जिल्हा - अकोला

श्रेणी  -  सोपी

दुर्गप्रकार- भुईकोट

महाराष्ट्रातील गडकोटांची भटकंती करताना अनेकदा वेगवेगळे अनुभव येतात. असाच अनुभव आम्हाला अकोट तालुक्यातील नरनाळा किल्ल्याची भटकंती करताना आला. नरनाळा किल्ल्यावर जाण्यासाठी बस स्थानकात उभे असताना आमचा भटक्यांचा वेश पाहुन एका स्थानिकाने आम्हाला अकोट येथील किल्ल्याबद्दल सांगितले व आमची पावले तेथे वळली. स्थानिकाने दिलेल्या माहितीनुसार आम्ही जुन्या अकोट शहरातील केशवराज वेताळ परिसरात दाखल झालो. येथे असलेल्या तहसील कार्यालय परिसरालाच कोट म्हणुन संबोधतात. पण या परीसराला कोट म्हणुन संबोधावे का हा देखील एक प्रश्नच आहे पण ब्रिटीश काळातील कागदपत्रात काही ठिकाणी याचा किल्ला म्हणुनच उल्लेख येतो. जुन्या अकोट शहरातील एका उंचवट्यावर इंग्रजकाळात सध्या तहसील कार्यालय असलेली वास्तु बांधली गेली. हि वास्तु म्हणजे अकोट शहरात येणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांचे विश्रामगृह होते. उंचवट्यावर असलेल्या या वास्तुच्या खालील बाजुस दगडी तटबंदी बांधली असुन या तटबंदीत साधारण २५ फुट उंचीचा नक्षीदार कमान असलेला विटांचा दरवाजा बांधला आहे. हा दरवाजा उंचवट्याच्या वरील बाजुस असुन या दरवाजाने आत येण्यासाठी १५-२० पायऱ्या चढुन जावे लागते. सध्या तहसील कार्यालय म्हणुन अस्तित्वात असलेली हि वास्तु मूळ ब्रिटीशकालीन आहे. हि वास्तु उंचवट्यावर असल्याने येथुन जुने अकोट शहर व दुरवरचा प्रदेश नजरेस पडतो. अकोट शहर हे तीन गावांचे बनले असुन कधीकाळी या शहराला मातीची तटबंदी व या तटबंदीत सहा दरवाजे असल्याचे वाचनात येते.-------------सुरेश निंबाळकर

DIRECTION

अकोट