जिल्हा - सिंधुदुर्ग

श्रेणी  -  सोपी

दुर्गप्रकार- सागरीदुर्ग

निवती

कोकण प्रांताला निसर्गाचे वरदान लाभले आहे पण त्यात निसर्गाने सौंदर्याचे भरभरून दान काही जास्तच प्रमाणात निवती गावाच्या पदरात टाकले आहे. माडांची बने,सोनेरी वाळु व निळाशार समुद्र अशा सौंदर्याने नटलेल्या या गावात येऊन येथील निसर्गाच्या प्रेमात न पडलेला पर्यटक विरळाच. कर्ली नदी जिथे समुद्राला मिळते त्या खाडीच्या दक्षिणेला असलेल्या निवती गावात समुद्रात घुसलेल्या एका उंच भुशीरावर निवतीचा किल्ला बांधण्यात आला आहे. निवती गावात दोन वाड्या असुन निवती किल्ल्याला भेट देण्यासाठी आपल्याला किल्ले निवती गाठावे लागते. निवती किल्ला नेमका कोणी बांधला हे इतिहासाला ठाऊक नसले तरी शिवरायांनी सिंधुदुर्गाच्या संरक्षणासाठी सभोवती उपदुर्गाची साखळी उभारताना या किल्ल्याची बांधणी केल्याचे मानले जाते. मालवणहुन सागरी महामार्गाने निवती गाव २६ कि.मी.वर असुन कुडाळहुन परुळेमार्गे हे अंतर २८ कि.मी.आहे. किल्ले निवती गावातील बस स्थानकातून एक डांबरी रस्ता किल्ल्यासमोरील पठारावर गेलेला असुन या रस्त्याने आपण थेट किल्ल्याच्या दरवाजासमोर येतो. किल्ल्याच्या दरवाजासमोर ८-१० खडकात कोरलेल्या पायऱ्या असुन उर्वरीत पायऱ्या व या दिशेला असलेला खंदक पठारावर आलेल्या डांबरी रस्त्यामुळे नष्ट झाला आहे. किल्ला व पठार यामध्ये १५ फुट रुंद व २० फुट खोल खंदक खोदुन किल्ल्याला पठारापासून वेगळे केले आहे. या खंदकात आज मोठया प्रमाणात झाडी वाढली आहे. पठाराच्या दिशेने असलेल्या किल्ल्याच्या तटबंदीत तीन बुरुज बांधलेले आहेत. किल्ल्याचा दरवाजा पुर्वाभिमुख असुन या दरवाजाशेजारी असलेला बुरुज ढासळून त्यांची दगडमाती दरवाजात पडल्याने दरवाजा बुजला आहे त्यामुळे आपला गडप्रवेश दरवाजाऐवजी शेजारील ढासळलेल्या तटबंदीतुन होतो. दरवाजाच्या आतील भागात मोठया प्रमाणात झाडी वाढलेली असुन यातून वाट काढत दरवाजाकडे आल्यास दरवाजाशेजारील बुरुजात पहारेकऱ्याच्या देवड्या दिसतात. साधारण चौकोनी आकाराचा हा किल्ला साडेचार एकरवर पसरलेला असुन मुख्य किल्ला व एका कोपऱ्यात बालेकिल्ला अशी याची रचना आहे. बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ अर्ध्या एकरपेक्षा कमी असुन बालेकिल्ल्यासमोर खंदक खोदुन त्याला मुख्य किल्ल्यापासुन वेगळे केले आहे. बालेकिल्ला आजही सुस्थितीत असुन दरवाजाकडून डावीकडे जाणारी वाट बालेकिल्ल्यात तर सरळ जाणारी वाट किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाला घेऊन जाते. सर्वप्रथम डावीकडील वाटेने बालेकिल्ल्याकडे जाताना तटाला लागुन