बांदा

जिल्हा - सिंधुदुर्ग

श्रेणी  -  सोपी

दुर्गप्रकार- भुईकोट

मुंबई गोवा महामार्गावर बांदा हे महाराष्ट्र-गोवा सीमेवर असलेले शेवटचे गाव. सावंतवाडी शहर अस्तित्वात येण्यापुर्वी कुडाळ परगण्यात तेरेखोल नदीकाठी असलेले बांदा बंदर आणि बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध होते. आंबोली घाटात उगम पावणारी तेरेखोल नदी ५० कि.मी.चा प्रवास करत तेरेखोल येथे समुद्रास मिळते. तेरेखोल नदी जेथे समुद्रास मिळते तिथुन साधारण ३५ कि.मी.आत या नदीच्या काठावर बांदा शहर वसले आहे. समुद्रमार्गे बांदा बंदरावर आलेला माल आंबोली घाटमार्गाने देशावर जात असे. या बंदराचे व बाजारपेठेचे रक्षण करण्यासाठी तेरेखोल नदीकाठी असलेल्या टेकडीवर आदिलशाही काळात व त्याआधी बांदा किल्ला बांधला गेला. मुंबई ते बांदा हे अंतर ५०४ कि.मी. असुन सावंतवाडी शहरापासुन बांदा १५ कि.मी.अंतरावर आहे. बांदा किल्ला स्थानिक लोकांना फारसा परिचित नसुन बांदा पोलीस ठाणे किल्ल्यात असल्याने पोलीस ठाणे विचारल्यास आपण सहजपणे किल्ल्यावर पोहोचतो. किल्ल्याचा पुर्वाभिमुख दरवाजा एका बुरुजाच्या आडोशाला बांधलेला असुन अलीकडील काळात हा बुरुज व दरवाजाची दुरुस्ती झाली असावी. दरवाजाच्या बांधकामावर काही प्रमाणात पोर्तुगीज बांधकामाची छाप असुन बुरुजावर तोफा व बंदुकीच्या मारगिरीसाठी जंग्या दिसुन येतात. बुरुज व दरवाजाच्या आतील प्रवेशमार्गावर कौलारू छप्पर घातलेले असुन हा भाग पोलीस ठाण्याच्या कार्यालयीन वापरात आहे. दरवाजाच्या आत असलेल्या तटबंदीत एक बंदीस्त कोठार असुन बुरुजावर पहारेकऱ्याची खोली दिसते. दरवाजाच्या आतील बंदीस्त मार्गाने १०-१२ पायऱ्या चढुन आपला किल्ल्यात प्रवेश होतो. समोरच महापुरुषाचे मंदीर असुन त्याच्या उजव्या बाजुला किल्ल्याचा दुसरा बुरुज व पाठीमागे किल्ल्याची तटबंदी दिसते. वाटेने सरळ पुढे आल्यावर आपण पोलीस ठाण्याच्या आवारात येतो. येथे उजव्या बाजुस पोलीस ठाण्याची इमारत असुन डावीकडे किल्ल्याची तटबंदी तर समोर एक जुनी इमारत दिसते. डाव्या बाजुच्या तटबंदीबाहेर खाली उतरणाऱ्या पायऱ्या असुन येथील तुटलेली तटबंदी पहाता या ठिकाणी लहान दरवाजा असावा किंवा हा मार्ग नंतरच्या काळात बांधला गेला असावा. समोरील जुन्या इमारतीत उजव्या बाजुस पाटेश्वर मंदीर असुन इमारतीत प्रवेश करून आपण किल्ल्याच्या मागील भागात येतो. येथे एका वास्तुचा चौथरा पहायला मिळतो. या भागात असलेल्या बुरुजावर नदीपात्रात तोफेचा मारा करण्यासाठी झरोका असुन तटबंदीत बंदुकीच्या माऱ्यासाठी जंग्या आहेत. किल्ल्याचा हा भाग तेरेखोल नदीकाठी असुन येथुन किल्ल्याला वळसा घालत दुरवर जाणारे तेरेखोल नदीचे पात्र दिसते. या ठिकाणी आपली अर्ध्या तासाची गडफेरी पुर्ण होते. किल्ल्याचा परीसर साधारण एक एकरचा असुन किल्ल्यात पोलीस ठाणे असल्याने त्यांनी किल्ल्याची चांगली निगा राखली आहे. किल्ल्यात पोलीस ठाणे असल्याने त्यांच्या परवानगीने किल्ला पहावा. किल्ल्याबाहेरून