महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्याला खुप मोठया प्रमाणात दुर्गवैभव लाभले आहे. मुंबई-आग्रा महामार्गाने जाताना नाशिक शहराच्या आसपास आपल्याला अनेक किल्ले दिसुन येतात. यातील एक किल्ला म्हणजे किल्ले गडगडा उर्फ घरगड. नाशिकपासुन केवळ २३ कि.मी. अंतरावर असलेल्या या किल्ल्याचा पायरीमार्ग इंग्रजांनी नष्ट केल्याने किल्ल्यावर जाण्याचा मार्ग दुष्कर झाला आहे. त्यामुळे हा किल्ला अत्यंत कठीण श्रेणीत गणला जातो. किल्ल्यावर जाण्यासाठी गिर्यारोहणाचे साहित्य व तंत्र अवगत असणे गरजेचे असल्याने दुर्गभटक्यांची पावले सहजपणे या किल्ल्याकडे वळत नाही. WILD TROOP चे सुदेश नांगरे, दिनेश नांगरे व सिद्धेश गोताड या गिर्यारोहकांच्या मदतीने आमची या किल्ल्यावरची चढाई पार पडली. गडगडा किल्ल्यावर जाण्यासाठी गडगडा-सांगवी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव गाठावे लागते. मुंबई- कसारा मार्गे घोटी फाटा पार केल्यावर साधारण १७ कि.मी.अंतरावर वाडीव्हरे गावात जाण्यासाठी फाटा आहे. या फाट्यापासून वाडीव्हरे गाव २ कि.मी. अंतरावर असुन त्यापुढे गडगडा-सांगवी गाव ४ कि.मी. अंतरावर आहे. यस.टी बसची सोय केवळ वाडीव्हरे गावापर्यंत असल्याने पुढील ४ कि.मी. अंतर आपल्याला पायी पार करावे लागते. सोबत खाजगी वाहन असल्यास आपण थेट किल्ल्याच्या पायथ्याशी जाऊ शकतो. गावात प्रवेश करताना गावामागे असलेली तीन शिखरे आपले लक्ष वेधुन घेतात. यातील डावीकडील शिखर अघोरी तर उजवीकडील शिखर अंबोली नावाने ओळखले जाते. या दोन शिखरामध्ये असलेला डोंगर म्हणजे गडगडा किल्ला. किल्ल्याच्या कातळकड्याखालील गुहेत भवानी देवीचे मंदीर असुन तेथे फासलेल्या चुन्यामुळे हे मंदीर लांबुनही उठुन दिसते. या मंदिराकडूनच काही अंतरावर किल्ल्यावर जाण्याचा मार्ग आहे. किल्ल्याखालील माचीवर एक आश्रम व हनुमानाचे मंदीर असुन या मंदिरापर्यंत जाण्यासाठी गावातुन कच्चा रस्ता आहे. या रस्त्याने जाताना वाटेच्या उजव्या बाजुला काही नव्याने बसवलेल्या विरगळ पहायला मिळतात. या वाटेने अर्ध्या तासात आपण माचीवरील हनुमान मंदिरात पोहोचतो. मंदिराच्या थोडे अलीकडे वाटेच्या डावीकडे डोंगर उतारावर एक लहान तळे पहायला मिळते. मंदिराकडे पायऱ्याची विहीर असल्याचे अनेक ठिकाणी आपल्या वाचनात येते पण आता ती विहीर इतिहासजमा झाली असुन गावकऱ्यांनी मंदीर व आश्रम परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी विहिरीच्या जागी हे तळे निर्माण केले आहे. तळ्यासमोर काही अंतरावर उघडयावर शिवलिंग व नंदी असुन समोरील बाजुस एका कट्ट्यावर हनुमान व शनीदेवाची मुर्ती आहे. तळ्याकडून किल्ल्याकडे म्हणजेच कड्याखालील मंदीराकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. यातील पहिला मार्ग हनुमान मंदीराकडून गडावर जातो. या वाटेने आपण मंदिराच्या कड्याखाली असलेल्या कातळात कोरलेल्या पायऱ्यापर्यंत जातो. पायऱ्यांच्या सुरवातीस गणपतीचे एक लहान मंदीर असुन पुढे उभ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आपल्याला थेट गडावरील देवीच्या मंदीरापर्यंत नेतात. गडावर जाण्याचा दुसरा मार्ग तळ्याकडुन सरळ चढाई करत अघोरी डोंगर व गडगडा किल्ल्याला जोडणाऱ्या किल्ल्याच्या डोंगरसोंडेकडे येतो. या सोंडेच्या टोकाशी असलेला कातळ एका लहानशा भेगेने सोंडेपासुन वेगळा झाला आहे. या कातळाला वळसा घालुन मागील बाजुस आल्यावर गावकऱ्यांनी