असलेल्या एका चौथऱ्यावर चार टोकाला चार असे चार मोठे बांधीव दगडी स्तंभ दिसतात. याठिकाणी एखादी मोठी उंच इमारत असावी. बालेकिल्ल्यात जाणारी निमुळती वाट खंदकाला लागुनच असलेल्या तटबंदीखालून दुसऱ्या टोकाला असलेल्या बालेकिल्ल्याच्या दरवाजापर्यंत जाते. हि वाट तटावरून पुर्णपणे माऱ्याखाली ठेवलेली आहे. बालेकिल्ल्यात प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे काटकोनात बांधलेले असुन यातील एक दरवाजा व आतील देवड्या आजही शिल्लक आहेत. बालेकिल्ल्याची १५ फुट उंच तटबंदी दोन ठिकाणी ढासळलेली असुन या तटबंदीत जागोजाग बंदुका व तोफा यांचा मारा करण्यासाठी जंग्या ठेवल्या आहेत. बालेकिल्ल्यात समुद्राच्या दिशेने असलेल्या तटबंदीच्या मध्यभागी असलेल्या बुरुजावर ढालकाठीची म्हणजेच झेंडा रोवण्याची जागा आहे. बालेकिल्ल्याच्या आवारात मोठया प्रमाणात वास्तुंचे चौथरे असुन त्यात एक किल्ल्याच्या सदरेचा चौथरा असावा. बालेकिल्ला पाहुन परत फिरल्यावर दरवाजाकडे येऊन बाहेरील किल्ला पहाण्यास सुरवात करावी. दरवाजाकडून सरळ जाणाऱ्या पायवाटेने जाताना उजव्या बाजूस बाहेरून पाहिलेले दोन्ही बुरुज दिसतात. यातील पहिला बुरुज वरील बाजूने उध्वस्त झाला असुन त्यावर मोठमोठी झाडे वाढलेली आहे तर टोकाला असलेला दुसरा बुरुज सुस्थितीत असुन त्यावर बंदुकीच्या माऱ्यासाठी जंग्या दिसतात. या बुरुजाकडून खालील बाजूस सोनेरी वाळु असलेला भोगवे किनारा व कर्ली खाडीपर्यंतचा परिसर तसेच सागरात मच्छिमारी करणाऱ्या व पर्यटकांना समुद्रात फिरवणाऱ्या नौकाही दिसतात. तटबंदीहुन सरळ आल्यावर पुढे तटावर असलेल्या लहान बुरुजावर तोफ फिरवण्याची जागा दिसुन येते. इथुन तसेच पुढे आल्यावर किल्ल्याचा समुद्राच्या टोकावर असलेला बुरुज आहे. या बुरुजावर झेंडा रोवण्यासाठी नव्याने सिमेंट चौथरा बांधलेला आहे. या ठिकाणावरून गडाच्या पायथ्याला समुद्रात असलेले नारींगी रंगाचे खडक तसेच दूरवर अरबी समुद्रात असलेले वेंगुर्ल्याचे बर्न्ट रॉक्स दिपगृह दिसते. या तटाला लागुनच एक खड्डा व त्यात पायऱ्या पहायला मिळतात. पण हे टाके नसुन चिरे काढताना निर्माण झालेला खड्डा असावा. येथुन परत दरवाजाच्या दिशेने जाताना लहान लहान चौथरे व जोती पहायला मिळतात. किल्ल्याच्या या भागात मोठया प्रमाणात करवंदाची जाळी व इतर काटेरी झाडे वाढलेली आहेत. दरवाजाकडे आल्यावर आपली तासाभराची गडफेरी पुर्ण होते. गडावर कोठेही पाण्याची सोय दिसुन येत नाही व शिवकाळात पाण्याची सोय असल्याशिवाय गड वसवला जात नसे हे ध्यानात घेता हा गड नंतरच्या काळातच बांधला गेला असावा. किल्ल्याच्या बाहेरील बाजुस समुद्राकडे जाताना दोन खडकात खोदलेली पाण्याची टाकी आहेत. स्थानिक लोक या टाक्यांना शिवाजीची तळी म्हणुन ओळखतात. निवती किल्ल्यावरुन मालवण ते वेंगुर्ले पसरलेला समुद्र नजरेत येत असल्याने या समुद्रात संचार करणाऱ्या जहाजे सहजपणे नजरेस पडतात. त्यामुळे खोल समुद्रात टेहळणी करण्यासाठी निवती किल्ला महत्त्वाचा होता. फोंड सावंत दुसरा इ.