पालगड

पालगड हे दापोली तालुक्यातील साने गुरुजीचे जन्मस्थान असणारे एक छोटेसे टुमदार गाव. साने गुरुजींच्या पदस्पर्शानी पावन झालेली ही भुमी. या गावाजवळच इतिहासात फारस काही न घडलेला पालगड हा किल्ला गावाच्या मागे दाट झाडीत उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराजानी हा किल्ला बांधल्याचे सांगितले जाते. ह्या किल्ल्याचे स्थान पाहता याचा उपयोग टेहळणीसाठी केला गेला असावा. गावाची वसाहत किल्ल्यानंतर वसली असुन किल्ल्याच्याच नावाने गावाचे नामकरण झाले आहे. पालगड गाव दापोलीपासून २१ कि.मी.वर दापोली-खेड मार्गावर आहे. किल्लेमाची कदमवाडी या रस्त्याने थेट गडाच्या पायथ्याशी जाता येते. येथून गावाच्या मागे तटबंदीचा शिरपेच धारण केलेला पालगडचा छोटा डोंगर दिसतो. किल्ल्याचा मुख्य दरवाजा किल्लेमाची कदमवाडीच्या विरूद्ध दिशेस आहे. किल्लेमाची कदमवाडी ही पुर्व दिशेस आहे तर किल्ल्याचा दरवाजा पश्चिम दिशेस आहे. गडाकडे पाहिल्यावर गडाच्या उजवीकडच्या सोंडेवर एक कच्चा गाडीरस्ता झालेला दिसतो. या रस्त्याने १० मिनिटात छोटी चढण चढून आपण एका पठारावर येतो. इथे एका झाडाखाली काही मूर्ती ठेवल्या आहेत. इथून पालगडाचा भग्न दरवाजा व तिथपर्यंत नेणा-या पाय-या दिसतात. या पाय-या चढून गेलो की आपला किल्ल्यात प्रवेश होतो. किल्ल्याचे पूर्वाभिमूख प्रवेशद्वार उध्वस्त झालेले असुन दरवाजा शेजारील दोन्ही बुरुज अजून शिल्लक आहेत. किल्लेमाचीतील हनुमान मंदिरापासुन किल्ल्यावर चढायला साधारण अर्धा तास लागतो. समुद्रसपाटी पासून १३५० फुट उंचीवर असलेल्या या किल्ल्याचे क्षेत्रफळ १ एकरपेक्षा कमी असुन किल्ला त्रिकोणी आकाराचा आहे. गडाला एकुण ९ बुरुज असुन दोन दरवाजाशेजारी दोन, तटबंदीच्या मध्यभागी एक, गडाच्या निमूळत्या होत गेलेल्या तीन सोंडेच्या टोकाला प्रत्येकी एक बुरुज अशी याची रचना आहे. इतक्या लहान गडाला दोन दरवाजे असण्याचे प्रयोजन मात्र लक्षात येत नाही. गडाच्या दुसऱ्या दरवाजातून येणारी वाट अवघड असुन वापरात नाही. या वाटेवर पाण्याचे एक खोदीव टाके आहे. गडाची तटबंदी आजही मोठया प्रमाणात शिल्लक आहे. काही दिवसांपूर्वी अर्धवट जमीनीत गाडली गेलेली एक तोफ गडप्रेमींनी जमीनीतुन बाहेर काढून पश्चिमेकडील एका बुरुजावर ठेवली आहे तर दुसरी तोफ किल्ल्याच्या लहान दरवाजा समोरील उध्वस्त झालेल्या एका वाड्याच्या चौथऱ्यावर आहे. किल्ल्यावर उध्वस्त झालेल्या वाड्यांचे जोते तसेच एक सुकलेलं पाण्याचं टाके दिसुन येते. स्थानिक लोक किल्ल्यावर शिवजयंती साजरी करतात. त्यासाठी त्यांनी गडावर एक पत्र्याची शेड बांधुन त्यात शिवरायांचा अर्धाकृती पुतळा ठेवला आहे. गडाच्या माथ्यावरून पूर्वेकडे महिपत, सुमारगड व रसाळगड हि दुर्गत्रयी, दक्षिणेकडे खेड शहर तर पश्चिमेला मंडणगड दिसतो. संपुर्ण गड फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो. परतीच्या प्रवासात किल्लेमाचीतील शेतात असणारी तोफ, जुन्या विहीरी व या विहीरी शेजारील समाधी पहाता येते. समाधीकडे जाताना वाटेवरच एका बांधांवर तिसरी तोफ दिसते. तिथून पुढे खाली उतरल्यावर विहिरीजवळ एक समाधी पहायला मिळते. समाधीच्या बांधकामात एका झाडाने आपले बस्तान बसवल्याने समाधीची पडझड झाली आहे. हि समाधी किल्लेदार विचारे यांच्या वंशजाची असल्याचे येथील स्थानिक लोक सांगतात. साहस आणि भटकंतीची आवड असणा-यांनी या दाट झाडीतील किल्ल्याची मोहिम काढण्यास हरकत नाही. ----------------सुरेश निंबाळकर

जिल्हा -रत्नागिरी  
श्रेणी - मध्यम 

दुर्गप्रकार- गिरीदुर्ग