मुंबई सारख्या मायानगरीत किल्ले म्हटले कि आपल्याला थोडे आश्चर्य वाटते पण कधीकाळी ब्रिटीशकाळात मुंबईसारख्या शहरातसुद्धा अकरा किल्ले होते. पोर्तुगीज व ब्रिटीश यांच्या वेगवेगळ्या कालखंडात यांची बांधणी झाली. मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावर वरळी,माहीम, बांद्रा,मढ हे किल्ले तर उत्तरेकडील किनारपट्टीवर काळा किल्ला,रीवा किल्ला,सायन किल्ला या किल्ल्यांची साखळी निर्माण करण्यात आली. पुर्वेला शिवडी, माझगाव, डोंगरी आणि बॉम्बे फोर्ट मुंबईचे रक्षण करत होते. यातील माझगाव व डोंगरी हे किल्ले पूर्णपणे नष्ट झालेले असुन बॉम्बे फोर्टचा केवळ एक अवशेष पहाता येतो .उरलेले आठ किल्ले मात्र आजही आपल्याला बघायला मिळतात. सायनवरून वाशीला जाताना उजवीकडे एक उंच डोंगर दिसतो तोच हा मुख्य मुंबईच्या शीवेवर म्हणजेच सीमेवर असलेला 'शीव किंवा सायनचा किल्ला. माहीम खाडीच्या पुर्वेच्या मुखावरील टेकडीवर इंग्रजांनी शीवचा किल्ला बांधला. मध्य रेल्वेच्या सायन स्थानकाच्या पूर्व बाजूस उतरुन डाव्या हाताच्या सडकेने काही अंतर चालल्यावर सायन-पनवेल महामार्ग येतो. हा महामार्ग ओलांडल्यावर दुतर्फा पुरातन वृक्ष उभे असलेल्या रस्त्याने काही अंतर चालले की आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. सायन किल्ल्याच्या पायथ्याशीच महानगर पालिकेचे नेहरु उद्यान आहे. जवळच भारतीय पुरातत्व विभागाचे कार्यालय आहे. तेथे एका चबुतऱ्यावर २ तोफा चाकाच्या गाड्यावर ठेवलेल्या आहेत. कार्यालयाच्या दारातूनच पायऱ्याचा रस्ता किल्ल्याकडे जातो. किल्ल्यावर जाण्यासाठी व्यवस्थित पायरीमार्ग असुन उत्तर व दक्षिण अशा दोनही बाजुनी किल्ल्यात प्रवेश करता येतो. टेकडीवर चढताच किल्ल्याचे अवशेष नजरेस पडतात. पुरातत्व खात्याने किल्ल्याची नीटपणे निगा राखली आहे. किल्ल्याची बांधणी पुर्णपणे ब्रिटीश धाटणीची असुन आजही आपल्याला बरेचसे अवशेष पहायला मिळतात. सायन किल्ल्याभोवतालची तटबंदी आजही काही प्रमाणात शिल्लक असुन तटबंदीत संरक्षणासाठी असलेल्या रचना पाहायला मिळतात. किल्ल्यातील उपलब्ध अवशेष व ऐतिहासिक संदर्भांवरून या किल्ल्याचा वापर टेहळणी व्यतिरिक्त कार्यालय म्हणुन केला गेला असावा. या किल्ल्याच्या बांधणीत घडीव-अघडीव दगड, चुना यांचा वापर केला गेला आहे. ही वास्तु काही ठिकाणी दुमजली तर काही ठिकाणी तीन मजली होती हे किल्ल्याच्या भिंतीवरील लाकडी वाशाकरिता असलेल्या खाचावरून लक्षात येते. किल्ल्याच्या मध्यभागी एक मध्यम आकाराची तोफ पाहायला मिळते. याशिवाय किल्ल्यात तटबुरुज, कार्यालयाचे अवशेष, दारुकोठाराची खोली व चौकोनी आकाराचा मोठा हौद असे अवशेष आजही तग धरुन आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या बुरुजावरुन माहीमची खाडी व आजुबाजूच्या विस्तृत प्रदेशाचे विहंगम दृश्य दिसते. या किल्ल्याचा उपयोग मुख्यत्वे टेहळणीसाठी व माहीम खाडीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी