प्राचीन काळापासून कोकणातील बंदरे व घाटावरील शहरे अनेक घाटमार्गांनी एकमेकांशी जोडली गेली आहेत. या बंदरात उतरणारा माल घाटमार्गाने देशावरील बाजारपेठेत पाठवला जात असे. यातील काही घाटमार्ग आज वापरात नसल्याने बंद झाले आहेत तर काही आजही चालू आहेत. यातील काही घाटमार्गांचे आज महामार्गात रुपांतर झाले असुन कोल्हापुर- सिंधुदूर्ग यांना जोडणारा फोंडाघाट अशाच प्राचीन घाटमार्गांपैकी एक घाटमार्ग. या घाटमार्गांच्या रक्षणासाठी शिवगड या किल्ल्याची निर्मीती केली गेली. आज पुर्णपणे विस्मृतीत गेलेला हा किल्ला दाजीपुर अभयारण्याचा एक भाग असुन वनखात्याच्या ताब्यात असल्याने वनखात्याचे प्रवेशशुल्क भरूनच किल्ल्यावर जाता येते. किल्ला वनखात्याच्या ताब्यात असल्याने काही महत्वाच्या गोष्टींची नोंद घ्यावी. पावसाळ्यात म्हणजे जून ते ऑक्टोबर दरम्यान दाजीपूर अभयारण्य बंद असते. अभयारण्यात सकाळी ९ ते दुपारी २.३० या वेळेतच प्रवेश दिला जातो पण फक्त किल्ला पहायचा असल्यास विनंती केल्यास ४ वाजेपर्यंत प्रवेश दिला जातो. अभयारण्याचे प्रवेशद्वार महामार्गापासुन आत जाणाऱ्या रस्त्यावर असुन प्रवेशशुल्क मात्र महामार्गावर असलेल्या अभयारण्याच्या कार्यालयात भरावे लागते. शिवगड किल्ल्यास भेट देण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कोल्हापूरहून ७२ कि.मी वर असलेले फोंडा घाटातील दाजीपूर अभयारण्याचे प्रवेशद्वार गाठावे लागते. अभयारण्याच्या प्रवेशद्वारापासुन शिवगड किल्ला कच्च्या रस्त्याने ४ कि.मी.अंतरावर असुन सोबत खाजगी वाहन असल्यास वाहन शुल्क भरून थेट किल्ल्यासमोर असलेल्या उगवाईच्या पठारावर जाता येते. अभयारण्याच्या कार्यालयाकडून महामार्ग सोडुन पक्क्या रस्त्याने आत शिरल्यावर साधारण १ कि.मी. अंतरावर एक कच्चा रस्ता डावीकडे वनखात्याच्या विश्रामगृहाकडे जातो. येथुन २ कि.मी.अंतरावर वनखात्याचे विश्रामगृह असुन विश्रामगृहाच्या उजवीकडील लोखंडी फाटक असलेला रस्ता अभयारण्यात जातो तर डावीकडील रस्त्याने अर्धा कि.मी.आत गेल्यावर उजवीकडील रस्ता गगनगिरी महाराजांच्या आश्रमाकडे व सरळ जाणारा रस्ता शिवगडासमोर असलेल्या उगवाईच्या पठारावर जातो. प्रवेशद्वारापासुन चालत आल्यास हे अंतर साधारण १ तासाचे आहे. पठारावरून शिवगडचे सुंदर दर्शन घडते. शिवगड किल्ला व उगवाईचे पठार एका दरीने एकमेकांपासुन वेगळे झाले असुन या दोघांमध्ये एक लहानशी टेकडी आहे. या दरीत उतरून डाव्या बाजुने टेकडीला वळसा घालत किल्ल्यावर जाणारी वाट आहे. या दरीत उतरून किल्ल्यावर जाण्यास १५ मिनिटे पुरेसी होतात. कोकणातील घोणसरी गावातुन गडावर येणारी वाट दरीतील खिंडीत आपल्या वाटेला मिळते. खिंडीत आपल्याला काही वास्तुअवशेष पहायला मिळतात. या ठिकाणी बहुदा गडाचे मेट असावे असे वाटते. येथुन सरळ वर चढत जाणारी वाट आपल्याला किल्ल्याच्या दरवाजात आणुन सोडते. पठाराकडून किल्ल्याकडे जाणारा हा मार्ग फारसा अडचणीचा नसल्याने या ठिकाणी प्रवेशमार्गावर तटबंदीबाहेर खंदक खोदण्यात आला आहे. या ठिकाणी तटबंदी थोडीफार ढासळल्याने खंदक काही प्रमाणात बुजलेला आहे. किल्ल्याचा दरवाजा उत्तराभिमुख असुन त्यासमोर आडवी भिंत घालुन रणमंडळाची रचना करण्यात आली आहे. तटबंदीचे बांधकाम ओबडधोबड दगडांनी केलेले असुन बांधकाम सांधण्यासाठी कोणतेही मिश्रण वापरलेले नाही. दरवाजा आज पुर्णपणे नष्ट झाला असुन त्याशेजारी असलेले दोन बुरुज व आतील दोन्ही बाजूस असलेल्या देवड्या मात्र शिल्लक आहेत. साधारण चौकोनी आकाराचा हा गड समुद्रसपाटीपासून २३४० फुट उंचीवर असुन अंदाजे ४.