आंबळे

जिल्हा - पुणे 
श्रेणी  -  सोपी   
दुर्गप्रकार - भुईकोट

महाराष्ट्रात वाडे व गढीकोट यांची संख्या हजारोच्या घरात आहे. वतने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या या गढीकोटाची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने बहुतांशी गढीकोट उध्वस्त होत चालले आहेत. तसेच बरेचसे गढीमालक इतरत्र स्थलांतरीत झाल्याने काही गढ्या ओस पडुन उध्वस्त झाल्या आहेत. स्थानिकांची या वास्तुप्रती असलेली उदासीनता देखील या गढीकोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे. आंबळे गावात असलेली सरलष्कर दरेकर यांची गढी त्यापैकी एक. पुरंदर तालुक्यातील आंबळे येथील दरेकर गढी पुण्यापासुन सासवडमार्गे ४८ कि.मी.अंतरावर असुन सासवड आंबळे हे अंतर १६ कि.मी. आहे. पेशवाईत घोडदळाचे सेनापती खंडेराव दरेकर यांचे वतन असलेले भरभराटीस आलेले हे गाव आजही त्याच्या अंगाखांद्यावर गतकाळाच्या वैभवशाली खुणा बाळगुन आहे. मुळात आंबळे गाव एका कोटात वसलेले असुन कधीकाळी या संपुर्ण गावाला तटबंदी व बुरुज असल्याच्या खुणा जागोजाग दिसुन येतात. या नगरकोटाच्या तटबंदीच्या आतच पेशव्यांचे घोडदळाचे सेनापती खंडेराव दरेकर यांचा वाडा व इतर काही वाडे होते. आंबळे गावात फेरी मारताना आजही पडीक अवस्थेत असलेले हे वाडे मोठया प्रमाणात दिसुन येतात. गावात प्रवेश करणारा रस्ता या कोटाच्या उध्वस्त दरवाजातुनच आत शिरतो. बारकाईने पाहिल्यास आजही या कोटाच्या दरवाजाची कमान व त्याशेजारील दोन ढासळलेले बुरुज आजही पहायला मिळतात. रस्त्याच्या डाव्या बाजुला असलेल्या उध्वस्त दगडी तटबंदीच्या प्रांगणात दोन पेशवेकालीन मंदिरे पहायला मिळतात. यातील राजराजेश्वर मंदिर म्हणुन ओळखले जाणारे शिवमंदीर पूर्वाभिमुख असुन सभामंडप व गर्भगृह अशी याची रचना आहे. मंदिराचा मंडप नक्षीकामाने नटलेला असुन कोरीव कामावरून हे मंदिर पेशवे काळातील असल्याचे जाणवते. यातील दुसरे मंदिर रामाचे आहे. गावात शिरण्यापुर्वी अलीकडेच रस्त्याच्या उजव्या बाजुला एक भलीमोठी दगडात बांधलेली बारव दिसते. या बारवचे पाणी आजही वापरात आहे. या बारवच्या समोरच आपल्याला कोटाचा आजही कमानीसकट आजही सुस्थितीत असलेला कोटाचा दुसरा दरवाजा व मोठया प्रमाणात घडीव दगडांची तटबंदी दिसुन येते. गावात शिरल्यावर सर्वप्रथम हनुमानाचे मंदिर असुन या मंदीरासमोर पेशवाईतील सरलष्कर खंडेराव दरेकर यांचा वाडा आहे. वाड्याचा मुख्य दरवाजा दिल्ली दरवाजा म्हणुन ओळखला जातो. वाडयाच्या या दरवाजाशेजारी दोन बुरुज असुन समोरील बाजुस नगारखाना व दुसरा वाडा आहे. गढीचा परीसर साधारण तीन एकरचा असुन गढीचे बुरुज व तटबंदी आजही मोठया प्रमाणात शिल्लक आहेत. गावात फेरी मारताना आपल्याला इतरही काही वाडे पहायला मिळतात. गावात भैरवनाथाचे म्हणजे शंकराचे अजुन एक मंदिर असुन या मंदिराला देखील तटबंदी आहे. पेशवाईतले घोडदळाचे सरसेनापती खंडेराव दरेकर यांच्यामुळे आंबळे गावाला एक ओळख आहे. आंबळे गावच्या पाठीमागे असलेल्या ढवळगडवर जाण्यासाठी आंबळे गावातुन रस्ता जातो. दरेकर यांच्या भोसरे येथील खटाव शाखेच्या इनामदार लहुराज दरेकर या वंशजांनी दिलेल्या माहितीनुसार दरेकर हे मोरे या ९६ कुळाचे उपकुळ आहे. मुळ सातारा येथील जावळी भागातील दारे गावचे ते दरेकर किंवा दऱ्याखोऱ्यातील वीर ते दरेकर म्हणुन ओळखले जातात. शिवकाळात हिरोजी, गणोजी हे पायदळाचे असामी म्हणून मराठा सैन्यात होते. त्यांचे वारस सुभानजी, गोरखोजी, मानाजी, गौरोजी यांना अनेक गावचे मोकासे होते. मराठयांमधील मोठ्या इनामदारांमध्ये दरेकर अग्रणी होते. यांचा पराक्रम उभारून आला तो पेशवेकाळात. आंबळे हे गाव छ. शाहुराजे यांनी सुभानजी दरेकर यांना लष्कर खर्चासाठी इनाम दिले. यांचे वंशात खंडेराव दरेकर सरलष्कर झाले त्यांनी माधवराव पेशवेंचा पिसाळलेल्या हत्तीपासून जीव वाचवला. पेशवेकाळात पानिपत, खर्डा, उदगीर, राक्षसभुवन, कर्नाटक, खानदेश येथे झालेल्या मराठ्यांच्या लढायात प्रमुख सरदारामध्ये दरेकर यांचा समावेश होतो. शनिवार वाड्याजवळ आजही दरेकरांचा वाडा आहे. इ.स.१७९४ मध्ये दसऱ्याच्या सीमोल्लंघनावरून परत आल्यावर शनिवार वाड्यातल्या दरबार महालात पेशव्यांनी रुपये ८२७ एवढ्या किंमतीची मानाची वस्त्रे हणमंतराव दरेकर यांना दिल्याची नोंद आढळते. ----------------सुरेश निंबाळकर