सोनगड

महाड शहराला सातव्या शतकापासूनचा वैभवसंपन्न इतिहास आहे. सावित्री, गांधारी आणि काळ नदीच्या तीरावर असलेल्या महाड तालुक्यात गांधारी नदीकाठी सातव्या शतकातील गांधारपाले या बौद्धकालीन लेणी आहेत. महाहट्ट म्हणजेच मोठी पेठ या पाली शब्दाचा अपभ्रंश होत पुढे महाड हे नाव झाले अशी महाडची ओळख आहे. महाड ही या परिसरातील मोठी बाजारपेठ होती. सावित्री नदीच्या मार्गाने याठिकाणी गलबतातुन मोठया प्रमाणात व्यापार चालत असे. सावित्री नदीचा हा मार्ग गाळाने भरून गेल्याने महिकावंती बंदर आणि दासगाव बंदर या बंदरांचे केवळ अवशेष शिल्लक राहिले आहेत. बंदरावरील या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी दौलतगड,सोनगड,महेंद्रगड या किल्ल्यांची साखळी निर्माण केली गेली. उत्तरेकडे रायगडापासून जी डोंगररांग सुरू होते ती चांभारगड व सोनगड ह्या दोन गडांपाशी येऊन थांबते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडची निवड केल्यावर रायगडाच्या प्रभावळीत समुद्राच्या दिशेने असलेल्या या किल्ल्यांना राजधानीच्या संरक्षणाच्या दृष्टीने अधिक महत्व प्राप्त झाले. या किल्ल्यांच्या साखळीमुळे शत्रुला राजधानीवर सहज हल्ला करणे कठीण होते. यातील सोनगडची निर्मिती नेमकी कोणत्या काळात झाली हे सांगणे जरी कठीण असले तरी रायगडचा उपदुर्ग असलेला हा किल्ला खाडीमार्गावरील टेहळणीचा एक महत्वाचा किल्ला होता. सावित्री नदीकाठी महामार्गाला लागुन गांधारपाले लेणी असलेल्या डोंगराच्या वरील बाजूस असलेल्या दुसऱ्या डोंगरावर सोनगडचे अवशेष पहायला मिळतात. महाड तालुक्यात असलेल्या सोनगडला भेट देण्यासाठी सर्वप्रथम मुंबई-गोवा महामार्गावरील मुंबईहुन जाताना महाडच्या ४ कि.मी. अलीकडील गांधारपाले गाव गाठावे लागते. गांधारपाले गावातुन एक कच्चा रस्ता किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या केंबूर्ली पठार या १६ घरांच्या वाडीकडे जातो. गांधारपाले गावातुन या गावापर्यंत चालत जाण्यास पाउण तास लागतो. केंबूर्ली पठारावरील या वाडीत जाईपर्यंत सोनगडचे दर्शन होत नाही. सोनगड असलेल्या डोंगराची एक सोंड केंबूर्ली पठारावरील या वाडीपर्यंत उतरली आहे. या वाडीत केवळ ४० माणसे वस्तीला असुन वाडीतील तरुणाई कामधंद्यासाठी शहरात असल्याने गावात किल्ल्यावर जाण्यासाठी वाटाड्या मिळत नाही. गडावर फारसे कोणी जात नसल्याने वाटा बुजलेल्या आहेत त्यामुळे आधी गावकऱ्याकडून वाट नीट समजून घ्यावी व नंतरच गडावर निघावे. गावकरी वाट सांगताना गडावरील झेंडा पहात गडावर जावे असे सांगतात पण गड चढताना हा झेंडा सतत नजरेसमोर राहत नाही. चिंचोळा माथा असलेला किल्ल्याचा डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला असुन किल्ल्याची समुद्रसपाटीपासुन उंची ८९० फुट आहे. वाडीतून गवताने भरलेल्या वाटेवरून दोन लहान टेकाडे व छोटे जंगल व काही सपाटी पार करत अर्ध्या तासात आपण किल्ल्याच्या दक्षिण दिशेस असलेल्या बुरूजासमोर