केला जात होता. नव्याने होत असलेल्या उंच उंच इमारतींपुढे या किल्ल्याची उंची आता कमी वाटू लागली आहे पण एक काळ असा होता की शीव या किल्ल्यावरून केवळ माजगाव हा डोंगरी किल्लाच नव्हे तर मुंबईतील इतर किल्लेही पहाता येत होते. शत्रूचा हल्ला झाल्यास त्याला शहरात घुसू न देण्यासाठी मुंबईच्या शीवेवरील या किल्ल्यात त्यावेळी बऱ्याच तोफां ठेवण्यात आल्या असाव्यात हे येथे आढळणाऱ्या तोफांवरून लक्षात येते. प्रत्येक मुंबईकरांनी एकदा तरी ह्या किल्ल्याला भेट दिली पाहिजे. रीवा किल्ला, सायन किल्ला, धारावी किल्ला यांना लढाईचा इतिहास नाही कारण या किल्ल्यांचा वापर केवळ टेहळणीसाठीच झाला. मुंबई व साष्टी बेटांची सरहद्द म्हणजे शीवचा भाग. पोर्तुगीजांनी १५३४ मध्ये गुजरातच्या सुलतानाकडून मुंबई बेटं ताब्यात घेतली. पुढे पोर्तुगीजांनी इंग्रजांना १६६४ साली मुंबई बेटाचा अधिकृत ताबा दिला. मोठा कुलाबा, छोटा कुलाबा, मुंबई, माझगाव, परळ, वरळी आणि माहीम ही मुंबईची मूळ सात बेटं. सात बेटांच्या मुंबईचं एक बेट होऊ लागलं तेव्हा ब्रिटिशांनी मुंबईच्या उत्तर सीमेवर आणखी तीन किल्ले शहराच्या संरक्षणासाठी बांधले. काळा किल्ला, रिवा आणि शीव हे ते तीन किल्ले आहेत. मुंबई बेट व पोर्तुगिजांच्या ताब्यातील साष्टी बेट यांच्या सीमेवर हा किल्ला १६७० मध्ये जेरॉल्ड ऑगियरने बांधला. यामुळे पूर्वेकडून होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच शत्रू सैन्याचे आक्रमण थोपवण्यासाठी मुंबईचा सीमेवरचा हा किल्ला इंग्रजांना फार महत्त्वाचा होता. १७४० मध्ये मराठ्यांनी पोर्तुगिजांचं साष्टी बेटांतून उच्चाटन करेपर्यंत शीवचा किल्ला हा ब्रिटिश व पोर्तुगीज यांच्या प्रदेशांच्या केवळ सरहद्दीवरील किल्ला होता पण वसईच्या विजयानंतर पोर्तुगिजांकडून साष्टी बेट मराठ्यांच्या ताब्यात गेले आणि संरक्षणाच्या दृष्टीने ह्या किल्ल्यांला अधिकच महत्व आले. माजगावच्या किल्ल्याच्या जोडीने हा किल्लाही उंच असल्यामुळे पूर्व व पश्चिम किनारपट्टीवरील सर्व किल्ल्यांना धोक्याचे इशारे देण्यासाठीही हा किल्ला महत्वाचा होता. समुद्राचं पाणी माहीमकडून आत यायचं आणि शीवला बाहेर पडायचं हीच ती माहीमची खाडी. माहीमच्या खाडीच्या तोंडाशी समुद्र रोरावत असायचा. तिथून तो आत घुसायचा पण सायनला जमिनीची पातळी थोडी उंचावर असल्याने तिथे समुद्र उथळ होता. तिथे तो बुजवूनच टाकण्यात आला व सायनला चुनाभट्टी आणि कुर्ला ही दोन गावं जोडण्यात आली. माहीमकडून समुद्राचं पाणी आत घुसतच होतं. ते वाट काढत आत गेलं तीच ही पुर्वीची मिठी खाडी व आजची मिठी नदी. बांद्र्याहून माहीमला मुंबई बेटावर जायचं तर होडीतून खाडी पार करावी लागायची. समुद्राच्या या पाणथळ भागातली बांधकामं जशी वाढत गेली तशी खाडी आकसत गेली व शेवटी मिठी खाडीचं रुपांतर व नामांतर मिठी नदीत झाले. -------सुरेश निंबाळकर

जिल्हा -मुंबई  
श्रेणी  - सोपी 
दुर्गप्रकार-सागरी किल्ला 

सायन किल्ला