चंदन

सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागातील महादेव डोंगररांगा आणि त्यांचे फाटे बरेच मोठे आणि खडकाळ असून त्यात अनेक ठिकाणी काळ्या कातळातील उभे कडे निर्माण झाले आहेत. मुख्य महादेव डोंगररांगेपासून चंदन-वंदन, वर्धनगड आणि महिमानगड असे तीन फाटे दक्षिणेस गेलेले आहेत. त्यांपैकी चंदन-वंदन फाटा खंबाटकीच्या पूर्वेस हरळीपासून सुरू होऊन दक्षिणेस कृष्णा-वसना नद्यांच्या संगमापर्यंत पसरलेला आहे. या डोंगररांगेने कृष्णा व वसना या नद्यांची खोरी वेगळी झाली असून चंदन-वंदन हे दोन डोंगरी किल्ले या रांगेच्या साधारण मध्यावर आहेत. शिलाहार राजा दुसरा भोज याच्या कालखंडात इ.स. ११७८ ते ११९२ दरम्यान चंदन-वंदन दुर्ग बांधले गेले. साताऱ्याच्या अलिकडे एकाच डोंगरावर बांधलेले हे किल्ले केवळ एका खिंडीने वेगळे झाले असुन एखादया स्वतंत्र किल्ल्याला असावी अशी दुर्गरचना या किल्ल्यांना लाभली असल्याने यांना स्वतंत्र किल्लेच म्हणणे योग्य ठरेल.हे दोन्ही किल्ले वेगवेगळ्या तालुक्यात असुन चंदन किल्ला कोरेगाव तालुक्यातील बनवडी गावाच्या हद्दीत येतो. चंदन-वंदन या दोन्ही किल्ल्यांना एकत्र भेट दयायची असल्यास अथवा वंदन किल्ल्याकडून चंदन किल्ल्यावर यायचे असल्यास या किल्ल्यांच्या पायथ्याशी असलेले बेलमाची गाव सोयीचे ठरते पण या वाटेने चंदनवर जाताना घसारा असलेला उभा चढ चढावा लागतो. बेलमाची हे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गाव पुण्यापासुन भुईंज किकली मार्गे १०० कि.मी.अंतरावर असुन साताऱ्यापासून हे अंतर २० कि.मी.आहे. बेलमाची गावातील वरची बेलमाची वाडीतुन एक वाट गडावर जाते. वाटेच्या सुरवातीस असलेले पुरातन भैरव मंदीर व वाटेवरील बांधीव पायऱ्या पहाता हिच गडावर जाणारी मुख्य वाट असावी. झाडा-झुडपातुन जाणाऱ्या या वाटेने एक तासात आपण या दोन किल्ल्यांमधील खिंडीत पोहोचतो. इथुन उजवीकडे दिसणारा किल्ला म्हणजे वंदन तर डावीकडे दिसणारा किल्ला म्हणजे चंदन आहे. येथुन डावीकडे अर्ध्या तासाचा उभा चढ चढुन किंवा निमुळत्या वाटेने किल्ल्याला वळसा घालत तासाभरात आपण चंदन किल्ल्यावर पोहोचतो पण अशा वाटा चढण्याची सवय नसणाऱ्यासाठी बनवडी गावातील इब्राहीमपुरा येथुन गडावर जाणारी सोपी पायऱ्यांची वाट आहे. बेलमाची येथुन एक रस्ता वंदन किल्ल्याला वळसा घालत ९ कि.मी.अंतरावरील बनवडी गावातील इब्राहीमपुरा येथे जातो. गावात शिरताना वाटेवर एक मध्ययुगीन काळातील इदगाह दिसुन येतो. गावात मध्ययुगीन काळातील दगडी बांधकामातील कोरीव शिवमंदीर असुन या मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवलिंग जवळपास ६ महिने पाण्याखाली असते. गावात फेरी मारताना अनेक उध्वस्त अवशेष, विरगळ व शिल्प दिसुन येतात. किल्ला वनखात्याच्या ताब्यात असुन सध्या गडावर जाण्यासाठी पायऱ्या बांधण्याचे काम चालु आहे. गडावर जाणाऱ्या वाटेच्या सुरवातीस वनखात्याची चौकी असुन या वाटेवर वनखात्याने तीन ठिकाणी सिमेंटचे निवारे बांधले आहेत. हे