मुंबई-ठाण्याहून एक दिवसाच्या भटकंतीसाठी प्रसिद्ध व जवळचा तालुका म्हणजे ठाणे जिल्ह्यातील शहापुर तालुका. येथे असलेले माहुली, भंडारदुर्ग, सांधणदरी,करोलीघाट, बाणसुळका, आजोबागड या ठिकाणामुळे काही काळ सोडला तर भटक्यांची येथे सतत वर्दळ असते. यातील माहुली-भंडारदुर्ग वगळता इतर सर्व ठिकाणी जाण्यासाठी देहणे हे या ठिकाणाच्या पायथ्याचे गाव गाठावे लागते. आजोबागड उर्फ अजापर्वत येथे जाण्यासाठी मुंबई-ठाणे-आसनगाव-शहापुर-डोळखांब-साकुर्ली-देहणे असा एक मार्ग असुन मुंबई-ठाणे-कल्याण-मुरबाड-माळशेज-डोळखांब-साकुर्ली-देहणे असा दुसरा मार्ग आहे. यातील पहिल्या मार्गाने हे अंतर ११४ कि.मी असुन दुसऱ्या मार्गाने हे अंतर १२५ कि.मी.आहे. देहणे गावातुन केवळ आजोबा डोंगराची माची व त्यावरील खिंडीपर्यंतच जाता येत असल्याने गडाचा माथा पहायचा असल्यास कसारा-घोटी-राजूरमार्गे भंडारदरा धरणाच्या बाजूने शिरपुंज्याचा भैरवगडाजवळ असणाऱ्या कुमशेत गावातून वाट आहे. हे अंतर २१० कि.मी.आहे. आजोबागडाचा डोंगर पुर्वपश्चिम पसरलेला असुन दुरवर दिसणारा परीसर वगळता माथ्यावर गड म्हणावा असे काहीही अवशेष आढळत नाहीत. मुळात हा गड आहे का याबाबत देखील एक प्रश्नच आहे. कारण खडकात खोदलेली टाकी वगळता यावर गडाचे अस्तीत्व दर्शविणारे तटबंदी बुरुज यासारख्या कोणत्याही खुणा आढळत नाहीत शिवाय इतिहासात कोठेही या किल्ल्याचा उल्लेख आढळत नाही. गडाच्या आजोबा या नावाची उत्पत्ती सांगताना त्याचा संबंध थेट रामायण काळाशी जोडला जातो.या गडावर वाल्मिकी ऋषींनी रामायण हा ग्रंथ लिहिला तसेच सीतामाईने लव-कुश यांना येथेच जन्म दिला. लव-कुश वाल्मिकी ऋषींना आजोबा म्हणुन संबोधीत असल्याने या गडाचे नाव आजोबागड पडले अशी कथा स्थानिकांकडून सांगितली जाते. देहेणे गावातुन आजोबा गडाखाली असलेल्या पठारावर जाण्यासाठी पक्का रस्ता असुन खाजगी गाडी असल्यास आपण गडाच्या पायथ्यापर्यंत म्हणजेच माचीवरील वाल्मिकी आश्रमाकडे जाण्याचा कच्चा रस्ता चालू होतो तिथपर्यंत पोहचतो अन्यथा हे ४ कि.मी.अंतर आपल्याला पायी पार करावे लागते. या कच्चा रस्त्याने साधारण १ तासात आपण वाल्मिकी आश्रमाजवळ पोहचतो. आश्रम परिसरातील जंगलात प्रवेश करण्यापुर्वी वाटेच्या डाव्या बाजुला एक लहान पाणवठा पहायला मिळतो. आश्रम परिसरात घनदाट जंगल असुन येथील झाडांना नव्याने दगडी पार बांधलेले आहेत. येथे साध्या बांधणीतील समाधी मंदीर असुन त्यातील समाधी वाल्मिकी ऋषींची समाधी म्हणुन ओळखली जाते. या मंदिरासमोर चार विरगळ असुन एक विरगळ चार बाजुंनी कोरलेली असुन उर्वरीत विरगळ एका बाजूने कोरलेल्या आहे. यातील एक विरगळ म्हणजे धेनुगळ आहे.