लहुगड

जिल्हा - औरंगाबाद   
श्रेणी  - मध्यम   
दुर्गप्रकार - गिरीदुर्ग 

लहुगड हा अजंठा-वेरूळ लेण्यांच्या डोंगररांगेत येणारा किल्ला जवळच असणारी राजधानी देवगिरी आणि प्रसिद्ध अजंठा लेण्यांच्या परिसरातून जाणाऱ्या पुरातन मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला असावा. या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून २५०० फुट असून पायथ्यापासून गड फक्त १२०० फुट उंच आहे. साधारणपणे गोलाकार असलेल्या या किल्ल्याचे एकुण क्षेत्रफळ ५ एकर असुन लांबी ५५० फुट तर रुंदी ४०० फुट आहे. दगडात कोरलेले गुहा मंदिर, कातळात कोरलेली पाण्याची टाकी, दगडात कोरलेले प्रवेशव्दार, पायऱ्या, गुहा असे कोरीवकामाचे वैविध्य या गडावर पहायला मिळते. औरंगाबाद जिल्ह्यात दगड तासून बेलाग बनवलेला देवगिरी किल्ल्याच्या पंक्तीत बसणारा हा छोटेखानी किल्ला औरंगाबाद शहरापासून साधारण ४० किमीवर आहे. औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणाऱ्या औरंगाबाद – जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून २९ किमी अंतरावर फुलंब्री गाव आहे. फुलंब्रीच्या पुढे ४ किमी अंतरावर पालफाटा आहे. या फाट्यावर उजवीकडे वळल्यावर आपण राजूर रस्त्याला लागतो. या रस्त्यावर पालफाट्यापासून ९ किमी अंतरावर जातेगाव आहे. जातेगाव पासून नांद्रा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव ४ किमीवर आहे. नांद्रा गावाच्या मागे ३ किमीवर लहूगड आहे. किल्ल्याजवळ पोहोचताच दोन्ही बाजूने असणाऱ्या डोंगरांच्या खिंडीमुळे लहुगड या डोंगरापासून सुटावलेला दिसतो. लहूगडाचा ताबा सध्या रामेश्वर मंदीर समितीने घेतला असल्याने समितीने गडावर बऱ्याच सोई निर्माण केल्या आहेत.गडावर जाण्यासाठी ३ बाजूंना सिमेंटच्या पायऱ्या बांधून काढल्या आहेत. पायथ्याला वडाचे एक खूप जुने झाड असुन शेजारी हनुमानाचे मंदिर आहे. या मंदिरासमोरच श्री क्षेत्र रामेश्वर, महाद्वार, लहुगड नांद्रा असा मजकूर लिहलेली दगडी कमान आहे. या कमानीच्या तळाला बांधकामात दोन विरगळ दिसून येतात. या कमानीतूनच गडाच्या पायऱ्या चढायला सुरवात करायची. थोड्या पायऱ्या चढून वर गेलो कि डाव्याबाजूस पाण्याच्या टाकीसारखे खोदकाम दिसते. यात एक शिवलिंग व नंदी आहे. पुढे आणखी पायऱ्या चढून गेल्यावर थोडी सपाटी लागते आणि उजव्या बाजूस झाडाखाली एक जुनी गणपतीची मूर्ती दिसते. पूर्वी ही मुर्ती गुहा मंदिरासमोरच्य देवळीत होती. तिथे नविन मुर्ती बसवल्यामुळे ही मुर्ती बाहेर ठेवण्यात आली आहे. येथेच उजव्या बाजूस गडावर पूर्वी रहात असलेल्या साधूचे मंदिर बांधलेले आहे. या मंदिराच्या पुढेच डाव्या बाजूला किल्ल्याच्या माथ्यावर जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. या कातळातील पायऱ्यांच्या वाटेने गडमाथ्यावर न जाता पुढे गेले कि समोर येते लहुगडाचे गुहा मंदिर. याला रामेश्वर किंवा रुद्रेश्वर मंदिर असे म्हणतात. हे गुहामंदिर म्हणजे कोरीव कामाचा उत्कृष्ट नमुना आहे. या गुहा मंदिरासमोरच अखंड कातळात कोरलेले व सुबक नक्षीकाम केलेले तुळशी वृन्दावनासारखे चार फूट उंच मंदिर आहे. या छोट्या मंदिरात गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे. गुहा मंदिराच्या डाव्या हाताला उघड्या चौथऱ्यावर अनेक जुन्या व छोट्या कोरीव मुर्ती व्यवस्थित मांडून ठेवलेल्या दिसतात. त्याच्या पुढे कातळात खोदलेले पाण्याच रुंद व खोल प्रचंड मोठ खांब टाक आहे. टाक्यातील पाणी स्वच्छ दिसत असले तरी वटवाघुळामुळे पाण्याला प्रचंड घाण वास येतो. गुहा मंदिराच्या वर असणाऱ्या कातळावर पडणारे पाणी टाक्यात जमा होण्यासाठी कातळात पन्हाळी कोरलेल्या आहेत. