जिल्हा - सांगली 

श्रेणी  -  सोपी 

दुर्गप्रकार- भुईकोट

महाराष्ट्रातील काही किल्ले आज निसर्गाच्या अवकृपेचे तर काही किल्ले स्थानिकांच्या उपेक्षेचे धनी ठरत आहे. इतिहासातील आपली ओळख हरवुन बसलेला व स्थानिकांच्या उपेक्षेचा बळी ठरलेला असाच एक किल्ला म्हणजे बागणी भुईकोट. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात बागणी गावात असलेला हा भुईकोट आजही पाहण्यासारखा असुन त्याचे अस्तीत्व अजुन किती काळ टिकेल ते मात्र सांगता येत नाही. बागणी भुईकोट सांगली पासुन २८ कि.मी. तर कोल्हापुर पासुन ४२ कि.मी. अंतरावर आहे. बागणी गावात शिरण्यापुर्वी या गावाभोवती असलेली रचीव दगडांची तटबंदी व त्यातील बुरुज आपले लक्ष वेधुन घेतात. साधारण चौकोनी आकाराचा हा किल्ला दहा एकरवर पसरलेला असुन किल्ल्याच्या तटबंदीत आजही ५ बुरुज ढासळलेल्या अवस्थेत पहायला मिळतात. कोटाच्या तीन बाजुस असलेली तटबंदी व त्याशेजारील खंदक आजही शिल्लक असुन आतील वाढत्या वस्तीमुळे कोटाची चौथ्या बाजुस म्हणजेच पूर्वेस असलेली तटबंदी व खंदक पुर्णपणे नष्ट झाला आहे. कोटाचा मुख्य दरवाजा देखील बहुदा याच भागात असावा पण तो नष्ट झाल्याने या दिशेला प्रवेशद्वाराची नव्याने सिमेंटमधील कमान उभारली आहे. या कमानी समोर नव्याने बांधलेले राम व हनुमानाचे मंदीर असुन या मंदिरात एक जुने नागशिल्प व विरगळ पहायला मिळते. कोटाच्या आतच गाव वसल्याने आतील अवशेष पुर्णपणे नष्ट झाले असुन महादेव मंदीर व एक कमान विहीर अशा दोन जुन्या वास्तु पहायला मिळतात. महादेव मंदिराकडे जाताना वाटेत एक गजलक्ष्मी शिल्प नजरेस पडते. महादेव मंदिराचे आतील सभागृहाचे बांधकाम कोरीव दगडी खांब व घडीव दगडात केलेले असुन या बांधकामात दगडात कोरलेले एक सप्तमातृका शिल्प पहायला मिळते. मंदीराची आतील मुळ वास्तु कायम ठेवुन बाहेरील बाजुने मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. किल्ल्याच्या मध्यभागी असलेली कमानीची विहीर सध्या एका घराच्या आवारात बंदीस्त झाली असुन विहिरीच्या आतील भागात मोठया प्रमाणात झाडी वाढली आहे. हि विहीर बामणाची विहीर म्हणुन ओळखली जाते. किल्ल्याची तटबंदी व बुरुजाचे बांधकाम मातीत केले असुन काही ठिकाणी तटबंदीवरून फेरी मारताना बाहेरील बाजुस असलेला खंदक पहाता येतो. गावातील लोकांनी स्वतःची घरे बांधण्याकरिता आतील बाजुने बुरुज-तटबंदीची माती व दगडविटा काढून पुर्ण किल्ला पोखरून काढला आहे. बाहेरील बाजूने किल्ल्यास फेरी मारताना मात्र ही तटबंदी एकसंध असल्याचे पहायला मिळते. किल्ल्याच्या वस्ती नसलेल्या भागात मोठया प्रमाणात झाडी वाढली असुन या भागात साचपाण्याचा एक तलाव दिसुन येतो. संपुर्ण कोट पहाण्यासाठी एक तास पुरेसा होतो. या किल्ल्याविषयी ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये विशेष माहिती उपलब्ध होत नाही. हा किल्ला बहुदा १७व्या शतकात बांधला गेला असावा. -------------सुरेश निंबाळकर

बागणी