अष्टविनायक मधील एक गणपती म्हणजे मोरगावचा मोरेश्वर. याच मोरगावजवळ मोढवे गावात दोन ऐतिहासिक गढ्या आहेत. मोढवे गाव पुण्यापासुन ६५ कि.मी.अंतरावर असुन पुणे- सासवड- जेजुरी मार्गे तेथे जाता येते. मोरगाव पासुन हे अंतर ९ कि.मी. आहे. मोढवे गावात किल्ल्याप्रमाणे तटबंदी व बुरुज असलेल्या दोन वास्तु दिसुन येतात. या वास्तु म्हणजे एक सरदार पुरंदरे यांची गढी असुन त्याचीच प्रतिकृती असणारी दुसरी मोरे-पाटील यांची गढी आहे. साधारण १७६० ते १७७० च्या दरम्यान पेशवेकाळात बांधलेल्या या गढीच्या बांधकामातील समानता पहाता या दोन्ही गढी बांधणारे कारागीर एकच असावे. यापैकी पुरंदरे यांची गढी आजही नांदती असल्याने सुस्थितीत असुन पुरंदरे यांचे वंशज तेथे राहतात तर मोरे पाटील यांची गढी ओंस पडलेली असुन मोठया प्रमाणात ढासळलेली आहे. गढीच्या आतील भागात व बाहेरील बाजुस मोठया प्रमाणात बाभळीचे रान माजले आहे. मोरे पाटील यांची गढी दोन भागात विभागलेली असुन गढीच्या तटबंदीत एकुण सहा बुरुज आहेत. गढीचे खालील बांधकाम हे घडीव दगडांनी केलेले असुन वरील बांधकाम विटांमध्ये केलेले आहेत. या बांधकामात जागोजाग बंदुकीच्या मारगीरीसाठी जंग्या ठेवलेल्या आहेत. अर्धा एकर परिसरात पसरलेल्या या गढीला दोन दरवाजे असुन मुख्य दरवाजा उत्तराभिमुख आहे तर दुसरा लहान दरवाजा दक्षिणाभिमुख आहे. मुख्य दरवाजाला दिंडी दरवाजा असुन या दरवाजाच्या चौकटीवर सुंदर कोरीवकाम केलेले आहे. दरवाजाच्या आतील बाजुस असलेल्या देवडीतुन तटावर जाण्यासाठी जिना आहे. गढीचा हा पहिला विभाग बहुदा कचेरी म्हणुन वापरला जात असावा. गढीच्या दुसऱ्या भागात जाण्यासाठी पहिल्या दरवाजा प्रमाणेच प्रशस्त दरवाजा असुन या दरवाजाबाहेर ७-८ पायऱ्या आहेत. गढीचा हा दुसरा भाग राहण्यासाठी असुन या भागात एक लहान हौद व तटामध्ये शौचकुप दिसुन येतात. आतील तटबंदीत मोठया प्रमाणात कोनाडे असुन तटातील पायऱ्या पहाता आतील वाडा तीन मजली असल्याचे दिसुन येते. इतरत्र झाडी माजली असल्याने आपले गढीदर्शन थोडक्यात आटोपते घ्यावे लागते. या वाड्याबाबत अलीकडेच वर्तमानपत्रात आलेली बातमी येथे देत आहे. बारामती तालुक्यातील मोढवे येथे भागीरथी यशवंत मोरे-पाटील यांच्या वाडय़ात खोदकाम सुरू असताना प्राचीन आणि दुर्मिळ मुघलकालीन नाण्यांचा साठा सापडला. खोदकाम सुरू असताना जमिनीमध्ये साडेपाच किलो वजनाचा तांब्याचा हंडा सापडला. या हंड्यात साडेतेरा किलो वजनाची चांदीची नाणी सापडली. या ठिकाणी एक हजार २३३ नाणी सापडली. सापडलेली चांदीची नाणी इ. स. १७७४-१७८४ या दरम्यानची म्हणजे पेशवेकालीन आहेत. ही सर्व नाणी रुपया परिमाणाची असून त्यांचे वजन ११.२४ ग्रॅम्स ते ११.३२ ग्रॅम्स या दरम्यान आहे. उपलब्ध झालेल्या ११ नाण्यांपैकी ९ नाणी निजामअली (इ.स.१७६१-१८०३) याची असून त्यावर हिजरी कालगणनेची वर्ष कोरण्यात आली आहेत. या नाण्यांवर चंद्रकोरीप्रमाणे पर्शियन ‘नून’ (न) हे अक्षर असून ही नाणी दौलताबाद येथे पाडण्यात आल्याचे त्यांवर नमूद केले आहे. इतर दोन नाण्यांपैकी एक नाणे उर्दू कवन असणारे मुघल बादशहा दुसरा शाहआलम (१७५९-१८०६) याचे नाव कोरलेले आहे. हे नाणे चेन्नई जवळच्या ‘अरकाट’ या टांकसाळीचे आहे तर दुसरे नाणे हे दुसरा आलमगीर बादशहाच्या नावे असून ते बागलकोट (कर्नाटक) या टांकसाळीत पाडलेल्या या नाण्यावर दार-उल्- खिलाफत शाहजहानाबाद बागलकोट असा पर्शियन मजकूर आहे. इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदाशिव शिवदे यांच्या मते हे वाडे इ.