पोहोचतो. या बुरुजाची मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन बुरुजाशेजारी दरीच्या दिशेने असलेल्या पुर्वाभिमुख उध्वस्त दरवाजातून आपण गडावर प्रवेश करतो. दरवाजाशेजारी असलेले बुरुज मोठया प्रमाणात उध्वस्त असुन त्यांचा काही भाग आजमितीला शिल्लक आहे. दरवाजातून आत शिरल्यावर वाटेच्या डाव्या बाजुला डोंगर उतारावर खडकात खोदलेली दोन पाण्याची टाकी दिसतात पण तिथे जाणारी वाट मात्र घसाऱ्याची असल्याने धोक्याची आहे. वाटेच्या पुढील भागात थेट भिंतीवरून आपण एका इमारतीत प्रवेश करतो. हि दगडी इमारत चौथऱ्यावर बांधलेली असुन या इमारतीच्या भिंती व दरवाजाची चौकट आजही शिल्लक आहे. या इमारतीच्या दरवाजाबाहेर आत येण्यासाठी आठ पायऱ्या आहेत. हि इमारत गडाच्या सर्वात उंच ठिकाणी असुन या इमारतीच्या आत भगवा झेंडा रोवला आहे. इमारतीच्या दुसऱ्या बाजुला काही प्रमाणात सपाटी दिसुन येते. या सपाटीवर दोन उध्वस्त वास्तुंचे अवशेष पहायला मिळतात. सपाटीच्या पुढील भागात एक लहानसा उंचवटा असुन त्यापुढील भागात सपाटीवर किल्ल्याचा उत्तर टोकावरील बुरुज आहे. या बुरुजाच्या टोकावर आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण किल्ला फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो मात्र पायथ्यापासुन इथवर यायला अडीच तास लागतो. शिवाजी महाराजांनी ऑक्टोबर १६५७ ते जानेवारी १६५८ च्या दरम्यान जावळीच्या खोऱ्यात उतरून चंद्रराव मोऱ्यांचा पराभव केल्यानंतर जावळीच्या खोऱ्यातील चंद्रगड, कांगोरी, मकरंदगड, सोनगड, चांभारगड हे किल्लेही स्वराज्यात दाखल करून घेतले. ह्यातील काही गड केवळ टेहळणीसाठी वापरत असल्यामुळे ते घेणे फारसे अवघड गेले नसावे पण ते घेण्यासाठी त्यांनी नेमका कुठला मार्ग घेतला ते इतिहासाला माहित नाही पण हे सर्व किल्ले नोव्हेंबर व डिसेंबर १६५७ ह्या दोन महिन्यात घेतल्याचे दिसुन येते. महाराज पन्हाळगडावर अडकले असता राजापुरच्या इंग्रजांनी विजापूरकरांना केवळ दारुगोळाच पुरवला नाही तर सिद्धी जोहारच्या सैन्यात येऊन इंग्रजी निशाण फडकावीत तोफा डागल्या त्यामुळे पन्हाळ्याच्या कोंडीतून सुटल्यावर मार्च १६६१ मध्ये एक हजार घोडदळ व तीन हजार पायदळ महाराज राजापुरास धडकले. राजापुर वखारीचा रेसिडेंट रेव्हिंग्टन व काही इंग्रजाना पकडून कैद केले. त्यातील दोन इंग्रज कैदेतच मरण पावले. या कैद्यांना महाराजांनी रायगडजवळील सोनगड येथे आणले व त्यांना रावजी पंडितांच्या स्वाधीन केले. हे कैदी काही काळ सोनगडावर कैदेत होते. शेवटी रेसिडेंट रेव्हिंग्टन आजारी पडला तेव्हा बरे होताच परत येण्याच्या अटीवर तो १७ ऑक्टोबर १६६१ रोजी सुरतेस गेला. यानंतर सोनगडचा उल्लेख इ.स.१८१७ मध्ये पेशवे दफ्तरात मिळतो. यात रायगड ताब्यात घेतल्यावर पेशव्यांनी सोनगड भागाचा बंदोबस्त ठेवण्यासाठी ३०० पायदळ नेमल्याची नोंद आढळते. ------------सुरेश निंबाळकर

जिल्हा - रायगड
श्रेणी  -  मध्यम
दुर्गप्रकार- गिरीदुर्ग