विदर्भातील अकोला जिल्ह्यात पर्यटन म्हटले कि आपल्याला आठवतो तो नरनाळा किल्ला व तेथील मेळघाट व्याघ्र प्रकल्प. पण अकोला जिल्ह्यातील अकोला शहरात आजही असदगड किंवा अकोला या नावाने ओळखला जाणारा किल्ला असल्याचे अनेकांना ठाऊक नाही. दुर्गप्रेमींच्या यादीत देखील या किल्ल्याची नोंद नसल्याने त्या अनुषंगाने घेतलेला अकोला किल्ल्याचा हा दुर्गवेध. स्थानिक कथेनुसार अकोलसिंग नावाच्या रजपूत सरदाराने मोरणा नदीकाठी अकोला गाव वसविले व या गावाच्या रक्षणासाठी सभोवती मातीची तटबंदी उभारली. त्यानंतर या किल्ल्याचा उल्लेख येतो तो ऐन-ई-अकबरी या ग्रंथात. ऐन-ई-अकबरी मधील उल्लेखानुसार अकोला हा परगणा नरनाळा सुभ्यात सामील होता. इ.स.१६९७ मध्ये औरंगजेबाचा दिवाण असदखान याला अकोला गाव इनाम मिळाले व त्याने अकोला गावाला चारही बाजुंनी भक्कम तटबंदी बांधली व किल्ल्याला आपले नाव दिले तोच हा असदगड किल्ला. शहरात असलेल्या ईदगाह वरील शिलालेखानुसार अब्दुल लतीफ याने असदखानच्या देखरेखीखाली १६९८ मध्ये हि तटबंदी बांधून पुर्ण केल्याचे म्हटले आहे म्हणजे हा किल्ला बांधण्यास साधारण वर्षभराचा कालावधी लागला. अकोला किल्ल्याच्या या तटबंदीत दहीहंडा वेस, बाळापुर वेस, अगरवेस, गजवेस असे एकूण चार दरवाजे बांधले होते. अकोला रेल्वे स्थानकापासून हा किल्ला ३ कि.मी.अंतरावर असुन तेथे जाण्यासाठी रिक्षा अथवा बस असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. स्थानिकांना किल्ला विचारण्याऐवजी राजराजेश्वर मंदिर विचारल्यास आपण सहजपणे किल्ल्याजवळ पोहोचता येते. राजराजेश्वर मंदिरासमोरील भागातच या किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या आहेत. काळाच्या ओघात किल्ल्याची तटबंदी व दरवाजे नष्ट झाले असुन आज आपल्याला किल्ल्याचा केवळ मोरणा नदीकाठी असलेला भाग पहायला मिळतो. किल्ल्याची तटबंदी खालील भागात दगडांनी बांधली असुन वरील भाग विटांनी बांधुन काढला आहे. मोरणा नदीकाठी असलेल्या या उंचवट्याला एकुण पाच बुरुज असुन त्यातील एक बुरुज पुर्णपणे कोसळला आहे. मोरणा नदीचे आज नाल्यात रुपांतर झाले असुन या नदीपात्रात एक विहीर पहायला मिळते. तटावरून फेरी मारताना एका बुरुजाखाली असलेला चुन्याचा घाणा दिसतो. किल्ल्याच्या तटबंदीत कधीकाळी अनेक बुरुज होते पण आज आपण किल्ला म्हणुन जो भाग पाहतो तो असद बुरूज, फतेह किवा पंच बुरूज, अगरवेस बुरूज या बुरुजांमधील परीसर आहे. फतेह किंवा पंच बुरुजालाच आज असदगड म्हणून ओळखले जाते. किल्ल्याच्या मध्यभागी अकोला नगर पालिकेने क्रांतिवीरांच्या स्मरणार्थ उभारलेला किर्तीस्तंभ अतिशय वाईट अवस्थेत आहे. या बुरुजावर एक अर्धवट पडलेली इमारत असुन हि इमारत हवामहाल म्हणुन ओळखली जाते. इ.स.१९०३ पर्यंत या इमारतीत शाळा भरत होती. या पडक्या इमारतीतुन काही अंतरावर असलेला अगरवेस बुरुज पहायला मिळतो. अगरवेस बुरुजा शेजारी असलेला अगरवेस दरवाजा आजही शिल्लक असुन हा दरवाजा नागपुरकर भोसल्यांचे सरदार गोविंद आप्पाजी यांनी १८४३ साली बांधला. हा दरवाजा व बुरुज पहायचा असल्यास दुर्गंधी आणि गल्लीबोळातून वाट काढत जावे लागते. इ.स.१८०३ मध्ये इंग्रज-मराठा युद्धात आर्थर वेलेस्ली याने अरगांवची लढाई जिंकण्यापुर्वी येथे छावणी दिल्याची नोंद आढळते. १८७०च्या सुमारास बराचसा किल्ला इंग्रजांनी नष्ट केला व उरलेला स्थानिक रहिवाश्यांनी अतिक्रमण करून नष्ट केला. संपुर्ण किल्ला पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो.-------------------सुरेश निंबाळकर

जिल्हा - अकोला  
श्रेणी  -  सोपी
दुर्गप्रकार- भुईकोट

अकोला