स.१७४० नंतर उभारले असल्याने ही नाणी इ.स.१७८४ नंतर वाडय़ात पुरली गेली असावी. मोरे पाटील यांच्या गढीपासून काही अंतरावरच पुरंदरे यांची गढी आहे. या गढीच्या तटबंदीत चार बुरुज असुन गढीचे खालील बांधकाम हे घडीव दगडांनी तर वरील बांधकाम विटांमध्ये केलेले आहेत. या बांधकामात जागोजाग बंदुकीच्या मारगीरीसाठी जंग्या ठेवलेल्या आहेत. तटबंदीची उंची साधारण २५ फुट असुन रुंदी ८-१० फुट आहे. पाउण एकर परिसरात पसरलेल्या या गढीचा उत्तराभिमुख मुख्य दरवाजा आजही सुस्थितीत असुन अलीकडील काळात त्यासमोर एक आडवी भिंत घातलेली आहे. मुख्य दरवाजाला दिंडी दरवाजा असुन या दरवाजाच्या चौकटीवर सुंदर कोरीवकाम केलेले आहे. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्यासाठी देवड्या असुन यातील एका देवडीतुन तटावर जाण्यासाठी जिना आहे. गढीच्या आतील बाजुस चुन्यात बांधकाम केलेली एक दुमजली कौलारू इमारत आहे. ओसरीच्या पुढील दोन्ही बाजूंस खोल्या आहेत. वाड्यात दोन लहान तोफा गंजलेल्या अवस्थेत पडल्या आहेत. पुरंदरे यांच्या शेतातील एका विहिरीतून खापरी नळांने वाड्यात पाणी आणले आहे. विहिरीवर दहा फुट उंचीचे गोलाकार बांधकाम केलेले असुन येथील कमानींवरून खापरी नळ वाड्यापर्यंत नेले आहेत. हे खापरी नळ आजही फुटलेल्या अवस्थेत पहायला मिळतात. हवेचे दाबतंत्र (सायफन) व उंची यांचा वापर करून हि पाणीपुरवठा योजना बांधली आहे. वाड्याशेजारी दोन मुस्लिम कबर असुन या कबरीजवळ बांधकामासाठी लागणारा चुना मळण्याचा घाणा आहे. येथे आपले दुसरे गढीदर्शन पुर्ण होते. पुरंदरे हे इ.स. १७०० पर्यंत पुरंदर किल्ल्याचे सुभेदार होते. हे घराणे सासवड-सुप्याला स्थायिक झाल्यावर त्यांच्या दोन शाखा झाल्या. राजाराम महाराज जिंजीवर असताना झुल्फिकार खानाने जिंजीस वेढा दिला. हा वेढा हटविण्यासाठी शंकराजी नारायण, रामचंद्रपंत अमात्य, धनाजी जाधव, संताजी घोरपडे हे लढत होते. झुल्फिकारखानाने जिंजीचा वेढा उठवल्यावर राजाराम महाराजांनी या लोकांचा बक्षिसे देऊन गौरव केला. यात धनाजी जाधव यांच्या लष्करात असलेल्या तुको त्र्यंबक पुरंदरे यांना दोन गावची जहागिरी मिळाली. या सनदेवर छत्रपती राजाराम महाराजांची मुद्रा व प्रल्हाद निराजी यांचा शिक्का आहे. या सनदेवरून राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत तुको पुरंद-यांना सुपे व ब्राह्मणी गावची जहागीर मिळाल्याचे कळते. तुको पुरंदरे यांनी धनाजी जाधवांबरोबर जिंजी येथे जाऊन राजाराम महाराजांकडून हे इनामपत्र करवून आणले. त्यांपैकी अंबाजी त्र्यंबक यांना सुपे तर तुको त्र्यंबक यांना मोढवे गाव मिळाले व त्यांनी त्या ठिकाणी वस्ती करून गढीवाडे बांधले. शाहुराजे मोगली कैदेतून सुटल्यावर अंबाजी पुरंदरे यांचा पुतण्या मल्हार तुकदेव हा खानदेशात लांबकानीच्या मुक्कामात शाहूपक्षाला सामील झाला त्यामुळे धनाजी जाधवांना ताराराणीच्या पक्षातून वेगळे करणे सोपे झाले. नंतरच्या काळात अंबाजीपंत हे पेशव्यांचे मुतालिक झाले. ----------------------सुरेश निंबाळकर

मोढवे

जिल्हा - पुणे 
श्रेणी  -  सोपी   
दुर्गप्रकार - भुईकोट