वर्धा जिल्हा म्हटले कि आपल्याला आठवते महात्मा गांधी यांचे सेवाग्राम पण विदर्भातील या वर्धा जिल्ह्यात एकेकाळी बरेच किल्ले गिरीदुर्ग, भुईकोट व गढी स्वरुपात अस्तित्वात होते. वर्धा जिल्ह्यातील किल्ल्यांची शोधयात्रा करताना आम्हाला एकुण १० कोट अवशेष रुपात पहायला मिळाले. आजच्या संगणक युगात आंतरजालावरही या किल्ल्यांची माहिती दिसुन येत नाही. या किल्ल्यांचा दौरा केला असता मिळालेली माहिती मी दुर्गभरारी या संकेतस्थळावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यातील बऱ्याच गढी पुर्णपणे नष्ट झाल्या असुन केवळ तटबंदीची एखादी भिंत अथवा एखादा बुरुज वा दरवाजा असे उर्वरित अवशेष काळाशी झुंज देत आहेत. या १० किल्ल्यात २ गिरिदुर्ग १ सराई तर उरलेल्या ७ गढी आहेत. यातील बहुतांशी गढीकोटात गाव ,मंदिरे वा दर्गा असल्याने या वास्तुनीच या कोटांच्या अवशेषांचा घास घेतला आहे तसेच स्थानिकांचे या वास्तु बद्दलचे अज्ञान व उदासीनता देखील या कोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे. संस्थाने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या या गढीकोटाची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने बहुतांशी गढीकोट उध्वस्त होत चालले आहेत तर काही पार जमीनदोस्त झाले आहेत. आर्वी तालुक्यातील विरूळ गावात असलेली गढी यापैकी एक आहे. विरूळ येथील गढीला भेट देण्यासाठी आपल्याला वर्धा शहर गाठावे लागते. वर्धा ते विरूळ हे अंतर ३२ कि.मी.असुन तेथे जाण्यासाठी बस व रिक्षा उपलब्ध आहेत. बस थांब्यावर उतरून गढीकडे जाताने वाटेत मोठया प्रमाणात जुन्या धाटणीची घरे व वाडे दिसुन येतात. आयताकृती आकाराची हि गढी गावाच्या मध्यभागी असलेल्या उंचवट्यावर १ एकर परिसरात असुन एकेकाळी ७ बुरुज असलेल्या या गढीला आज केवळ ४ बुरुज व काही प्रमाणात मातीची तटबंदी शिल्लक आहे. यातील २ बुरुज दरवाजासमोर होते तर उर्वरित ५ बुरुज गढीच्या तटबंदीत आहेत. या बुरुजावर बंदुकीच्या मारगीरीसाठी जंग्या दिसुन येतात. गढीचा दरवाजा पुर्वाभिमुख असुन त्याचे काही प्रमाणात नुतनीकरण झाले असले तरी त्याचीं मूळ बांधणी कायम असुन दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस कचेऱ्या दिसुन येतात. गढीच्या मध्यभागी घडीव दगडात बांधलेला चौथरा असुन त्यामागील भागात पडलेल्या वाडयाची भिंत दिसुन येते. दरवाजाच्या आत डाव्या बाजुला गढीचे मूळ मालक व वंशज यांची घरे असुन यातील पहिल्या घराच्या मागील आवारात घडीव दगडात बांधलेली पंचकोनी विहीर दिसुन येते. गढीचे मूळ मालक व त्यांचे वंशज असलेले शशिकांत वाणी ( कुरझडीकर ) यांनी दिलेल्या माहितीनुसार कुरझडीकर यांच्याकडे ४ गावाची मालगुजारी होती त्यापैकी विरूळ हे एक गाव होते. सोनेगाव येथे असलेली गढी कुरझडीकर यांनी संत आबाजी यांना दान दिली व काही कारणाने कुरझडी येथील मुक्काम हलवून विरूळ येथे स्थायिक झाले. विरूळ येथील गढी पेंढाऱ्यानी बांधलेली असुन येथे आल्यावर कुरझडीकर यांनी गढीचा ताबा घेतला. संपुर्ण गढी पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो.------------------सुरेश निंबाळकर

विरूळ

जिल्हा - वर्धा
श्रेणी  -  सोपी
दुर्गप्रकार- भुईकोट