सह्याद्रीची मुख्य रांग ही दक्षिणोत्तर पसरलेली असुन सुमारे दोन हजार वर्षापूर्वीपासून सह्याद्रीच्या कडेकपारीत दळणवळणासाठी कोकणातून घाटावर जाणाऱ्या अनेक घाटवाटा आढळतात.यातील काही घाटवाटा आजही वापरात असुन काही घाटवाटा वापर बंद झाल्याने काळाच्या ओघात विस्मृतीत गेल्या आहेत. या घाटवाटांबरोबर त्यांच्या रक्षणासाठी असलेले दुर्गही विस्मृतीत गेले आहेत. कोकणातुन मावळ प्रांतात जाणारा एक घाट म्हणजे सवघाट. या घाटाचा पहारेकरी म्हणुन कोकणातील बाजुला मृगगड तर घाटावर पवना नदीच्या खोऱ्यात तुंग व मोरगीरी हे किल्ले बांधले गेले. मावळातुन या घाटात उतरणारी वाट आजही निसणीची वाट म्हणुन ओळखली जाते. ब्रिटीश काळात बांधलेल्या बोरघाटामुळे या घाटाचा वापर पुर्णपणे थांबला व या घाटाचा पहारेकरी असलेला मृगगड देखील विस्मरणात गेला.किल्ल्याखाली असलेल्या भेलीव गावामुळे या किल्ल्याला भेलीवचा किल्ला अशी नवी ओळख मिळाली. पुणे-मुंबई वरून एका दिवसात सहज भेट देता येईल असा हा किल्ला रायगड जिल्हयातील सुधागड तालुक्यात आहे. भेलीव हे मृगगडच्या पायथ्याशी असलेले गाव मुंबईहुन १०० कि.मी.वर तर पुण्याहुन ११० कि.मी. अंतरावर आहे. खोपोली-पाली रस्त्यावरील परळी गावानंतर अंबा नदीवरील पुल ओलांडल्यावर डावीकडील कमानीतुन आत शिरणारा रस्ता जांभूळपाडा गावात जातो. गावात शिरल्यावर रेस्ट इन फोरेस्ट या हॉटेलकडून डावीकडील रस्ता १२ कि.मी.वर सह्याद्रीच्या पुर्व पायथ्याशी असलेल्या भेलीव गावात जातो तर उजवीकडील रस्ता कळंब या अनघाई किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात जातो. भेलीव गावाच्या अलीकडे अंबा नदीवरील पुल पार केल्यावर पूर्वेकडे पसरलेली सहयाद्रीची रांग व त्यापासुन सुटावलेले चार-पाच सुळके नजरेस पडतात. यातील दूरवरचा मोठा सुळका म्हणजे मोराडीचा सुळका असुन गावामागे असलेल्या पाच सुळक्यापैकी सुरवातीचे दोन सुळके वगळता पुढील तीन सुळक्यावर मृगगड वसला आहे. दुर्गवीर प्रतिष्ठान मृगगडावर श्रमदान मोहिमा राबवत असल्याने किल्ल्यावरील अवशेष सुस्थितीत असुन त्यांनी किल्ल्यावर जाणारी संपुर्ण वाट बाणाने दर्शविली आहे. गावातील शाळेसमोर एक मंदिर असुन या मंदिराच्या वरील बाजुने किल्ल्यावर जाणारी वाट आहे. किल्ल्यावर पाण्याची सोय नसल्याने गावातुन पुरेसे पाणी घेऊनच किल्ला चढण्यास सुरवात करावी. सुरवातीची व शेवटची काही वाट वगळता उर्वरित वाट घनदाट जंगलातुन जात असल्याने गड चढण्याचा थकवा जाणवत नाही. किल्ल्याखाली असलेल्या शेवटच्या दोन सुळक्यातील पुर्वेकडील घळीतुन किल्ल्यावर जाणारी वाट आहे. गावातुन किल्ला चढायला सुरवात केल्यावर साधारण अर्ध्या तासात आपण या घळीखाली येतो. घळीच्या उजव्या बाजुला असलेल्या डोंगरात ३ x ३ फुट आकाराचे लहान चौकोनी तोंड असलेली गुहा पहायला मिळते. हि गुहा साधारण ३० फुट आत असुन गुहेच्या आत दोन वळणे आहेत. गुहेच्या आतील टोकाला १०x१२ फुट आकाराची मोठी गुहा आहे. गुहा पाहुन घळीतील वाटेने किल्ल्याकडे निघावे. घळीत असलेली वाट नष्ट