फेरी मारताना झाडीत लपलेली तटबंदी व त्यातील जंग्या पहायला मिळतात. १४ व्या शतकात विजयनगर साम्राज्यात असणारा बांदा किल्ला १४७० च्या सुमारास बहामणी वजीर महम्मद गवान याने जिंकला. बहमनी राज्याच्या अस्तानंतर १४९० मध्ये बांदा शहर आदिलशहाच्या ताब्यात आले व त्याने त्याचे नामांतर आदीलाबाद केले. याच काळात बांदा किल्ला बांधला अथवा दुरुस्त केला गेला. १६ व्या शतकाच्या सुरवातीस आदिलशहा व पोर्तुगीज यांच्यात वितुष्ट आल्याने व्हाइसराय आलबुकर्क याने बांदा शहरावर हल्ला केला व आदिलशाही सैन्याला कुडाळपर्यंत मागे रेटले. शिवकाळात १५ जुन १६६३ च्या सुमारास शिवाजी महाराज बांदा येथे येऊन गेल्याचा उल्लेख एका इंग्रजी पत्रात येतो. १६६४ मध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान महाराजांनी खवासखानाचा पराभव केला व कुडाळ परगण्यातील आदिलशाहीचे बस्तान उठवले. या काळातच बांदा प्रांत मराठयांच्या ताब्यात आला. मराठयांच्या आश्रयास आलेला औरंगजेब राजपुत्र अकबर मक्केस जाण्यासाठी पोर्तुगीजांकडे जहाजे व परवानगी घेण्यासाठी ३ जानेवारी १६८३ रोजी बांद्यास आला पण बोलणी फिसकटल्याने राजापुरास परत गेला. महाराजांच्या मृत्युनंतर आलेल्या आलमगीर वावटळीत मे १६८३ मध्ये औरंगजेब शहजादा शहाआलम याने बांदा शहर जाळले पण मराठयांच्या सततच्या हल्ल्याने जेरीस येऊन त्याला मागे फिरावे लागले. त्यानंतर मराठ्यांनी बांदा पुन्हा ताब्यात घेतले. संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर सावंतवाडीचे खेम सावंत मोगलांना सामील झाले व त्यांच्या मदतीने जुन १६८९ मध्ये बांदा किल्ला जिंकुन घेतला. मराठा राज्याच्या सातारा व करवीर अशा दोन गादी विभाजनानंतर खेम सावंतानी दोन्ही गादीकडून बांदा प्रांताची सनद मिळवली व आपला हक्क कायम ठेवला. पुढे सावंतानी तेरेखोल खाडीमुखावर तेरेखोल किल्ला बांधला पण १७४६मध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला ताब्यात घेतला. तेरेखोल किल्ल्यावरून लांब पल्ल्याच्या तोफांनी तेरेखोल खाडीत शिरणाऱ्या गलबतांवर नियंत्रण होऊ लागल्याने बांदा किल्ल्याचे महत्व कमी झाले. सावंतांच्या गृहकलहात निपाणीकर निंबाळकर यांचा सरदार आपाजी सुबराव याने १८०८ मध्ये सावंताना कैद करून बांदा व इतर ठिकाणे ताब्यात घेतली. १८१० मध्ये सावंतांचा सरदार चंद्रोबा सुभेदार याने सुबरावचा पराभव करत बांदा किल्ला ताब्यात घेतला व पुढे तोच या किल्ल्याचा किल्लेदार झाला. गृहकलहात सावंतांचे त्यांच्या सरदारावर नियंत्रण राहिले नाही व किल्लेदार त्यांच्या ताब्यातील किल्ले बळकावून बसले. सन १८१९ला विल्यम्स ग्रांट केर या इंग्रज अधिकाऱ्याने सावंतवाडीवर हल्ला केला असता चंद्रोबा सुभेदार यांना फितूर करून तटस्थ राहण्यासाठी सालीना दहा हजार नेमणुक व बांदा कोट देण्यात आला. सन १८३२ मध्ये चंद्रोबा सुभेदार यांच्या अमलाखालील बांदा किल्ल्याला खर्चासाठी सालाना १२४९ रुपयांची नेमणुक होती.---------सुरेश निंबाळकर