ढवळगड

जिल्हा - पुणे 
श्रेणी  -  सोपी   
दुर्गप्रकार - गिरीदुर्ग

इतिहासात प्रत्येक किल्ल्याला त्याची एक ओळख आहे पण काही किल्ले असे आहेत की इतिहासाने त्याची नोंदच घेतली नाही. असे अनेक किल्ले आज विस्मृतीत गेले असुन उपेक्षित आहेत. अशा अनेक गडापैकी सध्या शोधापेक्षा वादामुळे जास्त प्रसिध्दीस आलेला एक गड म्हणजे ढवळगड. हा किल्ला सासवड जवळील आंबळे गावामागील डोंगरावर असलेल्या छोट्याश्या टेकडीवर उभा आहे. केवळ स्थानिकांना व अभ्यासकांना ढवळगड-ढवळेश्वर या नावाने परिचित असलेले हे ठिकाण किल्ला म्हणुन दुर्गप्रेमीच्या यादीत सामील करण्याचे श्रेय ओंकार ओंक व डॉ.सचिन जोशी यांचे असले तरी यापुर्वी अनेक ठिकाणी या स्थानाचा किल्ला म्हणुन उल्लेख आला आहे. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक कृ.वा पुरंदरे यांच्या १९४० साली प्रकाशित झालेल्या किल्ले पुरंदर या पुस्तकात ढवळगडाचा सर्वांत पहिला उल्लेख येतो. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या पुस्तकातही ढवळगडाचा उल्लेख येतो. गो.नी.दांडेकर यांनी आपल्या किल्ले या पुस्तकात पुरंदर प्रकरणात ढवळगडचा उल्लेख किल्ला असाच केला आहे शिवाय प्रा. प्र.के.घाणेकर यांच्या साद सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची या पुस्तकात देखील या किल्ल्याचा उल्लेख आहे. अलीकडील काळात शिवाजीराव एक्के यांच्या "पुरंदर परिसर व "पुरंदरचे धुरंधर' या पुस्तकात ढवळगडाचे नाव आहे. बराच काळ उपेक्षित राहिलेल्या या गडाची माहिती शोधापेक्षा झालेल्या वादामुळे सहजतेने उपलब्ध झाली आहे. पण शेवटी ढवळगडला भेट देऊन आल्यावर याला किल्ला म्हणावे कि टेहळणीचे ठिकाण हा प्रश्न मनात उरतोच. पुण्याहून ढवळगडाला जाण्यासाठी सासवड- वनपुरी - वाघापूर -आंबळे असा रस्ता आहे. हे अंतर साधारण ५५ कि.मी. असुन आंबळे गावात शिरण्यापुर्वी उजवीकडून एक कच्चा रस्ता आंबळे रेल्वे स्थानकाकडे गेला आहे. या रस्त्यावर ढवळगडावर जाणारा फाटा असुन हा कच्चा रस्ता ढवळगडाच्या अर्ध्या उंचीवर गेला आहे. येथुन चालत १५ मिनिटात आपण गडावर पोहोचतो. गडावर येण्यासाठी पुणे-लोणीकाळभोर- उरुळीकांचन- डाळिंब हा दुसरा मार्ग असुन हे अंतर ४० कि.मी.आहे. गाडीमार्गे हे अंतर जरी कमी असले तरी डाळिंब या पायथ्याच्या गावातुन ढवळगडावर येण्यास उभा चढ असुन दिड तासाची तंगडतोड करावी लागते. त्यामुळे गडावर जाण्यासाठी पहिली वाट जास्त सोयीची असुन आंबळे गावचा नगरकोट व पेशव्यांचे घोडदळाचे सरदार दरेकर यांचा वाडा पहाता येतो. कच्च्या रस्त्याच्या शेवटी आपली गाडी जिथे थांबते तिथे एक पाण्यासाठी खोदलेली कुपनलिका असुन या कुपनलीकेच्या वरील बाजूस एक बांधकामाचा चुना मळण्याचा घाणा दिसुन येतो. या