (विरगळ नाही) बसवल्या आहेत. या मंदिरात रात्रीचा मुक्काम करता येतो. मंदिरापासुन काही अंतरावर असलेल्या दादासाहेब गांगुर्डे यांच्याकडे पाण्याची व आगाऊ सुचना दिल्यास जेवणाची सोय होऊ शकते. मंदिरापासुन ५ मिनिटे चालल्यावर आपण कपीलमुनी आश्रमापाशी पोहोचतो. कपिलमुनी आश्रम म्हणजे कातळात कोरलेली मोठी गुहा असुन आतबाहेर भगव्या रंगाने रंगवलेल्या या गुहेत कपिलमुनीची मुर्ती स्थापन केलेली आहे. या गुहेत राजुबाबा नावाचे साधु १५ वर्षापासुन वास्तव्यास आहेत. आश्रमाचा परीसर स्वच्छ व नीटनेटका ठेवलेला असुन परिसरात फुलझाडे लावलेली आहेत. आश्रम असलेल्या डोंगराच्या वरील बाजुस असलेल्या उतारावरून नळाने पाणी आश्रमाच्या आवारात असलेल्या टाक्यात आणले आहे. हे पाणी जंगली प्राणी पिण्यासाठी वापरतात. सध्या गुहेत रहात असलेले राजुबाबा पुर्वी गडावरील गुहेत रहात असल्याने त्यांना संपुर्ण गडाची माहिती आहे व विनंती केल्यास ते गड दाखविण्यास येतात. काही काळ मौन व्रतात असलेल्या राजुबाबा यांनी सध्या मौनव्रत सोडले आहे. कपिल मुनींचा आश्रम पाहुन गुहेच्या उजवीकडील टेकडावर चढुन गुहेचा शंभुमहादेव डोंगर व कात्रा किल्ल्याचा डोंगर यांमधील खिंडींच्या दिशेने निघायचे. कात्रा किल्ल्यावर वावर नसल्याने गडाकडे जाणाऱ्या वाटा फारशा मळलेल्या नाहीत त्यामुळे डोंगरावर जाणाऱ्या घसारा असलेल्या ढोरवाटांचा वापर करत आपण खिंडीत पोहचायचे. खिंडीतील झुडुपात एका दगडाला शेंदुर फासून देवपण दिलेले आहे. या खिंडीतुन उजवीकडे वळुन कात्रा किल्ल्याचा डोंगर डाव्या बाजुला व दरी उजव्या बाजुला ठेवत वरील दिशेने तिरकस १० मिनिटे चढत गेल्यावर आपण किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या घळीच्या पायथ्याशी पोहोचतो. या वाटेवर मोठया प्रमाणात झाडी वाढलेली असल्याने अंग ओरबडतच आपण घळीत पोहोचतो. या घळीत किल्ल्यावर जाण्यासाठी कातळात पायऱ्या कोरलेल्या आहेत. या पायऱ्या चढताना उजव्या बाजुस कातळात कोरलेली तीन तोंडाची गुहा दिसते. यातील दोन तोंडे दगडी बांधकाम करून बंद करण्यात आली आहेत. गुहा पाहाण्यासाठी जेमतेम पाउल मावेल अशा धोकादायक कातळाच्या धारेवरुन जावे लागते पण पावसाळ्यात तेदेखील शक्य होत नाही. वाटेच्या पुढील भागात उजवीकडे माती भरून झुडपे वाढलेली दोन पाण्याची टाकी पहायला मिळतात. या टाक्यांच्या वरील बाजुस कातळात कोरलेल्या दोन लहान चौकोनी तोंडाच्या गुहा पहायला मिळतात. गुहा पाहुन डाव्या बाजुला वळत काही पायऱ्या चढल्यावर आपण गडमाथ्यावर पोहोचतो. कपिलमुनी आश्रमाकडून इथवर येण्यास एक तास पुरेसा होतो.त्रिकोणी आकाराचा गडमाथा पुर्वपश्चिम साधारण ९ एकरवर पसरलेला असुन समुद्रसपाटीपासुन २७७० फुट उंचावर आहे. गडमाथ्यावर समोरच एक टेकडी असुन या टेकडीकडे जाताना उजव्या बाजुस बुजलेला ५ टाक्यांचा समुह पहायला मिळतो. या टाकी समुहाच्या मागील बाजुस म्हणजे गडाच्या दक्षिण टोकावर गेले असता काही वास्तुंचे चौथरे पहायला मिळतात. या टोकावरून परत फिरल्यावर उजव्या बाजुस दरीच्या काठावर तटबंदी बुरुजाचे अवशेष दिसतात. टाक्याकडून पुढे टेकडीकडे जाताना डाव्या बाजुस किल्ल्यावरून खाली जाणारी घळ दिसते. या घळीत १५ फ़ुटाचा कातळटप्पा सावधतेने उतरुन गेल्यास कातळात कोरलेली लांबलचक ध्यान गुंफा पाहायला मिळते. या गुहेच्या तोंडावर झाडी वाढलेली असल्याने हि गुहा वरील बाजूने दिसत नाही. किल्ल्याखाली असलेले राजुबाबा पुर्वी याच गुहेत मुक्कामास होते. गुहा पाहुन वर आल्यावर टेकडीला वळसा घालत डाव्या बाजुने चालायला सुरुवात केल्यावर कातळात खोदलेल पाण्याच टाके पहायला मिळते. या टाक्यावरुन सरळ पुढे आल्यावर वाटेत माती भरून बुजत चाललेले अजून एक टाके दिसते. या टाक्याच्या खालील बाजुस आल्यावर डोंगर उतारावर कातळाच्या पोटात खोदलेली २ खांबी गुहा नजरेस पडते. या गुहेसमोर देखील पाण्याचे एक टाके आहे. गुहा पाहुन सरळ पुढे गेल्यावर आपण किल्ल्याच्या उत्तर टोकावर पोहोचतो. या ठिकाणी झाडीत लपलेली गुहा अथवा पाण्याचे खांबटाके आहे पण त्याच्या तोंडावर मोठया प्रमाणात झाडी वाढलेली असल्याने आत जाता येत नाही. गुहा पाहुन किल्ल्याच्या मधे असणाऱ्या टेकडीवर चढायला सुरुवात केल्यावर ५ मिनिटांचा उभा चढ चढुन आपण किल्ल्याच्या सर्वात उंच भागात पोहोचतो. येथे ध्वज स्तंभाशेजारी राजुबाबाने किल्ल्यावर रहात असताना जमिनीलगत सिमेंटने बांधलेली ध्यान गुंफा आहे. येथुन किल्ल्याभोवतीचा संपुर्ण परीसर तसेच अंकाई-टंकाई, गोरखगड, मेसणा हे किल्ले व हडबीची शेंडी सुळका दिसतो. टेकडीवरून विरुद्ध दिशेने पाण्याच्या पाच टाक्याकडे उतरल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. गड पूर्ण पहाण्यास एक तास पुरेसा होतो. किल्ल्याचा आकार व त्यावरील अवशेष पहाता या किल्ल्याचा वापर केवळ टेहळणीसाठी होत असावा. नाशिक जिल्हा ग्याझेटीयरमधील उध्वस्त किल्ला हा उल्लेख वगळता इतरत्र कोठेही या किल्ल्याचे उल्लेख दिसुन येत नाही. -----------------------सुरेश निंबाळकर