गोकाक

बेळगाव जिल्ह्यातील मिनी नायगारा म्हणून ओळखल्या धबधब्यामुळे गोकाक शहर संपुर्ण भारतात प्रसिद्ध आहे. कधीकाळी स्वराज्यात असणारा हा मराठी प्रांत भाषावार प्रांतरचना करताना मात्र कर्नाटक राज्याला जोडला गेला. तालुक्याचे मुख्यालय असलेले हे शहर बेळगाव जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. आपल्याला मात्र या शहराची ओळख होते ते या शहरामागे उभ्या असलेल्या गिरीदुर्गामुळे. घटप्रभा आणि मार्कंडेय या दोन नद्यांच्या संगमावर असलेला हा किल्ला बेळगावपासुन ६४ कि.मी. अंतरावर तर संकेश्वरहुन ४५ कि.मी. अंतरावर आहे. गोकाक शहरात प्रवेश करण्यापुर्वीच दुरवरूनच शहराच्या पश्चिमेला असलेला किल्ल्याचा डोंगर दिसण्यास सुरवात होते. गोकाक बस स्थानकामागील गल्लीतुन गडावर जाण्यासाठी सर्वात जवळची पायवाट आहे. वाढत्या शहरीकरणामुळे किल्ल्याच्या आसपास असलेली झोपडपट्टी थेट किल्ल्याच्या डोंगराला भिडली असुन या झोपडपट्टीतुन मार्ग काढतच किल्ल्यावर जावे लागते. या वाटेवर काही ठिकाणी पायऱ्या बांधलेल्या आहेत. येथुन वर डोंगराकडे पाहिले असता माथ्यावर असलेली गडाची तटबंदी दिसुन येते. पायऱ्यांच्या वाटेने अर्ध्या तासात आपण गडाच्या पहिल्या दरवाजात पोहोचतो. गडाचा पहिला दरवाजा दोन नैसर्गिक दगडांच्या मध्ये बांधला असुन वरील बाजुस तटबंदीने बंदीस्त केला आहे. गडाची संपुर्ण तटबंदी केवळ दगड रचुन बांधलेली आहे. या दरवाजातून काही पायऱ्या चढुन गेल्यावर डाव्या बाजुस कपारीत एक थडगे बांधलेले आहे. यापुढील गडाचा संपुर्ण भाग तटबंदीने बंदीस्त केलेला आहे. यापुढे थोडीशी सपाटी असुन गडाच्या माथ्यावर असलेल्या दुसऱ्या दरवाजाकडे जाण्यासाठी रुंद पायऱ्या बांधल्या आहेत. दरवाजाबाहेर कातळात कोरलेले लहानशी गुहा असुन येथुन घटप्रभा व मार्कंडेय नदी व संगमाचे सुंदर दर्शन होते. पायऱ्या चढुन दोन बुरुजांमध्ये बांधलेल्या गोमुखी दरवाजाने आपण गडावर प्रवेश करतो. दरवाजाच्या आतील काही पायऱ्या चढुन गेल्यावर उजवीकडे पडक्या भिंतीच्या वास्तुत एक थडगे असुन डावीकडे चौथऱ्यावर मल्लिकार्जुन मंदिर आहे. मंदिराच्या आवारात भलेमोठे वडाचे झाड आहे. या झाडाकडून पुढे गेल्यावर आपण गडाच्या माथ्यावर पोहोचतो. येथे दगडात बांधलेले पाण्याचे टाके असुन दरी काठावर दुरपर्यंत बांधलेली गडाची तटबंदी नजरेस पडते. येथे गडाची समुद्रसपाटीपासून उंची २३७० फुट असुन किल्ल्याचा पुर्वपश्चिम माथा साधारण १२ एकरवर पसरलेला आहे. गडमाथ्यावर २-४ उध्वस्त चौथरे वगळता इतर कोणतेही अवशेष दिसुन येत नाही. संपुर्ण तटबंदी रचीव दगडांची बांधली असुन यात बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या ठेवलेल्या आहेत. संपुर्ण गड फिरण्यास पाउण तास लागत असला तरी तटबंदी वगळता फारसे अवशेष नजरेस पडत नाहीत. सन ८५० ते १२५० दरम्यान हा प्रांत रट्ट साम्राज्याचा भाग होता. त्यानंतर बहमनी, आदिलशाही, मराठे ,टिपु सुलतान व शेवटी इंग्रज अशी स्थित्यंतरे या भागाने पाहिली. गोकाकाचा किल्ला विजापुरच्या कारकिर्दीत बांधला गेला. शिवकाळात हा परिसर मराठयांच्या ताब्यात आला. संभाजी महाराजांच्या काळात १६८५ दरम्यान औरंगजेबपुत्र शाहआलम याने गोकाक- धारवाड मार्गाने दक्षिणेवर हल्ला केला पण संभाजी महाराजांच्या सैन्याने सतत छापे घालुन त्यांना हैराण केल्याने मागे फिरावे लागले. नंतरच्या काळात हा परिसर सावनुरच्या नवाबाच्या ताब्यात होता. येथुन उठवलेली मराठयांची ठाणी पुन्हा काबीज करण्यासाठी ५ डिसेंबर १७४६ ला महादजीपंत पुरंदरेसोबत सदाशिवरावभाऊ कर्नाटक मोहिमेवर रवाना झाले. तुंगभद्रेपर्यंत जाऊन त्यांनी सावनुरकर नवाब, देसाई व बंडखोरांना जरब बसविली. सावनूरच्या नवाबाकडून पाच्छापूर, बदामी, नवलगुंद, उंबल, गिरी, तोरगळ, कित्तूर, परसगड, गोकाक, यादवाड, बागलकोट, हल्ल्याळ, हरिहर, बसवपट्टण इत्यादी २२ परगणे मराठयांच्या ताब्यात आले. इ.स.१७७८ सालीं कित्तुरकर देसायांनी गोकाक परगणा ताब्यांत घेतला परंतु इ.स. १७७९ सालीं परशुरामभाऊंनीं गोकाक सर केलें व देसायांस कैद केले. नंतरच्या काळात हा प्रांत पटवर्धन व करवीरकर छत्रपती व टिपुच्या ताब्यात काही काळ असल्याचे दिसुन येते.----------सुरेश निंबाळकर

जिल्हा - बेळगाव

श्रेणी  -  मध्यम

दुर्गप्रकार- गिरीदुर्ग