या विरगळ शेजारी वेगवेगळे आकार तसेच पादुका कोरलेले समाधीचे दहा दगड पहायला मिळतात. पायऱ्यां शेजारी देवीचा तांदळा स्थापन केलेली एक लहान घुमटी आहे. समाधी मंदिराच्या डाव्या बाजुला गडावरील जुना आश्रम असुन उजव्या बाजूला दोन लहान मंदिरे आहेत. यातील खोल गाभाऱ्यात शंकराची पिंड असलेले मंदीर म्हणजे पुर्वीचे पाण्याचे टाके असावे. या टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. दुसरे मंदीर अलीकडील काळातील असुन त्यात काही मुर्तींची स्थापना केलेली आहे. आश्रम परिसरात येणाऱ्या भक्तांसाठी लाकडी पोटमाळा असलेली धर्मशाळा बांधलेली असुन घाणीमुळे तिची सध्याची अवस्था भयानक आहे. येथे मुक्काम करायचा असल्यास समाधी मंदिराशेजारी असलेल्या आश्रमात २० जण सहजपणे राहु शकतात. आश्रमाच्या रम्य,शांत व पवित्र परिसराची येथे येणाऱ्या पर्यटकांनी कचराकुंडी बनवली आहे. समाधी मंदिरा समोरून एक पायऱ्यांची वाट खाली पाण्याच्या कुंडाजवळ जाते. या कुंडात बारमाही वाहणारा झरा असुन या कुंडातील पाणी पिण्यासाठी वापरले जाते. या झऱ्यातुन वाहुन जाणारे जास्तीचे पाणी पुढे उतारावर दुसऱ्या टाक्यात अडवले आहे. येथुन पाणी भरून घेऊन पुन्हा समाधी मंदिराकडे यावे. समाधी मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या आश्रमामागुन एक वाट गडाच्या पुढील भागात म्हणजे सीतामाईच्या पाळण्याकडे जाते. दगडधोंड्यांनी भरलेली हि वाट म्हणजे डोंगरावरून येणारा पाण्याचा मार्ग असुन या वाटेने उभा चढ चढत एक-दीड तासात आपण सीतामाई पाळण्यापर्यंत म्हणजेच गडाच्या सुळक्याखाली असलेल्या दोन डोंगरामधील खिंडीत पोहोचतो. वाटेत ठिकठिकाणी दगडावर दिशादर्शक बाण रंगविले असल्याने चुकण्याची शक्यता नाही. खिंडीत आल्यावर दरीतुन वर येणारा वारा आपला संपुर्ण थकवा दुर करतो. खिंडीच्या उजव्या बाजुला असलेल्या सुळक्याच्या पोटात २५-३० जण बसु शकतील अशा आकाराची नैसर्गिक गुहा असुन या गुहेत जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. या गुहेत एका खांबाला दोन लहान लाकडी पाळणे बांधलेले आहेत. सुरक्षेसाठी या गुहेला, पायऱ्याना व सुळक्याच्या वाटेवर लोखंडी कठडे उभारले आहेत. गुहेसमोरील वाटेवर खडकात खोदलेले आयताकृती पाण्याचे टाके असुन सध्या हे टाके कोरडे पडलेले आहे. ह्या टाक्याकडून पुढे जाणारी वाट सुळक्याला वळसा घालत गुहेच्या मागील बाजुस जाते. जेथे वाट संपते तेथुन सुळक्यावर जाणारी वाट आहे. ही वाट सुळक्याच्या माथ्यावर जाण्यासाठी असुन गिर्यारोहणाचे साहित्य व तंत्र अवगत असल्याशिवाय या वाटेने वर जाणे धोकादायक आहे. पाळणा असलेल्या गुहेसमोरील डोंगरात एक लहान गुहा असुन या गुहेत पाण्याची दोन लहान टाकी आहेत. हि गुहा मानवनिर्मीत असुन या गुहेत जाण्यासाठी लोखंडी शिडी लावलेली आहे. पाळणा असलेल्या सुळक्याखालुन आपल्याला खाली देहेणे गाव तर समोर उजवीकडे सांदण दरी,करोली घाट व रतनगड नजरेस पडतो. आल्या वाटेने मागे फिरून आश्रमाजवळ आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण गड फिरण्यास चार तास पुरेसे होतात. मुळात हा किल्ला नसुन करोली घाटावर नजर ठेवण्यासाठी निर्माण केलेले टेहळणीचे जुजबी ठाणे असावे. सद्यस्थितीत गडाचा कोणताही इतिहास उपलब्ध नाही. ------------------सुरेश निंबाळकर

आजोबागड

जिल्हा - ठाणे

श्रेणी  -  मध्यम

दुर्गप्रकार- गिरीदुर्ग