नाशिक जिल्ह्याला मोठया प्रमाणात प्राचीन मंदिरे व लेणी-गुंफा यांचा वारसा लाभला असल्याने हा जिल्हा देवभुमी म्हणुन ओळखला जातो. पण याच नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीच्या सेलबारी-डोलबारी, त्र्यंबक-अंजनेरी, अजंठा-सातमाळा या उपरांगेवर ६५ पेक्षा जास्त किल्ले असल्याने आपल्यासारखे भटके मात्र हा जिल्हा दुर्गभुमी म्हणुन ओळखतात. यातील चांदवड तालुक्यातून जाणाऱ्या अजंठा-सातमाळ डोंगररांगेवर कोळधेर,राजधेर, इंद्राई, चांदवड,मेसणा,कात्रा यासारखे किल्ले वसले आहेत. यातील नाशिक-धुळे महामार्गालगत असलेल्या चांदवड किल्ल्यावर जाण्यासाठी प्रस्तरारोहणची गरज असल्याने भटक्यांची पाऊले या किल्ल्याकडे सहजपणे वळत नाहीत तर मेसणा,कात्रा,कोळधेर या किल्ल्यावर फारसे अवशेष नसल्याने कोणी इथे फारसे फिरकत नसल्याने हे किल्ले पुर्णपणे अपरीचीत आहेत. सोबत खाजगी वाहन असल्यास व वेळेचे काटेकोर नियोजन केल्यास तीन दिवसात हे सहा किल्ले सहजपणे पाहुन होतात. चांदवड तालुक्यात अजंठा-सातमाळ डोंगररांगेवर असलेला पहिला किल्ला म्हणजे कोळधेर किल्ला. राजधेरवाडी हे या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गाव चांदवड या तालुक्याच्या ठिकाणापासुन १० कि.मी.अंतरावर तर नाशिक शहरापासुन ४० कि.मी.अंतरावर आहे. हे गाव कोळधेर,राजधेर व इंद्राई किल्ल्याच्या कुशीत वसलेले असुन राजधेरवाडीत प्रवेश करताना उजव्या बाजुस राजधेर किल्ला व डाव्या बाजुस इंद्राई किल्ला नजरेस पडतो. कोळधेर किल्ला राजधेर किल्ल्याच्या मागील बाजुस असल्याने गावामागील पठारावर गेल्याशिवाय नजरेस पडत नाही. राजधेरवाडी गावाशिवाय किल्ल्यावर जाण्यासाठी अजून एक मार्ग असुन नाशिक वरून देवळ्याकडे जाताना सोग्रस फाट्यावरून पुढे आल्यावर चांदवड मार्गावर तांगडी-शिरूर गाव आहे. या गावातील बंधाऱ्यावरून चालत गेल्यास कोळधेरच्या खिंडीत जाणारी वाट आहे. हि वाट कोळधेर किल्ला सतत डाव्या बाजुस ठेवत वर चढत जाते पण वाट फारशी वापरात नसल्याने राजधेरवाडीतुन जाणे जास्त सोयीचे आहे शिवाय राजधेरवाडी -कोळधेर-राजधेर अशी दोन गडांची दिवसभराची भटकंती देखील या वाटेने सहजपणे करता येते. राजधेरवाडीतुन पुढे धरणाकडे जाणाऱ्या दोन कि.मी. कच्च्या रस्त्याने चालत किवा गाडीने जाऊन नंतर समोरील पठारावर चढावे. गावाबाहेर पडताना या वाटेवर आपल्याला पाच फुट उंचीची मारुतीची सुंदर मुर्ती पहायला मिळते. पठारावर आल्यावर येथुन राजधेर किल्ला आपल्या उजव्या बाजुस ठेवत अर्धा तास वाटचाल केल्यावर आपण कोळधेर किल्ला व त्यासमोरील पठार यामध्ये असलेल्या दरीच्या काठावर पोहोचतो. येथुन संपुर्ण कोळधेर किल्ला नजरेस पडतो. येथुन उजवीकडे वळुन दरी डावीकडे व कडा उजवीकडे ठेवत दरीच्या काठाने सरळ गेल्यावर आपण कोळधेरच्या खिंडीत पोहोचतो. तांगडी गावातुन येणारी वाट खिंडीत या वाटेला मिळते. राजधेरवाडीतुन इथपर्यंत येण्यास साधारण दीड तास लागतो तर तांगडी गावातुन येथे येण्यास अडीच तास लागतात. खिंडीत