स.१७०९मध्ये गादीवर आल्यावर १७०९-१७३८ दरम्यान काही किल्ले बांधल्याचा उल्लेख सावंतवाडी संस्थानाचा इतिहास या पुस्तकात येतो. यात कोचरे येथे सावंतानी निवती किल्ला बांधल्याचा उल्लेख येतो. इ.स.१७४८ मध्ये वाडीकर सावंतांकडे या किल्ल्याचा ताबा असल्याचा उल्लेख मिळतो. २ डिसेंबर १७४८ रोजी पोर्तुगीज व्हाईसरॉय मार्केझ कस्तेलू नोव्हू याने इस्लामखांनच्या नेतृत्वाखाली निवती किल्ला घेण्यासाठी आरमार पाठवले. इस्लामखांनने ४ डिसेंबर १७४८ रोजी निवती किल्ला घेतला व कर्ली येथे सावंत बांधत असलेल्या बोटी जाळून टाकल्या. २५ ऑक्टोबर १७५४ रोजी पोर्तुगीज व वाडीकर रामचंद्र सावंत यांच्यात झालेल्या तहानुसार सावंतावर काही अटी लादत निवती किल्ला परत करण्यात आला. इ.स.१७८७ च्या सुमारास सावंतवाडी संस्थानाचे स्वतंत्र राज्य बनविण्याच्या मोर्चेल प्रकरणावरून करवीरच्या छत्रपतींनी निवती, वेंगुर्ला, भरतगड ही सावंतवाडीकरांची ठाणी जिंकून घेतली. ती परत घेण्यासाठी सावंतांना १८०३ साल उजाडावे लागले. सन १८०५-०६ मधील सावंतवाडी संस्थानाच्या अंतर्गत गृहकलहात करवीरकरांच्या रांगणा येथील किल्लेदाराने पुन्हा निवती किल्ला ताब्यात घेतला. यावेळी सावंतांच्या मदतीस आलेल्या निपाणीकर निंबाळकर यांचा सरदार आपाजी सुबराव याने १८०८ मध्ये निवती किल्ला ताब्यात घेतला. सन १८१० मध्ये सावंतांचा सरदार चंद्रोबा सुभेदार याने पराक्रम करत निवती किल्ला ताब्यात घेतला व निपाणीकर यांना या भागातुन पिटाळून लावले. यानंतर बाबणो गोपाळ निवतीचा किल्लेदार झाला पण तो सावंतांचे हुकुम मानेनासा झाला. किल्ल्याच्या खर्चासाठी नेमलेल्या गावांखेरीज तो इंग्रजाच्या ताब्यात असलेल्या गावातुन वसूल जमा करू लागला. ४ फेब्रुवारी १८१९ मध्ये इंग्रज अधिकारी मेजर विलियम ग्रेथ कीर, कर्नल इम्लाक व कॅप्टन डनले यांनी किल्ल्यास वेढा घातला व निवती किल्ल्यावर तोफा डागण्यास सुरवात केली. किल्ला फार वेळ लढवणे शक्य नसल्याने किल्लेदाराने शरणागती पत्करली व आतील ३०० सैनिकांना शस्त्रासह बाहेर जाऊ देण्याचा अटीवर किल्ला इंग्रंजाच्या ताब्यात दिला. या लढाईत बांद्याचा किल्लेदार चंद्रोबा सुभेदार याने इंग्रजांना मदत केली. ---------------------सुरेश निंबाळकर