जिल्हा -सिंधुदुर्ग 
श्रेणी  - सोपी 
प्रकार - समुद्रकिनारा 

सह्यद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधल्या पायवाटा धुंडाळत केलेली भटकंती जितकी अंगातली रग शमवणारी तितकीच कोकणातल्या समुद्रकिनाऱ्याची भटकंती मनाला रिझवणारी. महाराष्ट्राच्या समुद्र किना-यावरील दक्षिण टोकाचे शेवटचे गाव म्हणजे रेडी. वेंगुर्ले तालुक्यातील रेडी हे गाव पर्यटनाच्या दृष्टीने जगाच्या नकाशावर पोहोचले आहे. रेडी गाव ऐतिहासिक पाश्र्वभूमी बरोबर लोह खनिजांच्या खाणीसाठीही प्रसिद्ध आहे. येथे स्वयंभू गणेश मंदिर आहे. याच गावातील समुद्रकिनाऱ्याला लागूनच यशवंतगड नावाचा एक अपरिचित किल्ला आहे. पर्यटक मंडळी तर सोडाच, हौशी ट्रेकर्सही येथे फारसे फिरकत नाही. रेडीचा समुद्रकिनारा हा पर्यटकांची फारशी गजबज नसलेला शांत आणि निर्मळ वातावरण असलेला समुद्रकिनारा आहे. येथे एक छोटे हॉटेल असुन थोडीफार खाण्याची सोय होते. मित्रमंडळी अथवा सहकुटुंबही येथे भेट देण्यास हरकत नाही. रेडी गावात येऊन समुद्र किनाऱ्याकडे आल्यावर भरतीच्या वेळेस बीचवर जाण्यासाठी होडीची मदत घ्यावी लागते. स्थानिक लोकांनी माफक दरात याची सोय केली आहे. येथे उन्हात मऊशार वाळूतून, समुद्राचा खारा वारा अंगावर घेत फेरफटका मारला तरी मनाला वेगळा आनंद मिळतो. डाव्या बाजूस, क्षितिजापर्यंत पसरलेली सागराची निळाई, तर उजवीकडे नारळी-पोफळीच्या बागा व हिरवीगार गच्च झाडी. येथे समुद्र फारच उथळ असल्याने वाळूची छोटी ‘बेटे’ तयार झालेली आहेत. त्यामुळे समुद्रात डुंबण्यासाठी हा एक सुरक्षित आणि उत्तम किनारा आहे. सुर्यास्ताच्या वेळेस अथांग पसरलेल्या अरबी सागरात सूर्यास्ताचे विलोभनीय दर्शन होते. या सुंदर ठिकाणी देशी पर्यटकांची अजिबात वर्दळ नाही दिसतात ते फक्त परदेशी पर्यटक. बरीच परदेशी मंडळी येथील शांत समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेताना दिसत होती. काही हुशार स्थानिक कोकणी माणसांनी, प्रखर व्यावसायिकतेचे दर्शन घडवत किनाऱ्यावर छोटी कॉटेजेस बांधून परदेशी पाहुण्यांची सोय केलेली आहे. तळकोकणातील अशा सुंदर समुद्रकिनाऱ्यांचे महत्त्व काही हजार किलोमीटर दूर असलेल्या परदेशी पर्यटकांनी आपल्या अगोदर ओळखले, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. येथे येणारे पर्यटक येथील पर्यटनावर बेहद खुश आहेत. रेडी किनारपट्टी म्हणजे निसर्ग सौंदर्याची खाण आहे. येथील स्वच्छता पाहून विदेशातील समुद्रकिनारे फिके वाटतात. येथील समुद्र किनाऱ्यावरील स्वच्छता अशीच कायमस्वरुपी टिकून राहण्यासाठी सर्व पर्यटकांनी व ग्रामस्थांनी प्रयत्नशील रहावे. जेणेकरून आगामी काळात येथील पर्यटन व्यवसायाला चांगले दिवस येतील. आगामी काळात येथील प्रशासनाने व पर्यटन विभागाने येथील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन समुद्र किनारी राहण्यासाठी खाण्यापिण्यासाठी, चांगल्या सुविधा दिल्या तर भविष्यात सोयीसुविधांच्या अभावामुळे गोव्याला जाणारे पर्यटक येथे वास्तव्य करतील. त्यामुळे स्थानिकांना रोजगार प्राप्ती होणार आहे. मात्र तशाप्रकारच्या सुखसुविधा देण्यासाठी प्रशासनाने लोकांना हाताशी धरून नियोजन करणे आवश्यक आहे. पर्यटकांचे हे प्रातिनिधिक मत पर्यटनाच्या बाबतीत खूप काही सांगणारे आहे. त्यामुळे आगामी काळात रेडी परिसरात व प्रामुख्याने किनारपट्टी भागात पुरेशा सुखसुविधा निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. खळखळत्या सागराच्या सोबतीने, निसर्गरम्य वातावरणात व साधा, प्रेमळ व कायम आपुलकीचा सल्ला देणाऱ्या कोकणी माणसांसोबत सवांद साधण्यासाठी एकदा तरी रेडी किनाऱ्याला भेट दयायला हवी.

रेडी