झाल्याने सोपे प्रस्तरारोहण करून पुढे डावीकडे कातळात खोदलेल्या पाय-यांवरून आपण किल्ल्याच्या शिखराखाली असलेल्या लहान पठारावर पोहोचतो. पठाराच्या उजव्या बाजुस लहान उंचवटा असुन या उंचवट्यावर चौकीचे अवशेष पहायला मिळतात. दुर्गवीर प्रतिष्ठानने या ठिकाणी किल्ल्याचा नकाशा लावला असल्याने किल्ला पहाणे सोपे झाले आहे. पठाराच्या डाव्या बाजुस डोंगरात किल्ल्यावर जाण्यासाठी खडकात पायऱ्या खोदल्या असुन याच कातळात उजव्या बाजुला कोरलेल्या लहान लहान पायऱ्या आपल्याला कातळात खोदलेल्या गुहा टाक्याकडे घेऊन जातात. आज हे टाके कोरडे पडलेले असुन या गुहेबाहेर असलेल्या कट्ट्यावर रांजण ठेवण्यासाठी चुन्याचे गोलाकार कठडे बांधले आहेत. ही वाट अतिशय लहान असल्याने पावसाळयात या वाटेवरून गुहा पहाण्याचा धोका पत्करू नये. टाके पाहुन मागे फिरल्यावर कातळात खोदलेल्या पाय-यांवरून दहा मिनिटांत आपला किल्ल्यावर प्रवेश होतो. पायऱ्यावर उजवीकडे कातळात कोरलेली गणेशमुर्ती पहायला मिळते. या ठिकाणी दरीच्या काठावर किल्ल्याचा पुर्वाभिमुख दरवाजा असल्याच्या खुणा दिसुन येतात तसेच किल्ल्याची रचीव दगडांनी बांधलेली तटबंदी पहायला मिळते. किल्ल्यावर प्रवेश केल्यावर समोर उजवीकडे व्यवस्थीत रचुन ठेवलेली महिषासुरमर्दिनीची मुर्ती व भग्न झालेले शिवलिंग तसेच एक मोठा दगडी दिवा पहायला मिळतो. या मुर्तीसमोर एका वास्तुचा चौथरा पहायला मिळतो. या शिखरावर डावीकडे पाण्याची तीन कोरडी पडलेली टाकी असून यातील एका टाक्यात दगडी भिंत बांधुन त्याचे दोन भाग करण्यात आले आहेत तर दुसऱ्या टाक्यात उतरण्यासाठी काही पायऱ्या कोरल्या आहेत. टाकी पाहुन पुढील शिखराकडे जाताना वाटेच्या डाव्या बाजुस वाड्याचे जोते पहायला मिळते. या शिखरावर काही प्रमाणात झाडी असुन अजुन काही वास्तु अवशेष दिसतात पण त्यांची ओळख पटत नाही. जोत्याच्या उजवीकडे असलेला उतार उतरून गेल्यावर कातळात खोदलेलं पण कोरडे असलेले खांबटाकं पहायला मिळते. या शिखरावरून लहान उतार पार करून आपण किल्ल्याच्या पश्चिमेकडील शेवटच्या शिखरावर पोहोचतो. या शिखरावर कोरडी पडलेली दोन मोठी आयताकृती टाकी असुन या शिखरावर खडकातुन चिरे वेगळे करण्यासाठी मोठया प्रमाणात केलेले खळगे पहायला मिळतात. या भागात ध्वजस्तंभ असुन खडकावर काही प्रमाणात सपाटी पहायला मिळते. येथुन कुरवंड घाट,उंबरखिंड परिसर तसेच पुर्वेला असलेला सरसगड सहजपणे नजरेस पडतो. किल्ल्याचे स्थान,त्याचा आकार व त्यावरील अवशेष पहाता या किल्ल्याचा वापर टेहळणीसाठी होत असावा. मृगगडाचा माथा लहान असल्याने आपली गडफेरी पूर्ण करण्यासाठी एक तास पुरेसा होतो. भेलीव गावातुन निघाल्यापासून तीन तासांत संपूर्ण किल्ला पाहुन आपण गावात परत येतो. या किल्ल्याच्या परिसरात शिवाजी महाराजांची कारतलब खानाबरोबर घडलेली उंबरखिंड लढाई इतिहासप्रसिद्ध असली तरी मृगगड किल्ल्याचा उल्लेख मात्र या लढाईत येत नाही.-----------सुरेश निंबाळकर

जिल्हा - रायगड

श्रेणी  -  मध्यम

दुर्गप्रकार- गिरीदुर्ग

मृगगड