५ एकरवर पसरलेला आहे. दरवाजातून आत शिरल्यावर आपल्याला उजवीकडे वरील बाजूस किल्ल्याची दुसरी तटबंदी व त्यातील बुरुज दिसतात. किल्ला आकाराने लहान असला तरी त्याचा खालील भाग व वरील भाग अशी दोन भागात विभागणी करण्यात आली आहे. हि तटबंदी पार करून आत आल्यावर डावीकडे एका उध्वस्त वास्तुसमोर बांधलेली एक तटबंदीवजा आडवी भिंत पहायला मिळते तर तटबंदीच्या समोरील टोकावर किल्ल्याचा बुरुज दिसतो. या बुरुजाकडे जाताना वाटेत दगडी घुमटीत ठेवलेली एक सुंदर सतीशिळा पहायला मिळते. गडाची तटबंदी मोठ्या प्रमाणात ढासळलेली असुन तटबंदीच्या काठाने फिरताना या तटबंदीतील बुरुज पहायला मिळतात. उत्तरेकडील बुरुजाजवळ नव्याने उभारलेला ध्वजस्तंभ असुन त्यावर भगवा झेंडा फडकवला आहे. किल्ल्याच्या दक्षिण बुरुजाखाली असलेली डोंगरसोंड खाच मारून किल्ल्याच्या डोंगरापासून वेगळी करण्यात आली आहे. या सोंडेवरून कोणी वर येऊ नये यासाठी हा बुरुज बांधण्यात आला असावा. कोकणातील गडगेसखल गावातून येणारी वाट या सोंडेखालुन वर चढते व बुरुजावरून गडावर येते. गडावर मोठ्या प्रमाणात सपाटी असल्याने कोणत्याही बुरुजावर उभे राहिल्यास किल्ल्याचा आतील संपुर्ण भाग नजरेस पडतो. बालेकिल्ल्याच्या मध्यभागी वाड्याचे अवशेष असुन त्यासमोरचं आपण सुरवातीला पाहिलेली आडवी भिंत बांधलेली आहे. याशिवाय किल्ल्याच्या तटबंदी व बुरुजालागत बांधलेली ३-४ पाण्याची टाकी नजरेस पडतात. यातील कोणत्याही टाक्यात पाणी नसुन मोठ्या प्रमाणात माती साठलेली आहे. तटबंदीवरून फेरी मारताना कोकणचा खूप मोठा परिसर नजरेस पडतो. यात उत्तरेला कुर्ली धरण तर दक्षिणेला फोंडा गाव तर पूर्वेला दाजीपूरच्या जंगलात गगनगिरी महाराजांचा आश्रम दिसतो. आश्रमाचा हा परिसर झांजेचे पाणी म्हणुन ओळखला जातो. किल्ला फारसा मोठा नसल्याने अर्ध्या तासात संपुर्ण किल्ला पाहुन होतो. इतिहासाबद्दल अबोल असलेल्या या किल्ल्याचे उल्लेख येतात ते पेशवेकाळातच. किल्ल्याचे किल्ल्याचे एकुण बांधकाम पहाता हा किल्ला शिवकाळानंतरच घाईघाईने बांधण्यात आला असावा. करवीरकर छत्रपतींविरुध्द सतत कुरापती करणाऱ्या फोंड सावंतांनी जुन १७३२ मधे बोलवण -घोणसरीच्या डोंगरावर तटबंदी करण्याचे ठरविले. हि बातमी कळल्यावर छ्त्रपतीनी अमात्यांना पाठवुन घोणसरीचा डोंगर ताब्यात घेतला व त्यावर शिवगड बांधला. इ.स.१७३९ च्या एका पत्रानुसार शिवगडाच्या घाटात चौकीसाठी अमृतराव भगवंत प्रतिनीधी यांचे १५ लोक नेमण्यात आले. इ.स.१७४० मधे बळवंतगडाहून तानाजीराव खानविलकर चिमाजीअप्पाना लिहीतात बावडा, बळवंतगड, सिवगड तिनी जागे आपांचे पदरी घातले आहे, सिवगड तो सालपीच्या उरावर आहे. इ.स.१८०० मधील करवीर घराण्याच्या दफ्तरातील नोंदीनुसार सावंताच्या या भागातील कुरापती वाढल्याने शिवगडावर पहारे वाढवुन शेजारील घाटवाटांचा बंदोबस्त करण्यात आला. --------------सुरेश निंबाळकर

शिवगड

जिल्हा - कोल्हापुर

श्रेणी  -  मध्यम

दुर्गप्रकार- गिरीदुर्ग