या भेगेत एकावर एक दगड रचुन ५-६ पायऱ्या केल्या आहेत. या पायऱ्यांनी वर चढुन आपण किल्ल्याच्या सोंडेवर पोहोचतो. या सोंडेवर कड्यापर्यंत जाण्यासाठी काही ठिकाणी पायऱ्या बांधलेल्या आहेत. किल्ल्यावर जाण्याचा हा मुळ मार्ग पण सध्या किल्ल्यावर व मंदिराकडे जाण्यासाठी हनुमान मंदिराकडील पायरीमार्गाचा वापर होत असल्याने या पायऱ्यांवर मोठया प्रमाणात माती साठली आहे. या वाटेने वर कडयाच्या टोकाला जाऊन उजव्या बाजूने (कडा डावीकडे ठेवत) कडयाला बिलगुन जाणाऱ्या पायवाटेने आपण देवीच्या मंदिराकडे पोहोचतो. हनुमान मंदिराकडून येणारी कोरलेल्या पायऱ्याची वाट या ठिकाणी मुळ वाटेला येउन मिळते. तळ्यापासून दोन्ही वाटांनी इथवर येण्यास अर्धा तास पुरेसा होतो. येथुन कातळात कोरलेल्या १५-२० पायऱ्या चढुन आपण देवीच्या मंदिरात पोहोचतो. हे मंदीर एका लहानशा गुहेत असुन त्यात दोन देवींच्या व वाघांच्या मुर्ती स्थापन करण्यात आल्या आहेत. येथुनच गडावर जाण्याचा मुळ पायरीमार्ग होता व हे मंदीर पहारेकऱ्याच्या देवडीत स्थापन करण्यात आले असावे. या मंदीराच्या वरील बाजुस पायऱ्या तोडण्यासाठी खोदलेल्या सुरुंगाच्या खुणा व काही तुटलेल्या पायऱ्या तसेच कडयाच्या टोकावर असलेला किल्ल्याचा दरवाजा दिसुन येतो. येथुन किल्ल्यावर जाता येत नसले तरी उतरताना गिर्यारोहण तंत्राचा वापर करत दोर लावुन येथे उतरता येते. किल्ल्यावर जाणारी नवीन वाट अंबोली पर्वत व गडगडा किल्ला यामधील खिंडीतुन गडगडा किल्ल्याच्या कातळकड्याला चिटकुन वर जाते. गडमाथ्यावर जाण्यासाठी मंदिराच्या पायऱ्या उतरुन पुढे कातळ कड्याखालील वाटेने वर कडयाच्या दिशेने थोडे चालत गेल्यावर आपण गडगडा किल्ल्याच्या कातळाला भिडतो. या ठिकाणी कातळात वाढलेले एक मध्यम आकाराचे झाड आहे. किल्ल्यावर जाण्याची हि खुण लक्षात ठेवुन येथुनच किल्ला चढण्यास सुरवात करावी. या झाडाला धरून वर चढल्यावर पुढील टप्पा मात्र आपल्याला गिर्यारोहण तंत्राचा वापर करत चढावा लागतो.गिर्यारोहणाची तयारी होईपर्यंत आपण या भागात असलेले इतर अवशेष पाहुन घ्यावेत. आपण असलेल्या कड्याकडून एक पायवाट गडगडा किल्ला व अंबोली पर्वत यामधील खिंडीत उतरते. खिंडीत उतरुन समोरील टेकडीवर चढले असता तेथे कातळात कोरलेले एक शिवलिंग व त्यासमोर दगडात कोरलेला नंदी पहायला मिळतो. शिवलिंग पाहुन परत खिंडीत उतरुन डाव्या बाजुच्या पायवाटेने अंबोली पर्वताला वळसा घालत गेल्यावर ५ मिनिटात आपण कातळात कोरलेल्या ३ x ३ आकाराचे तोंड असलेल्या गुहेजवळ पोहोचतो. घसाऱ्याच्या या वाटेने जाताना खूप सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे तसेच या वाटेवर एका ठिकाणी आपल्याला कातळाला बिलगुन जावे लागते. सरळ रेषेत खोदलेल्या या गुहेत रांगत गेल्यावर साधारण २५ फुट अंतरावर या गुहेला Y आकारात दोन फाटे आहेत. यातील उजवीकडील बाजुस १० फुट अंतरावर भुयाराच्या खालील पातळीत कातळात कोरलेली लहान खोली आहे तर डावीकडे १० फुट अंतरावर भुयाराच्या खालील पातळीत पुन्हा एक लहान दरवाजा असुन त्याच्या आतील बाजुस ८ x ८ आकाराची एक खोली आहे. या गुहेत मोठया प्रमाणात धुळ साठलेली आहे. हे सर्व पाहुन गडगडा किल्ल्याच्या कातळटप्प्याकडे परत येईपर्यंत आपली किल्ला चढण्याची तांत्रीक तयारी पुर्ण झालेली असते. झाडाला पकडून वर आल्यावर आपण निमुळत्या जागेत येतो. येथुन दोरीच्या सहाय्याने साधारण १५-२० फुटाचा अवघड कातळटप्पा चढावा