घाण्याचे चाक मात्र येथे नाही. या घाण्याशेजारी एका वास्तुचे अवशेष दिसुन येतात. येथुन ढवळगडाचा आज शिल्लक असलेला एकमेव बुरुज व तटबंदी तसेच त्याखाली असलेली माची नजरेस पडते. बुरुजाच्या वरील बाजुस काही प्रमाणात विटांचे बांधकाम केलेले आहे. येथुन पायवाटेने पुढे आल्यावर एका बांधीव चौथऱ्यावर हनुमान मुर्ती दिसुन येते. या मुर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे एकाचा दगडावर दोन बाजुला दोन मुर्त्या कोरल्या असुन जणु या मुर्त्या येणाऱ्या जाणाऱ्यावर लक्ष ठेवत असाव्या. चौथऱ्याच्या पुढील भागात गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. तटबंदी उजवीकडे ठेवत या पायऱ्या गडाच्या दरवाजात येतात. या वाटेत डावीकडे वळणावर एका घुमटीत गणपतीची मुर्ती दिसुन येते. दरवाजा समोर गडाची माची वाटावी असे लहान पठार असुन त्यावर कोणतेही अवशेष दिसुन येत नाही. दरवाजाची अर्धवट कमान आजही शिल्लक असुन या कमानीत दगडी बिजागर व अडसर घालण्याची जागा दिसुन येते. चिंचोळ्या आकाराचा हा गड पुर्व-पश्चिम पसरलेला असुन पुर्वाभिमुख प्रवेशद्वार असलेल्या या गडाची उंची समुद्रसपाटीपासून २८४५ फुट आहे. साधारण चौकोनी आकाराच्या गडमाथ्याची लांबी रुंदी १३० x ११० फुट असुन याचे क्षेत्रफळ साधारण १२-१५ गुंठे असावे. गडमाथा अतिशय लहान आहे. दरवाजा व तटाला लागुनच दोन खोल्या बांधलेल्या आहेत. याच्या पुढील भागात तटाला लागुनच एक १५-२० फुटांचे खडकात खोदलेले टाके असुन या टाक्यातील पाणी जमीनीत मुरु नये यासाठी टाक्याला चुन्याचा गिलावा केलेला आहे पण सध्या हे टाके कोरडेच आहे. गडावरील मुख्य ठिकाण म्हणजे म्हणजे ढवळेश्वर महादेव मंदिर. मंदिराचे सभामंडप व गर्भगृह असे दोन भाग असुन सभामंडपात नंदीची स्थापना केली आहे. बांधकामावरून मंदिराचे बांधकाम पेशवेकाळात झाले असावे. मंदिरासमोर पाण्याचे टाके असून यातील पाणी मंदिरासाठी व पिण्यासाठी वापरले जाते. गडाच्या इतर भागात असलेली तटबंदी पुर्णपणे कोसळली असुन बारकाईने पाहिल्यास या तटबंदीचे अवशेष दिसुन येतात. मंदिराच्या मागील बाजुस वृंदावन असुन त्याशेजारी एक घुमटी व नंदी दिसुन येतो. याशिवाय आंबळे गावाच्या विरुध्द बाजुने डाळिंब गावातून वर येणाऱ्या वाटेवर एक खडकात खोदलेले १०-१२ फूट खोल कोरडे टाके आहे. गडावरून पहाताना डाळिंब गावातून वर येणाऱ्या वाटेवर काही प्रमाणात झाडी दिसुन येते. या झाडीमध्ये पत्र्याच्या शेडखाली गणपतीची मूर्ती व एक शिवलिंग ठेवलेले आहे. येथे आपली गडफेरी पुर्ण होते. डाळिंब गावाच्या वाटेवर असलेले अवशेष पहायचे असल्यास गडफेरी करण्यास एक तास लागतो अन्यथा गडमाथा पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो.---------------------सुरेश निंबाळकर