मोरधन

जिल्हा - नाशिक 
श्रेणी  - मध्यम   
दुर्गप्रकार - गिरीदुर्ग

गडकिल्ले फिरताना काही डोंगरावर आपल्याला या डोंगराला किल्ला का म्हणावे असा प्रश्न पडतो. कारण त्या डोंगरावर किल्लेपणाची खुण दाखवणारे ना तटबुरुज ना कोणती वास्तु. असलेच तर एखादे बुजलेले टाके व एक दोन घराचे अवशेष. मग अशा ठिकाणी तंगडतोड करत जायचे तरी कशाला तर याला उत्तर एकच ते तिथे आहेत म्हणुन. अशा अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे घोटीजवळील खैरगावचा मोरधन किल्ला. नाशिक हे पुर्वीपासुनच बाजारपेठ म्हणून प्रसिध्द आहे. प्राचिनकाळी कल्याण,सोपारा, डहाणु बंदरात आलेला माल विविध घाटवाटांनी या बाजारपेठेत येत असे.या घाटवाटापैकी आज विस्मृतीत गेलेला एक घाटमार्ग म्हणजे शिरघाट. मोरधन हा या वाटेवरील एक टेहळणीचा किल्ला. नाशिककडे येणाऱ्या या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी घाटावर बांधलेल्या किल्ल्यांच्या रांगेत मोरधन व कावनई हे दोन किल्ले बांधले गेले. खैरगाव हे गडाच्या पायथ्याचे गाव असुन मुंबई-नाशीक महामार्गावरील घोटी-शिर्डी रस्त्याने देवळे फाट्यावरून हे अंतर १३५ कि.मी.आहे. देवळे फाट्यावरून खैरगावकडे जाताना डाव्या बाजुला एक पाणबुडीच्या आकाराचा डोंगर नजरेस पडतो तोच हा मोरधन किल्ला. खैरगावात हा किल्ला मोराडोंगर म्हणून ओळखला जातो. मोरा डोंगराच्या पठारावर असलेला दुसरा डोंगर म्हणजे मोरधन किल्ला आहे. मोरा डोंगराचे पठार अस्ताव्यस्त पसरलेले असुन त्यावरील किल्ल्याचा डोंगर मात्र आकाराने लहान व निमुळता आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला हे दोन्ही डोंगर चढुन पठार तुडवत जावे लागते. किल्ल्यावर जाणारी वाट गावातील भैरवनाथ मंदिराकडून असुन या मंदिराच्या आवारात उघडयावर एक शेंदूर फासलेली गणेशमुर्ती व शेजारी भग्न शिवलिंग व नंदी दिसुन येतो. पठाराकडे जाताना गावापासुन काही अंतरावर डाव्या बाजुला झाडीत एका समाधीचे अवशेष (विरगळ) दिसुन येतात. गडाखालील पठारावर गावकरी शेळ्या-गुरे चरायला नेत असल्याने वाट मळलेली पण डोंगराच्या कातळकड्यापर्यंत चांगलीच घसाऱ्याची आहे. कातळकड्याला वळसा घालत हि वाट दोन डोंगरांच्या घळीतून वर पठारावर जाते. पठारावर प्रवेश करताना असलेल्या खिंडीत काही चौकीवजा अवशेष दिसुन येतात. पायथ्यापासुन पठारावर येण्यास साधारण दिड तास लागतो. पठारावर आल्यावर समोरच मोरधन किल्ल्याचा उत्तर दक्षिण पसरलेला निमुळता डोंगर दिसतो तर डाव्या बाजुला निमुळते झालेल्या पठारावर भगवा झेंडा फडकताना दिसतो. किल्ल्याखाली पठाराच्या दुसऱ्या टोकाला एका झाडावर भगवा फडकताना दिसतो. या ठिकाणी एक मंदिर व आश्रम असुन तेथे दोन लहान झरे आहेत. यातील एका झऱ्याचे पाणी पिण्यायोग्य असुन दुसऱ्या झऱ्यातील पाणी पठारावर आलेली गुरे पितात. किल्ल्यावर जाण्यासाठी पठारावरून एक वाट किल्ल्या़चा डोंगर उजवीकडे ठेऊन तिरकस वर चढत जाते. हि वाट ओळखण्याची खुण म्हणजे या वाटेच्या वरील बाजुस एक कपार आहे अन्यथा पठारावर मोठया प्रमाणात गुराखी असतात त्यांना वाट विचारावी. या वाटेच्या शेवटच्या टप्प्यात घसरून आलेले तटबंदीचे घडीव दगड मोठया प्रमाणात दिसुन येतात. पठारावरून गडमाथ्यावर येण्यास अर्धा तास पुरेसा होतो. समुद्रसपाटीपासून गडाची उंची ३५१० फुट असुन निमुळता माथा असलेला हा गड दक्षिणोत्तर साधारण ८ एकरवर पसरलेला आहे. येथुन गडाच्या दुसऱ्या टोकाकडे जाताना वाटेत अलीकडे बांधलेले काही सिमेंट चौथरे दिसुन येतात. येथे खडकात खोदलेले एक पाण्याचे टाके आहे पण सध्या ते मातीने भरलेले आहे. वाटेत पुढे खडकात खोदलेला एक रांजण (बळद) असुन त्याच्या पुढील भागात काही घरांचे अवशेष दिसुन येतात. वाटेच्या पुढील भागात डाव्या बाजुला एका वाड्याचे अवशेष असुन उजव्या बाजुला एक साचपाण्याचा पण सध्या मातीने भरलेला तलाव दिसतो. गडमाथ्याच्या टोकाला पहाऱ्याच्या चौकीचे अवशेष दिसतात व येथे आपली गडफेरी पुर्ण होते. गड फिरताना भणाणणारा वारा सतत आपली सोबत करत असतो. गडाच्या माथ्यावरून पूर्वेला कळसूबाई डोंगर, अलंग, मदन, कुलंग हे किल्ले तर उत्तरेला कावनई व त्रिंगलवाडी किल्ला दिसतो. गडाखाली पठारावर केवळ एका ठिकाणी झऱ्याचे पाणी पिण्यासाठी असल्याने पाणी सोबत बाळगावे. खैरगावातून मोरधन किल्ल्यावर जाण्यासाठी २ ते २.५ तास लागतात. किल्ल्याचे स्थान व यावरील अवशेष पहाता मोरधन किल्ल्याचा वापर टेहळणीसाठी झाला असावा.------------सुरेश निंबाळकर