केळझर

जिल्हा - वर्धा
श्रेणी  -  सोपी
दुर्गप्रकार- गिरीदुर्ग

महाराष्ट्राच्या पूर्वेकडे असलेला निसर्गसंपन्न प्रदेश म्हणजे विदर्भ. प्राचीन परंपरा लाभलेल्या या प्रदेशात वाकाटक, कलचुरी अशा बलाढय़ राजसत्ता नांदल्या. त्यांच्या समृद्धीचे अवशेष आजही येथे उत्खनन करताना सापडतात. विदर्भातील अष्टविनायकांपैकी सिद्धीविनायक गणपती असलेले ठिकाण म्हणजे वर्धा जिल्ह्यातील केळझर गाव. महाभारतातील एकचक्रा नगर म्हणजेच आजचे केळझर अशी लोकांची श्रद्धा असल्याने हा गणपती एकचक्रा गणपती म्हणुन देखील ओळखला जातो. सिद्धीविनायकाचे हे मंदिर केळझर किल्ल्यावर असून आजुबाजूचा परिसर हा डोंगरांनी वेढलेला आहे. केळझर किल्ल्याला भेट देण्यासाठी तालुक्याचे शहर असलेले सेलु हे सर्वात जवळचे ठिकाण आहे. वर्धा ते दे सेलु हे अंतर १५ कि.मी. असुन सेलु ते केळझर हे अंतर १० कि.मी. आहे. सेलु येथुन केळझरला जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध आहेत. बस थांब्यावर उतरून किल्ल्याकडे जाताना रस्त्याच्या डाव्या बाजुस नव्याने बांधलेले एक विष्णु मंदिर दिसते. या मंदीरात ८ व्या शतकातील दशावताराची प्रभावळ कोरलेली सुंदर विष्णु मुर्ती पहायला मिळते. किल्ल्याकडे जाताना गावात ठिकठिकाणी विखुरलेले प्राचीन अवशेष पहायला मिळतात. गावाबाहेरील टेकडीवर असलेल्या केळझर किल्ल्याचे मोठया प्रमाणात मंदीरात परिवर्तन झालेले असुन किल्ल्याचे अस्तित्व दर्शविणारी तुरळक तटबंदी,एक बुरुज व पाण्याचे एक टाके(पुष्करणी) शिल्लक आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग असुन एक वाट पायऱ्यांची तर दुसरा गाडीमार्ग आहे. गाडीमार्गाने किल्ल्यावर जाताना बुरुजाखालुन आपला किल्ल्यावर प्रवेश होतो. कमानीतुन आत शिरल्यावर सर्वप्रथम डाव्या बाजुचा बुरुज पाहुन घ्यावा. केळझर किल्ल्याला असलेल्या ५ बुरुजापैकी हा एकमेव बुरुज आज शिल्लक आहे. बुरुजावर जाताना उजव्या बाजुस मारुतीचे मंदिर असुन बुरुजावर नव्याने बांधलेले शिवमंदीर आहे. बुरुजावरून दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. शिवमंदीर पाहुन गणेश मंदिराकडे जाताना डावीकडे एक पायरीमार्ग खाली जाताना दिसतो. या वाटेच्या शेवटी घडीव दगडात बांधलेली चौकोनी पुष्करणी असुन या पुष्करणीत उतरण्यासाठी पायऱ्या तसेच पायऱ्यांच्या टोकाला कोरीवकाम केलेला दरवाजा आहे. पुष्करणीच्या वरील बाजूस पाणी काढण्यासाठी दगडी रहाट असुन पुष्करणीच्या भिंतीत दोन कोनाडे आहेत. पुष्करणी पाहुन आल्या वाटेने गणेश मंदिराकडे निघावे. गणेश मंदिर केळझर किल्ल्याच्या उंच भागात बांधलेले असुन गणेश मंदिराच्या दरवाजात उत्खननात सापडलेली ८ व्या शतकातील विष्णुमुर्ती ठेवली आहे. गणेश मंदिरातील गणेशमुर्ती उजव्या सोंडेची असल्याने सिद्धिविनायक म्हणुन ओळखली जाते. मंदिराच्या मागील बाजुस असलेल्या महालक्ष्मी मंदिरात ८ व्या शतकातील दोन विष्णुमुर्ती असुन पुजेची महालक्ष्मी मुर्तीदेखील ८ व्या शतकातील आहे. या मंदिराजवळच धर्मशाळा बांधलेली आहे. गणेश मंदिराच्या आवारात काही झीज झालेल्या मुर्ती ठेवलेल्या असुन परिसरात फेरी मारताना दोन ठिकाणी उध्वस्त तटबंदी पहायला मिळते. किल्ला पहाण्यास एक तास पुरेसा होतो. केळझर किल्ल्याची निर्मिती वाकाटक काळात झाल्याचे मानले जाते. मोगल काळात विदर्भात गोंड राजा कोकशाहचे राज्य असताना केळझर येथे मोगलांचे ठाणे असल्याचे संदर्भ आढळतात. --------------सुरेश निंबाळकर