तीन निवारे वगळता वाटेवर कुठेही सावली नसल्याने हि संपुर्ण वाट उन्हात पार करावी लागते. वाटेच्या सुरवातीला नव्याने बांधलेल्या पायऱ्या असुन नंतर गडाच्या मूळ पायऱ्या सुरु होतात. या वाटेवर एका ठिकाणी सपाटीवर उध्वस्त वास्तुचा चौथरा दिसुन येतो. हे बहुधा गडाचे या वाटेवरील मेट असावे. पायथ्यापासुन गडाच्या उध्वस्त दरवाजापर्यंत जाण्यासाठी साधारण तासाभराचा अवधी लागतो. दरवाजा पुढील भागात दोन ढासळलेले बुरुज पहायला मिळतात. अशी रचना दरवाजापुर्वी दोन ठिकाणी पहायला मिळते. किल्ल्याचा मूळ दरवाजा तुटल्याने नंतरच्या काळात दुसरा गोमुखी वळणदार दरवाजा बांधला गेला असावा पण कालांतराने हा दरवाजादेखील नष्ट झाला आहे. गडाचे उत्तराभिमुख मुख्य प्रवेशद्वार पुर्णपणे उध्वस्त झाले असुन त्याची अर्धवट कमान शिल्लक आहे. हि कमान खालील बाजुस मोठया प्रमाणात मातीत गाडली गेली असुन दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकऱ्याची देवडी आहे. दरवाजाच्या आतील भागात काही अंतरावर एका पडक्या वास्तुचे अवशेष असुन त्यावर एक कबर दिसुन येते. कबर ओलांडुन काही पायऱ्या चढुन वर आल्यावर वाटेच्या उजव्या बाजूस एक प्रचंड मोठे वडाचे झाड असुन स्थानिक लोक या झाडाला पाचवड म्हणुन ओळखतात. या झाडाच्या अलीकडे एक लहानसे दगडी बांधकामातील शिवमंदीर असुन या मंदिरात पंचलिंगी शिवपिंडी आहे. या मंदिराची बांधणी शिवकाळात झाल्याचे मानले जाते. मंदिर पाहुन पायऱ्यांनी गडमाथ्यावर प्रवेश करताना वाटेच्या दोन्ही बाजुस मोठमोठया गोलाकार शिळा एकमेकावर रचुन तयार केलेले दगडी स्तंभ पहायला मिळतात. या दोन दगडी स्तंभामधुन आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. गडाचा माथा म्हणजे प्रशस्त पठार असुन साधारण त्रिकोणी आकाराचे हे पठार पुर्वपश्चिम ३८ एकरमध्ये पसरले आहे. पठारावर चंदन गडाची उंची समुद्रसपाटीपासुन ३६९० फुट असुन इब्राहीमपुरा पायथ्यापासुन ९५० फुट आहे. गडाला चारही बाजुला नैसर्गिक कातळकडे असल्याने काही ठरावीक भागातच तटबंदी बांधलेली आहे. उंची व जागेच्या बाबतीत चंदननगड वंदनगडापेक्षा दुय्यम आहे. माथ्यावर प्रवेश केल्यावर उजव्या बाजूस ध्वजस्तंभाची जागा असुन समोरच दर्ग्याची इमारत पहायला मिळते. या दर्ग्याला मंदिराप्रमाणे प्राकाराची भिंत असुन या भिंतीच्या आतील बाजुस अजुन एक कबर पहायला मिळते. दर्ग्याच्या या आवारात प्रवेश करण्यासाठी उत्तरेला दरवाजा आहे. या दरवाजाबाहेर समोर अजुन एक कबर पहायला मिळते. दर्ग्याच्या मागील बाजुस भिंतीबाहेर पायऱ्यांची गोलाकार विहीर असुन या विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते पण हा पाणीसाठा पावसाळ्यानंतर फक्त मार्च महिन्यापर्यंतच असतो. विहिरीच्या उजव्या बाजूस काही अंतरावर पडझड झालेल्या एका मोठया वास्तुचे अवशेष दिसुन येतात. हि वास्तु म्हणजे किल्लेदाराचा वाडा अथवा गडाची सदर असावी. या वास्तुच्या मागील बाजूस अनेक लहानमोठे घरांचे अवशेष दिसुन येतात. या भागात पावसाळ्यातील पाणी