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला दोन गोलाकार खांब कोरलेले आहेत. त्यानंतर थोडीशी जागा सोडून मंदिराचा दरवाजा कोरलेला आहे. दारावर व्दारपट्टीका व दोन बाजूंना खांब व नक्षी कोरलेली आहे. मंदिरात हवा व प्रकाश येण्यासाठी दरवाजाच्या दोनही बाजूंना खिडक्या कोरलेल्या आहेत. दरवाजातून आत गेल्यावर मंदिराचा कातळात कोरून काढलेला सभामंडप ४ खांबावर तोललेला दिसतो. या ४ खांबामधे नंदी बसवलेला आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात पिंड बसवलेली असून तिला रामेश्वर नावाने ओळखतात. गाभाऱ्यासमोर व डाव्या बाजूला अशा दोन खोल्या कोरून काढलेल्या आहेत. दुरुनही लोकांना दिसावा म्हणून गुहा मंदिरावर हल्लीच सिमेंटचा कळस बांधलेला आहे. मंदिराच्या समोर लाद्या बसवलेल्या आहेत. तसेच झाडांना पार बांधलेले आहेत. मंदिराच्या पुढे साधूबाबाची मठी व स्वयंपाक घर नव्याने बांधलेले आहे. गुहा मंदिर पाहून बाजूच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या चढून प्रवेशव्दाराकडे जातांना जेथे पायऱ्या डावीकडे वळतात तेथे उजव्या हाताला एक शैवाळयुक्त हिरव्यागार पाण्याने भरलेले टाके लागते. थोड्या आणखी पायऱ्या चढून गेलो कि समोर येतो किल्ल्याचा संपूर्ण कातळात कोरलेला छोटासा दरवाजा. डोंगर तासून तयार केलेला हा बोगदावजा दरवाजा पार केला की पलीकडे डाव्या बाजूस एक गुहा कोरलेली दिसते. इतिहासकाळात याचा वापर बहुदा पहारेकऱ्याच्या विश्रांतीसाठी देवडया म्हणून होत असावा. पुढे उजवीकडे वळण घेत काही पायऱ्या चढून आपला लहूगडाच्या माथ्यावर प्रवेश होतो. लहुगडाचा माथा तसा आटोपशीरच असला तरी या गड्माथ्याच्या जवळजवळ सगळ्याच बाजूंनी कातळात खोदलेली खांब टाकी आणि गुहा आहेत. माथ्यावर जिथे आपला गडप्रवेश होतो तिथे समोरच ८ टाक्यांचा समुह आहे. यातील काही टाक्यात पाणी आहे तर काही टाकी नुसतीच झाडाझुडपांनी भरून गेलेली आहेत. तो पाहून उजव्या बाजूला वळून गड प्रदक्षिणा चालू करावी. प्रथम जमिनीच्या पोटात कोरलेले खांब टाक पहायला मिळत. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. पुढे ओळीने ६ पाण्याची टाकं लागतात. त्यापैकी एका टाक्यातच पिण्यायोग्य पाणी आहे. गडावर अशाप्रकारची २० पेक्षा जास्त पाण्याची टाकी असावीत. त्यानंतर झाडीत लपलेले झेंडा टाक पाहून वळसा मारला की आपण गडाच्या पिछाडीला येतो. येथे कातळात कोरलेली एक प्रशस्त गुहा आहे. हि गुहा मुक्कामास अगदी योग्य असून आत एकाच बाजूस एक खांब शिल्लक आहे. या एक खांबी गुहेत प्रवेश करण्यासाठी एक छोटा दरवाजा व बाजूला हवेसाठी ३ खिडक्या कोरल्या आहेत. या गुहेच्या थोड पुढे किल्ल्याचे मागील बाजूचे भग्न प्रवेशव्दार, जुजबी तटबंदी व खाली उतरणाऱ्या काही जुन्या दगडी पायऱ्यांची वाट दिसते. हि वाट अंजनडोह गावाकडे उतरते. आपण मात्र या वाटेने खाली न उतरता पुन्हा गुहेजवळ परत येऊन गुहेच्या शेजारून वर जाणाऱ्या कातळात खोदलेल्या पायऱ्या चढायच्या. वर चढून आलो कि समोरच एका खोलगट भागात कातळात मधोमध खोदलेले एक मंदिर दिसते. याला सीता न्हाणी असे म्हणतात. मंदिरात पाषाणात कोरलेली एक स्त्री मूर्ती ठेवलेली आहे. मंदिराच्या बाजूलाच पुन्हा एक खांब टाक कोरलेले दिसते. इथून उजवीकडे खाली उतरल्यावर कातळात कोरलेली अजून एक प्रशस्त गुहा दिसते. या गुहेपासून एक वाट गड पायथ्याच्या हनुमान मंदिराजवळ जाते. ती पाहून परत वर येऊन किल्ल्याच्या प्रवेशव्दाराकडे येतांना वाटेत एक पाण्याच टाक आहे. किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरील सपाटीवर वास्तूंचे अवशेष आहेत. येथे आपली गडफेरी पूर्ण होत असल्याने आपण या दुसऱ्या वाटेने गडाचा पायथा गाठू शकतो किंवा आल्यावाटेने रामेश्वर मंदिराजवळून खाली उतरायचे. लहुगड तसा आकाराने व चढाईला अगदीच सोपा असला तरी सर्व अवशेष नीट पाहण्यासाठी किमान दोन तासाचा कालावधी लागतो. लहुगडचा इतिहास उपलब्ध नाही. देवगिरी या राजधानाच्या गडाशी जवळीक व गडावर कातळात खोदलेली टाकी व गुहा पहाता हा गड ७ व्या किंवा ८ व्या शतकातला असावा. गडावरील मंदिरात व गुहेत रहाण्याची तसेच पिण्याच्या पाण्याची सोय होते. लहूगडाच्या डाव्याबाजूस असणाऱ्या डोंगराला चांभार टेकडी असे म्हणतात. या डोंगरावर ३ लेणी आहेत. ही लेणी म्हणजे कातळात कोरलेल्या केवळ गुहा असल्यामुळे गडाच्या पायथ्यापासून १५ मिनिटात आपण लेणी पाहून परत येऊ शकतो. अजिंठा डोंगररांगेपासून अलग झालेल्या डोंगरावर कोरलेल्या या किल्ल्याला एकदा तरी भेट द्यायला हवी. --------------सुरेश निंबाळकर