कमळगड

जिल्हा - सातारा

श्रेणी  -  मध्यम

दुर्गप्रकार- गिरीदुर्ग

महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांचा इतिहास आज ज्ञात नसला तरी ते त्यांच्या अंगाखांदयावर बाळगुन असलेल्या वैशिष्टपूर्ण अवशेषांसाठी प्रसिध्द आहेत. वाई प्रांतात असलेली अशीच एक दुर्गजोडी म्हणजे कमळगड-केंजळगड. यातील केंजळगड किल्ला त्याच्या कड्यावर असलेल्या कातळकोरीव पायऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे तर कमळगड त्यावर असलेल्या कावेच्या विहीरीसाठी प्रसिद्ध आहे. दक्षिणेकडे कृष्णानदी तर उत्तरेकडे वाळकी नदी यांच्या मधील डोंगररांगेवर हा किल्ला उभा आहे. कमळगडला जाण्यासाठी परिसरातुन अनेक मार्ग असले तरी वासोळे येथील तुपेवाडीतून गडावर जाण्यासाठी सोयीचा मार्ग आहे. पुणे-वाई-वासोळे हे अंतर १२० कि.मी.असुन वाई ते वासोळे या ३० कि.मी.अंतराचा रस्ता अतिशय खराब आहे. त्याऐवजी पुणे-भोर-कोर्ले-रायरेश्वर-वासोळे या मार्गाचा वापर केल्यास रस्ता चांगला असुन हे अंतर फक्त १०० कि.मी.आहे. वासोळे गावामागील डोंगरावर असलेला किल्ल्याचा माथा दुरवरून दिसत असला तरी वासोळे गावात आल्यावर मात्र नजरेस पडत नाही. वासोळे गावात आल्यावर येथील तुपेवाडीत यावे. तुपेवाडीतुन एक कच्चा रस्ता शाळेशेजारून साधारण अर्धा कि.मी.आत डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या घरापर्यंत जातो. खाजगी वाहनाने आपल्याला थेट या पायथ्यापर्यंत जाता येते. येथे कमळगडची माहिती सांगणारा फलक लावलेला आहे. गडाच्या पायथ्याशी असलेल्या धनगरवाडयात तसेच गोरखनाथ मंदीरात गावकऱ्यांची ये-जा असल्याने गडावर जाणारी वाट चांगलीच मळलेली आहे शिवाय वाटेवर ठिकठिकाणी मार्गदर्शक बाण रंगवलेले आहे. गावकरी या डोंगरावर गुरे चरायला नेत असल्याने मुख्य वाटेला काही ढोरवाटा आहेत पण लक्षात ठेवायची खुण म्हणजे या वाटेवरून विजेचे खांब गेलेले आहे. विजेच्या तारांकडे लक्ष ठवत गेल्यास चुकण्याची शक्यता उरत नाही. हे खांब डोंगराच्या अर्ध्यापर्यंत गेले असुन पुढे मळलेली एकच ठळक वाट आहे. हि वाट पुर्णपणे चढणीची असुन दमछाक केल्याशिवाय रहात नाही. डोंगराच्या माथ्यावर आल्यावर येथुन डावीकडील सोंडेकडे वळायचे. या ठिकाणी वाट दर्शविणारा फलक लावलेला आहे. पायथ्यापासुन डोंगराच्या माथ्यावर येण्यासाठी एक तास लागतो व तेथुन १५ मिनिटात आपण घनदाट वृक्षांच्या सावलीत असलेल्या गोरखनाथाच्या मंदिरात पोहोचतो. गोरखनाथ मंदीर दोन भागात विभागलेले असुन एका भागात मंदीर तर दुसऱ्या भागात राहण्याची सोय आहे. मंदीरात नाथांच्या तीन मुर्ती असुन एक लाकडी मुर्ती आहे. मंदिराचे अंगण सारवलेले असुन वर पत्र्याचा निवारा उभारलेला आहे. मंदिरासमोरील उंबराच्या झाडाखाली काही कोरीव मुर्ती ठेवल्या आहेत. या मंदिरात व अंगणात १०-१२ जणांची राहण्याची सोय होते. मंदिरापुढुन डावीकडे किल्ल्यावर जाणारी वाट असुन या वाटेने ५-१० मिनिटे चालत गेल्यावर वाटेच्या डावीकडे एक पाण्याचे टाके लागते. या टाक्यात बारमाही वहाणाऱ्या झऱ्याचे पाणी असुन गडावर ये-जा करताना पाण्याची हि एकमेव सोय आहे. टाक्या पुढील घनदाट जंगलातील वाटेने १५ ते २० मिनिटात आपण कमळगडाखालील माचीवर पोहोचतो. येथुन प्रथमच घनदाट जंगलाने वेढलेल्या कमळगडचा माथा व त्यावर फडकणारा भगवा झेंडा नजरेस पडतो. माचीवर दोन घरांची धनगरवस्ती असुन येथे रहात असलेल्यानी सपाटीवरील जंगल साफ करून त्यावर शेती केलेली आहे. घरांच्या उजवीकडे गडावर जाणारी वाट असुन येथे गडाची माहीती सांगणारा फलक आहे.