लागतो. पण आमच्या WILD TROOP च्या सहकाऱ्यांनी हा टप्पा आमच्याकडुन सहजपणे पार करवुन घेतला. या टप्प्यातून वर येऊन उजवीकडे थोडे आडवे गेल्यावर दुसरा अंदाजे २० ते २५ वीस फुट उंचीचा कातळटप्पा लागतो. या टप्प्यावर पकडीसाठी खोबणी असल्याने हा टप्पा पहिल्या टप्प्यापेक्षा काही प्रमाणात सोपा आहे पण सुरक्षा यंत्रणा हवीच! हा टप्पा पार केल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. गडगड सांगवी गावातून गडमाथा गाठण्यास २ ते ३ तास लागतात. त्रिकोणी आकाराचा गडमाथा समुद्रसपाटीपासुन ३०३५ फुट उंचावर असुन पुर्वपश्चिम साधारण ६ एकरवर पसरलेला आहे. किल्ल्यावर वावर नसल्याने मोठया प्रमाणात गवत वाढलेले असुन या गवतातुन मार्ग काढत आपल्याला अवशेष शोधावे लागतात. पुढे येऊन डावीकडे वळल्यावर आपण किल्ल्याच्या उध्वस्त उत्तराभिमुख दरवाजात पोहोचतो. भवानी मंदिराकडून पाहीले असता हाच दरवाजा आपल्या नजरेस पडतो. दरवाजाची कमान पुर्णपणे नष्ट झाली असुन दरवाजाची दगडी चौकट तग धरून आजही आपले अस्तित्व सिद्ध करत आहे. दरवाजाच्या बाहेरील भागात देवळाकडे उतरणाऱ्या ५-६ पायऱ्या असुन आतील दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. दरवाजातुन आत शिरल्यावर डावीकडे असलेल्या कपारीत खडकात खोदलेले पाण्याचे कोरडे टाके पहायला मिळते. हे टाके पाहुन मूळ वाटेवर येऊन थोडे पुढे चालत गेल्यावर कातळात कोरलेल्या ५ टाक्यांचा समुह नजरेस पडतो. या टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्या कोरलेल्या आहेत. हे पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्यांच्या उजवीकडे खालील बाजुस डोंगर उतारावर अजून एक पाण्याने भरलेले कोरीव टाके आहे. टाक्याच्या समुहाकडून पुढे आल्यावर गवतात हरवलेले ७ वास्तुंचे अवशेष दिसतात. यातील दोन वास्तु मोठया तर इतर वास्तुचे लहान चौथरे आहेत. वास्तु अवशेष पाहुन गवतातुन वाट काढत पुढे आल्यावर आपण हिरव्यागार पाण्याने भरलेल्या चार टाक्यांच्या समुहाजवळ येतो. टाक्याच्या डाव्या बाजुने पुढे आल्यावर आपण गडाच्या अघोरी शिखराच्या दिशेने असलेल्या सोंडेवरील बुरुजावर पोहोचतो. या बुरुजावरून किल्ल्यावर येणारा मुळ मार्ग पुर्णपणे नजरेस पडतो. येथुन टाक्याकडे परत येत उजव्या बाजूने तटाला फेरी मारताना काही ठिकाणी तटबंदी नजरेस पडते तर एका ठिकाणी कातळात कोरलेले पण मातीने बुजलेले टाके नजरेस पडते. तटाला फेरी मारत दरवाजाकडे आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण गड फिरण्यास एक तास पुरेसा होतो. दरवाजातुन तीन-चार पायऱ्या उतरल्यावर ९० फुट रॅपलिंग करत आपण थेट मंदीराजवळ उतरतो. किल्ल्याचा आकार व त्याचे स्थान पहाता याचा उपयोग टेहळणीसाठी केला जात असावा. गडमाथ्यावरुन पुर्वेला डांग्या सुळका, अंजनेरी व वालदेवी धरण तर पश्चिमेला मुकणे धरण, पट्टा, औंढा, बीतनगड व कळसुबाई डोंगररांग दिसते. गडगडा किल्ला त्याच्या इतिहासाबाबत अबोल आहे. शिवाजी महाराजांच्या काळात १६७०- ७२ दरम्यान हा किल्ला स्वराज्यात दाखल झाला. छ ३ साबान (१८ जुलै १७४८) गडगडा किल्ला शंकराजी केशव सबनीस यांनी घेतल्याचें समजते पण कोणाकडुन ते मात्र कळत नाही. इ.स. १८१८ मध्ये कॅप्टन ब्रिग्सने हा किल्ला ताब्यात घेतला त्यावेळी गडाला दोन दरवाजे असल्याचा उल्लेख येतो.---------सुरेश निंबाळकर

गडगडा  उर्फ घरगड

जिल्हा - नाशिक
श्रेणी  -  अत्यंत कठीण 

दुर्गप्रकार- गिरीदुर्ग