जिल्हा - नागपुर
श्रेणी  -  सोपी
दुर्गप्रकार- भुईकोट

उमरेड

नागपुरमधील उमरेड हे तालुक्याचे मुख्यालय असलेले एक महत्वाचे शहर आहे. पुर्वीपासून हे एक महत्वाचे नगर असल्याने या नगराभोवती तटबंदी बांधुन या नगराला सुरक्षित करण्यात आले होते. आज या नगरदुर्गाची केवळ एका बाजूची तटबंदी शिल्लक असुन हि तटबंदी उमरेडचा किल्ला म्हणुन ओळखली जाते. आज अस्तित्वात असलेली तटबंदी पहाता या नगरदुर्गाचा आवाका खुपच मोठा असावा कारण संपुर्ण उमरेड नगर या तटबंदीच्या आत सामावले होते. आज या किल्ल्याची केवळ एका बाजुची तटबंदी व या तटबंदीत असलेले ५ बुरुज पहाता येतात. उमरेड हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेले शहर नागपुर शहरापासुन ४३ कि.मी.अंतरावर आहे. तालुक्याचे शहर असल्याने या ठिकाणी जाण्यासाठी वाहनांची चांगली सोय आहे. नागपुरहून इटवारी मार्गाने उमरेड शहरात प्रवेश करताना रस्त्याच्या उजव्या बाजुस असलेल्या तलावाच्या काठावर किल्ल्याची शिल्लक असलेली तटबंदी व या तटबंदीत असलेले ५ बुरुज बाहेरील बाजूने पहाता येतात. हि तटबंदी व बुरुज बांधण्यासाठी विटांचा वापर केलेला असुन त्यात बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या ठेवलेल्या आहेत. तटबंदीच्या आतील बाजुने फिरताना पहिल्या बुरुजावर हजरत बाबा चांदशहा वाली या सुफी संताची कबर दिसुन येते. बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या असुन या बुरुजाच्या फांजीवरून दुसऱ्या बुरुजावर जाता येते. दुसऱ्या बुरुजाच्या पुढील भागात असलेली तटबंदी मोठया प्रमाणात ढासळलेली आहे. तटबंदीच्या पुढील भागात शाळा असुन तिसरा बुरुज या शाळेच्या आवारात असल्याने तेथे जाता येत नाही.शाळेच्या पुढील भागात नगरपालिकेची बाग असुन चौथा बुरुज या बागेत आहे. तटबंदीच्या पुढील भागात स्थानिकांची घरे असुन तेथे असलेल्या बुरुजावर जाता येते. किल्ल्याच्या तटबंदीची देखरेख होत नसल्याने काही ठिकाणी ती तुटण्यास सुरवात झाली आहे. या पाचव्या बुरुजाच्या आवारात एक जुने शिवमंदिर असुन मंदिराच्या बाहेर एक लहान पण खोल विहीर पहायला मिळते. या मंदिराचा सभामंडप नव्याने बांधलेला असुन मंदिराच्या आवारात एक हनुमान मुर्ती व काही समाधी शिळा पहायला मिळतात. इतरत्र असलेली किल्ल्याची तटबंदी व दरवाजे काळाच्या ओघात पुर्णपणे नष्ट झाली असल्याने किल्ल्याच्या आकाराचा व परिसराचा कोणताही अंदाज करता येत नाही. किल्ल्याचे बुरुज त्यावरील चर्या आणि जंग्या हे सर्व पाहण्यासारखे आहे. तटबंदीचा हा भाग व परीसर पहाण्यास ४५ मिनिटे पुरेशी होतात. किल्ल्यात असलेला तलाव हा किल्ल्याच्या आत असलेल्या वस्तीसाठी बांधलेला असल्याने इतर कोणती पाण्याची व्यवस्था दिसुन येत नाही. सोळाव्या शतकांत चांदा येथील गोंड राजा करणशहा यानें हा किल्ला बांधल्याचे मानले जाते. नंतरच्या काळात हा किल्ला नागपूरच्या भोसले घराण्याच्या ताब्यात आला व १८५० साली हा सर्व प्रांत इंग्रजांच्या स्वाधीन झाला. ------------------------सुरेश निंबाळकर