दाट जंगलातुन जाणारी हि वाट आपल्याला माथ्याखालील तटबंदीवर नेऊन सोडते. येथे राचीव दगडांची तटबंदी व कोपऱ्यावर एक बुरुज असुन तटबंदीवर चढुन आपला गडात प्रवेश होतो. तटावर उभे राहुन वर पाहिले असता गडाचे ढासळलेले कडे दिसुन येतात. या भागात दाट जंगल असल्याने गडाचा दरवाजा नेमका कुठे असावा याचा अंदाज घेता येत नाही. झाडीत लपलेली तटबंदी व अवशेष पहात आपण गडाच्या माथ्याखालील घळीत येती. गडाचा डोंगर जांभा दगडाचा असल्याने याची मोठया प्रमाणात झीज झाली आहे. घळीच्या सुरवातीस असलेल्या दोन तीन कोरीव पायऱ्या पहाता या ठिकाणी गडाचा दरवाजा व पुढे पायऱ्या असाव्यात. हा दरवाजा व पायऱ्या पुर्णपणे ढासळल्या असुन पायऱ्यांच्या ठिकाणी नव्याने लोखंडी शिडी बसवण्यात आली आहे. पुर्वी येथुन प्रस्तरारोहण करून वर जावे लागत असे. शिडीने वर आल्यावर ७-८ पायऱ्या चढुन आपला गडावर प्रवेश होतो. गडाचा माथा समुद्रसपाटी पासुन ३००० फुट उंचावर असुन पुर्वपश्चिम १ एकरवर पसरलेला आहे. गडाच्या काठावरून फेरी मारताना पुर्व बाजुला एका बुरुजाचे अवशेष व काही ठिकाणी तटबंदीचा पाया व तटबंदी पहायला मिळते. गडाच्या मध्यावर एक चौथरा असुन त्यावर नव्याने ध्वजस्तंभ उभारून भगवा फडकवलेला आहे. किल्ल्यावर असलेली दुसरी वास्तु म्हणजे गडावरची विहीर. गडाचे मुख्य आकर्षण असलेली आयताकृती आकाराची हि विहीर ८०-९० फुट खोल असुन विहिरीच्या तळात उतरण्यासाठी ६०-७० रुंद पायऱ्या खोदलेल्या आहेत. या पायऱ्या निसरड्या असल्याने पायऱ्याशेजारी आधारासाठी नव्याने लोखंडी दोर लावलेला आहे. गुहेच्या तळात दोन्ही बाजुस गुहेसारख्या खोल्या असुन तळात उजेड येण्यासाठी छतामध्ये झरोके ठेवले आहेत. पावसाळ्यात या विहिरीत पाणी साठुन नंतर ते झिरपत असल्याने जांभ्या दगडात असलेली हि विहीर आत लालसर व निसरडी झाली आहे. विहीरीतील वातावरण मात्र अतिशय थंड आहे. लाल ओलसर मातीमुळे हि विहीर गेरूची अथवा कावेची विहीर म्हणुन ओळखली जाते. गडाच्या माथ्यावर विहीर व ध्वजाखाली असलेला चौथरा वगळता इतर काहीही अवशेष दिसत नाही. गडफेरी सुरु होते केव्हा आणि संपते केव्हा हे कळत देखी नाही. १० मिनीटात आपला संपुर्ण गड फिरून होतो पण गडावरून दिसणारे निसर्गचित्र पाहता येथुन पाय निघत नाही. गडाभोवती घनदाट जंगल पसरलेले आहे. गडावरून केंजळगड त्यामागे रायरेश्वर पठार, कोळेश्वर पठार व पाचगणी तसेच पूर्वेला धोम धरण व दूरवर चंदन-वंदन, पाडंवगड, वॅराटगड असा दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. गडाचा आकार व स्थान पहाता याचा उपयोग केवळ टेहळणीसाठी केला जात असावा. पन्हाळ्याच्या भोज शिलाहारने या परिसरात जे किल्ले बांधले त्यात कमळगड असल्याचे मानले जाते. विजापूरच्या अंमलाखालील हा गड केंजळगड, पांडवगड, वैराटगड यांच्या बरोबर मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. शिवरायांनी सन १६७० पांड्वगड आणि एप्रिल १६७४ मधे केंजळगड घेतला यामध्ये सन १६७० ते १६७४ दरम्यान केव्हातरी कमळगड मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. एप्रिल १८१८मधे मेजर थॅचर याने फारशी लढाई न करताच कमळगड ताब्यात घेतला. ------------------सुरेश निंबाळकर