असलेल्या कातळाला शेंदुर फासुन देवपण देण्यात आले आहे. खिंडीतून पुढे किल्ल्याकडे जाणारी वाट मात्र उभ्या चढणीची आहे. या वाटेने अर्ध्या तासात आपण किल्ल्याच्या सुळक्याखाली असलेल्या पठारावर येतो. या पठारावर वाटेच्या डाव्या बाजुस मारुतीरायाची उघड्यावर स्थापना केलेली मुर्ती पहायला मिळते. हि मुर्ती बहुदा अलीकडील काळातील असावी. पुढे सुळक्याच्या दिशेने चढत जाताना वाटेत एक अर्धवट बुजलेले कातळात कोरलेले टाके पहायला मिळते. या टाक्याच्या वरील बाजुस पाण्याचे दुसरे कोरीव टाके असून या टाक्यातील पाणी मार्चपर्यंत पिण्यासाठी उपलब्ध असते. हि दोन्ही टाकी उतारावर कोरलेली असुन या दोन्ही टाक्यांच्या आसपास काही घरांच्या जोत्यांचे अवशेष आहेत. येथुन पुढे सुळक्याकडे जाणारी वाट घसाऱ्याची असुन हि वाट चढत आपण सुळक्याच्या माचीखाली असलेल्या कातळ भिंतीजवळ पोहोचतो. माचीवर जाण्यासाठी या कातळात पायऱ्या कोरलेल्या असुन पुढील वाट देखील काही प्रमाणात कातळात कोरलेली आहे. या ठिकाणी पुर्वी दरवाजा असण्याची शक्यता आहे पण आज मात्र त्याचे कोणतेही अवशेष दिसुन येत नाही. कातळात कोरलेल्या वाटेने आपण सुळक्याच्या खालील भागात असलेल्या माचीवर येतो. कोळधेरची माची दक्षिणोत्तर १२ एकरवर पसरलेली असुन किल्ल्याचा माथा समुद्रसपाटीपासुन ३९५० फुट उंचावर आहे. या माचीवर कोणतेच अवशेष नसल्याने उजवीकडील बाजूस असलेल्या सोंडेकडे जाऊन या सोंडेवरून सुळक्याच्या दिशेने चढण्यास सुरवात करावी. या वाटेने दहा मिनिटात आपण सुळक्याच्या पोटात असलेल्या प्रशस्त गुहेत पोहोचतो. साधारण ३० x ३० फुट आकाराची हि गुहा नैसर्गिक असुन गुहेच्या आतील भागात व तोंडावर काही प्रमाणात घडीव दगडांनी बांधकाम केलेले आहे. गुहेच्या डाव्या बाजुच्या कातळभिंतीवर एक शिल्प कोरलेले आहे. गुहेत ५०-६० माणसे सहज राहू शकतात मात्र पाण्याची कोणतीच सोय नाही. किल्ल्याच्या सुळक्यावर जाता येत नसले तरी गुहेतून पुढे सुळक्याच्या कडेने चालत गेल्यास सुळक्याला प्रदक्षिणा मारता येते. या वाटेत दगडावर रचलेले एक शिवलिंग पहायला मिळते. कोळधेर किल्ल्यावरून कांचन मांचन, विखारा, धोडप ही पर्वतरांग तसेच भाऊडबारी, कांचनबारी आणि देवळा-सटाण्यापर्यंतचा मुलुख नजरेस पडतो. खिंडीतुन गडावर येण्यास व गडफेरी करून परत खिंडीत जाण्यास दोन तास लागतात. कोळधेर किल्ल्याचे स्थान व त्यावरील एकुण अवशेष पहाता या किल्ल्याचा वापर केवळ टेहळणीसाठी होत असावा तसेच हा किल्ला बांधकाम करतानाच अर्धवट सोडुन दिला असावा. प्राचीन काळापासुन उत्तरेकडून दक्षिणेकडे जातायेता चांदवड हा या मार्गावरील एक महत्वाचा घाटमार्ग होता. त्यामुळे या घाटमार्गावर नजर ठेवण्यासाठी चांदवडचा किल्ला बांधला गेला व त्याच्या सरंक्षकफळीत राजधेर, इंद्राई.कोळधेर व मेसणा या किल्ल्यांची निर्मिती केली गेली. दुर्लक्षित असलेल्या या गडाला एकदा तरी भेट द्यायला हवी.-------सुरेश निंबाळकर

कोळधेर

जिल्हा - नाशिक

श्रेणी  -  मध्यम

दुर्गप्रकार- गिरीदुर्ग