साठविण्यासाठी बांधलेला पण सध्या कोरडा पडलेला एक तलाव दिसुन येतो. तलावाच्या उजव्या बाजुने जाणारी वाट आपल्याला झाडीझुडपातून गडाच्या उत्तर टोकावर घेऊन जाते. या वाटेवर एक समाधी चौथरा असुन या चौथऱ्याच्या वरील बाजूस शिवलिंग तर एका बाजुस मारूतीची मुर्ती कोरलेली आहे. गडाच्या उत्तर टोकावर भलामोठा बुरुज बांधुन हि बाजु संरक्षित करण्यात आली आहे. गडाच्या उत्तर टोकावरून कड्यावरील वाटेने दक्षिणेकडे आल्यावर आपल्याला या भागात चार दालने असलेली एक पडकी इमारत पहायला मिळते. या इमारतीच्या भिंतीवर चढले असता इमारतीतील तळघर व त्यात उतरण्यासाठी पायऱ्या दिसतात पण आत वाढलेल्या काटेरी झुडूपांमुळे तिथे जाणे शक्य होत नाही. काहींच्या मते हे धान्यकोठार तर काहींच्या मते हे दारुगोळा कोठार आहे. पण वाढलेल्या झाडीमुळे हि वास्तु नीटपणे पहाता येत नसल्याने अनुमान करणे कठीण आहे. हे कोठार पाहुन दर्ग्याकडे जाताना वाटेत एक मोठा नक्षीदार दगडी बांधकामातील चौथरा दिसुन येतो पण तो नेमक्या कोणत्या वास्तुचा असावा याचा अंदाज येत नाही. चौथरा पाहुन दर्ग्याकडे आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. अवशेष जास्त नसले तरी गडाचा घेरा मोठा असल्याने संपुर्ण गड फिरण्यास दोन तास लागतात. माथ्यावरून गडाचा संपुर्ण परीसर तसेच वैराटगड अजिंक्यतारा, कमळगड, केंजळगड, पांडवगड, कल्याणगड हे किल्ले व तिथपर्यंतचा प्रदेश नजरेस पडतो. गडावर रहायचे असल्यास दर्ग्यात ३० ते ४० जणांना रहाता येते. इ.स.११९१-११९२ सालच्या ताम्रपटानुसार शिलाहार राजा दुसरा भोज याने या किल्ल्यांची निर्मिती केली. इ.स.१३३७-३८ दरम्यान सातारा प्रांत बहमणी सुलतानांच्या राजवटीखाली आला. बहामनी सत्तेच्या अस्तानंतर सोळाव्या शतकात हा भाग विजापुरच्या आदिलशाही वर्चस्वाखाली आला. चंदन किल्ला जरी राजा भोजने बांधला असला तरी गडावरची बहुतेक बांधकामे ही आदिलशाही काळातील आहेत. १६५९मध्ये अफझलखान वधानंतर महाराजांनी आदिलशाही प्रांतात मुसंडी मारली व सातारचा किल्ला जिंकला. त्यानंतर अण्णाजी दत्तो यांनी चंदन-वंदन किल्ले स्वराज्यात सामील केले. संभाजी महाराजांच्या काळात इ.स.१६८५ मध्ये फेब्रुवारीत मुघल सरदार अमानुल्लाखान याने चंदन-वंदन येथे मराठ्यांवर केलेल्या हल्ल्यात २५ घोडी, २० बंदुका, २ निशाणे, १ नगारा ताब्यात घेतला. १६८९ पर्यंत मराठ्यांच्या ताब्यात असलेला हा परीसर नंतर मात्र मोगलांच्या ताब्यात गेला. राजाराम महाराजांच्या मृत्युनंतर मोगल-मराठे युद्धात २५ ऑगस्ट १७०१ ला मोगलांनी चंदन किल्ला घेतल्याची नोंद आढळते. छत्रपती शाहूमहाराजांनी सन १७०७ मध्ये हा प्रदेश जिंकून वंदनगड पुन्हा स्वराज्यात आणला. ताराराणीवर लक्ष ठेवण्यास बाळाजी विश्र्वनाथांनी या किल्ल्यावर दादोपंत यांची नेमणूक केल्याची नोंद आढळते. इ.स.१८१८ मध्ये इंग्रजांनी तोफांचा भडीमार करुन चंदन वंदन किल्ले जिंकले.--------------सुरेश निंबाळकर

जिल्हा - सातारा  
श्रेणी  -  मध्यम
दुर्गप्रकार- गिरीदुर्ग