सह्याद्रीतील गडकिल्ले फिरताना काही गिरीशिखरांना गड का म्हणावे असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. काही वेळेला त्या ठिकाणी असलेल्या एखाद-दुसऱ्या अवशेषावरून किंवा इतिहासातील ओझरत्या नोंदीवरून त्या गडाचे अस्तित्व सिद्ध होते तर काही वेळेला मात्र आपला प्रश्न अनुत्तरीतच रहातो. असेच दोन अनुत्तरीत प्रश्न म्हणजे धाकोबा आणि दुर्ग किल्ला. नाणेघाट आणि जीवधनच्या दक्षिणेकडे दऱ्या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी जुन्नर परिसरात दऱ्या घाटाच्या कडेवर माळशेज डोंगररांगेत या किल्ल्याची उभारणी केली गेली. ढाकोबाच्या सरळ रेषेत असणारा दुसरा किल्ला म्हणजे दुर्ग. घाटवाटांवर लक्ष ठेवणे हा या किल्ल्यांच्या उभारणीमागे मुख्य उद्देश होता असे सांगितले जाते पण या डोंगरावर गड असण्याचे कोणतेही अवशेष नसल्याने तसेच याचा इतिहासात कोठेही उल्लेख नसल्याने याला गड म्हणणे योग्य ठरणार नाही. दुर्ग हे फक्त गिरीशिखर असुन त्याचा किल्ला म्हणून उल्लेख चुकीचा आहे. मुंबई-पुण्याहून इथे पोचण्यासाठी दुर्गावाडी हे पायथ्याचे गाव गाठावे लागते. जुन्नर-आपटाळे-इंगळून-आंबे-हातवीज- दुर्गवाडी हे अंतर साधारण ३४ कि.मी आहे. जुन्नरहून हातवीजला येण्यासाठी एसटीची सोय आहे. हातवीज पासुन दुर्गावाडी वस्ती १ कि.मी. अंतरावर आहे. दुर्ग डोंगराच्या पायथ्याशी पाणी अडविण्यासाठी मातीचा बंधारा घातला असल्याने तेथवर जाण्यासाठी कच्चा रस्ता बांधला आहे.गावात शिरल्यावर समोरच दुर्ग शिखराचा कातळमाथा आपले लक्ष वेधुन घेते. दुर्गवाडी गावातून साधारण १० मिनिटात कच्च्या रस्त्याने आपण दुर्गच्या पायथ्याशी असणाऱ्या दाट झाडीपर्यंत येऊन पोहोचतो. झाडीच्या डाव्या बाजूस जाणारी वाट आपल्याला दुर्गच्या पायथ्याशी असणाऱ्या विहीरीकडे घेऊन जाते तर उजवीकडील वाट दुर्गामंदिराकडे घेऊन जाते.हिच वाट पुढे दुर्ग किल्ल्याच्या मागील बाजूस असणाऱ्या कड्याकडे जाते. अर्धवट बांधलेल्या दुर्गा मंदिराच्या चारही बाजुना गर्द झाडी असुन मंदिरात मुर्ती ऐवजी शेंदुर फासलेला तांदळा आहे. दुर्ग किल्ल्याचा वनपर्यटन म्हणून विकास करण्यासाठी वनखात्याने दुर्ग टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात पर्यटकांसाठी पाच निवारे व टेकडीच्या मागील बाजूस असलेल्या कड्यावर लोखंडी कठडे बांधले आहेत. दुर्गच्या टेकडीवर जाण्यासाठी ठळक अशी वाट नसुन मंदिरासमोरील दाट झाडीतुन वाट काढत १० मिनिटात दुर्गच्या माथ्यावर जाता येते. दुर्गचा गडमाथा समुद्र सपाटीपासून ३८१६ फुट उंचावर आहे. लंबगोलाकार आकाराचा गडमाथा दक्षिणोत्तर २ एकरवर पसरलेला आहे. माथ्यावर किल्ला असण्याचे कोणतेही अवशेष नसुन संपुर्ण माथा खडकांनी भरलेला आहे. गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय म्हणजे पायथ्याशी असणारी विहीर आहे. किल्ल्यावरून गोरखगड,सिध्दगड,मच्छिंद्रगड तसेच नाणेघाट, ढाकोबा, जीवधनची मागची बाजू दऱ्याघाट व पायथ्याशी असलेले उत्तर कोकण असा दूरवरचा परीसर दिसतो. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. संपूर्ण गड फिरण्यास अर्धा तास लागतो. दुर्ग किल्ल्यापासून सरळ जाणारी अवघड घाटवाट खाली कोकणात उतरते. हा घाट थोडा अवघड असल्याने वाटेत आधारासाठी खुंटी मारल्या आहेत म्हणून ह्या वाटेला खुटेदार असं म्हणतात. कल्याण बंदरात उतरणारा माल मुरबाड , वैशाखरे मार्गे विविध घाट मार्गांनी सह्याद्रीची रांग ओलांडून घाट माथ्यावरील बाजारपेठेत जात असे. या घाट मार्गांवर नजर ठेवण्यासाठी प्राचिन काळापासून अनेक किल्ले बांधण्यात आले. या किल्ल्यांचा मुख्य उद्देश म्हणजे या व्यापारी मार्गांचे रक्षण करणे, त्यावर नजर ठेवणे. दुर्ग किल्ल्याचा उपयोग ही टेहळ्णीसाठी होत असावा. ठिकाण मोक्याचं असलं तरी इथं किल्ला बांधलेला नाही. दुर्ग किल्ल्यावरुन पायवाटेने धाकोबा गडावर जाण्यास साधारण २ तास लागतात. सह्याद्रीतील या शिखराला एकदा तरी भेट दयायलाच हवी.--------------सुरेश निंबाळकर

जिल्हा - पुणे 
श्रेणी  - मध्यम   
दुर्गप्रकार - गिरीदुर्ग

दुर्ग

DIRECTION