खानदेश प्रांत साडे बारा रावलांचे वतन म्हणुन देखील ओळखला जातो. रावळ हि पदवी असुन या रावळात सिसोदिया, सोळंकी, परमार, प्रतिहार अशी वेगवेगळी कुळे आहेत. हि साडेबारा वतन म्हणजे १.दोंडाईचा २.मालपुर ३.सिंदखेडा ४.आष्टे ५.सारंगखेडा ६.रंजाणे ७.लांबोळा 8.लामकानी ९.चौगाव १०.हातमोइदा ११.रनाळे १२.मांजरे १३.करवंद हे अर्धे वतन खानदेशात व अर्धे खानदेश बाहेर असल्याने अर्धे वतन म्हणुन ओळखले जाई. यातील आष्टे, लांबोळा, चौगाव, हटमोईदा या ४ गढी पुर्णपणे नष्ट झालेल्या असुन ४ गढी आजही त्यांच्या मूळ रुपात शिल्लक आहेत तर उरलेल्या ५ गढी त्यांचे अवशेष संभाळत काळाशी झुंज देत आहेत. यातील बहुतांशी गढीकोटात गावे वसलेली असल्याने गावातील वाढत्या वस्तीने या कोटांच्या अवशेषांचा घास घेतला आहे तसेच स्थानिकांची उदासीनता देखील या कोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे. वतने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या गढीची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने बहुतांशी गढीकोट उध्वस्त होत चालले आहेत. करवंद गढी हि त्यापैकी एक. आजच्या संगणकाच्या युगात आंतरजालावरही या गढीची माहिती दिसुन येत नाही. आमच्या दुर्गभरारी या समुहाने या सर्व गढीचा अभ्यासपुर्ण दौरा केला असता मिळालेली माहिती या संकेतस्थळावर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. करवंद गढी धुळे शहरापासुन ६० कि.मी. अंतरावर असुन शिरपुरमार्गे तेथे जाता येते. शिरपुर- करवंद हे अंतर फक्त ५ कि.मी. आहे. गावात शिरल्यावर एक लहान रस्ता डावीकडे असलेल्या चढणीवर वळतो. येथे समोरच करवंद गढीचे उरलेसुरले अवशेष आहेत. गढीच्या मूळ वास्तुवर नव्याने बांधलेली सिमेंट कोन्क्रीटची इमारत असुन या इमारतीच्या खालील बाजूस गढीच्या एका बुरुजाचा दगडी पाया व त्यावर विटांनी बांधलेली इमारत पहायला मिळते. या ठिकाणी तटबंदी व जुन्या वाड्याचे अवशेष आजही काही प्रमाणात पहायला मिळतात. तटबंदीच्या डाव्या बाजुस असलेल्या घरापलीकडे एक लहानसा गोठा असुन या गोठयात एक सहा फुट उंचीची चौकोनी विरगळ पहायला मिळते. हि विरगळ चारही बाजुंनी कोरलेली असुन सतीशिळा व विरगळ या दोन्ही प्रकारात मोडते. यावर एका बाजुला सतीचा चुडेमंडीत हात कोरलेला असुन उर्वरित बाजुला एका योध्याचा मृत्युपट कोरलेला आहे. रावळ यांच्या गढीत असणारी हि विरगळ अर्थात रावळ परीवारापैकी असावी. गोठयाच्या वरील बाजूस रावळ यांच्या वंशजांनी नव्याने बांधलेली इमारत आहे. या इमारतीकडे जाताना वाटेत एक मध्यम आकाराची तोफ पहायला मिळते. रावळ यांच्या वंशजांनी केलेल्या गढीच्या वर्णनानुसार या गढीला एकुण नऊ बुरुज होते व हि गढी साधारण एक एकर परिसरात पसरलेली होती. सध्या या गढीत रावळ यांच्या घराशिवाय इतरही घरे झाल्याने व या वस्तीने गढीचे उर्वरित अवशेष नष्ट केल्याने कोटाचा आकार व इतर अवशेष याबाबत अंदाज करता येत नाही. गढीचे अवशेष, विरगळ व तोफ पहाण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो. याशिवाय करवंद गावाबाहेर आवर्जुन पहावी अशी एक होळकर कालीन बारव आहे. हि बारव ६० फुट लांब असुन तितकीच खोल आहे. या बारवमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या असुन या पायऱ्यांवर अनेक कमानी बांधल्या आहेत. इतिहासात करवंद गढीचे फारसे वेगळे असे संदर्भ आढळत नाहीत. खिलजीच्या आक्रमणानंतर राजपुतांची २४ कुळे अभयसिंह रावल यांच्या नेतृत्वाखाली मांडूच्या दिशेने गेली. या २४ कुळामध्ये एक कुळ करवंद संस्थानाच्या रावळाचे होते. वेळोवेळी सत्ताबदल झाले तरी या रावळाचे अधिकारात त्या सत्ताधीशांनी कोणतेच बदल केले नाही.-------------------सुरेश निंबाळकर

जिल्हा - धुळे  
श्रेणी  - सोपी   
दुर्गप्रकार - भुईकोट

करवंद