मिरज

जिल्हा - सांगली

श्रेणी  -  सोपी

दुर्गप्रकार- भुईकोट

दक्षिण महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मिरज हे एक महत्वाचे शहर आहे. मिरज हे एक महत्वाचे रेल्वे स्थानक असुन देशातील अनेक शहरांशी ते रेल्वेमार्गाने तसेच महामार्गाने जोडले गेले आहे. या शहरात असलेला मिरजेचा किल्ला इतिहासात एक महत्वाचे ठाणे होते. इतिहासात हा किल्ला व त्याच्या परिसरात अनेक लढाया लढल्या गेल्याच्या नोंदी आढळतात. पण काळाच्या ओघात व वाढत्या शहरीकरणामुळे हा किल्ला त्याचे अस्तित्वच हरवुन बसला आहे. राखेच्या ढिगाऱ्यात ज्या प्रमाणे अस्थी शोधाव्या लागतात त्याप्रमाणे मिरज शहरातील किल्ला भागात या किल्ल्याचे अवशेष शोधावे लागतात. जुन्या वर्णना प्रमाणे संपुर्ण किल्ल्याभोवती खोल खंदक होता व किल्ल्याच्या तटबंदीत अनेक बुरूज होते. किल्ल्याला दक्षिण दिशेला आणि उत्तर दिशेला मुख्य दरवाजे होते. यातील कोटाचा उत्तरेकडील दरवाजा काही वर्षापुर्वीपर्यंत शिल्लक होता पण रस्त्याचे रुंदीकरण करताना नगरपालिकेने तो पाडला. मिरज शहरात आज किल्ला नावाचा भाग आहे त्या ठिकाणी या भुईकोटाचे अवशेष व खंदक पहायला मिळतो. आज अस्तित्वात असलेला मिरजेचा किल्ला म्हणजे केवळ एक बांधीव गोलाकार बुरुज, त्याशेजारी काही प्रमाणात शिल्लक असलेली तटबंदी व या बुरुजाबाहेर असलेला किल्ल्याचा खंदक. मिरज येथे भुईकोट होता हे दर्शविणारे आज इतकेच अवशेष शिल्लक आहेत. याशिवाय किल्ला भागात पेशवेकाळात पटवर्धनांनी बांधलेले श्रीकृष्ण मंदीर व नृसिंह मंदिर पहायला मिळते. मिरजेचा भुईकोट नक्की कोणी बांधला हे माहित नसले तरी मिरजेचे उल्लेख इ.स. दहाव्या शतकापासून येतात. कोल्हापूरच्या शिलाहार घराण्याचा राजा जटिंगा व त्याचा मुलगा मारसिंह (१०००-१०७५) याच्या ताब्यात कऱ्हाड, मिरज व कोकण परिसर होता. परंतु १०३७ च्या हुसुर येथील शिलालेखाप्रमाणे चालुक्य राजा जयसिंह याने जटिंगाचा पराभव करत शिलाहारांच्या पन्हाळा राजधानीचा ताबा घेतला. पुढे १२१६ मधे मिरज यादवांच्या ताब्यात गेले. इ.स. १३१८ मध्ये मिरजेचा किल्ला बहामनी राज्यात गेला. १३४७ मधे मिरजेजवळच्या गानगी गावातील शेख मुहम्मद जुनैदी याने सैन्य उभारुन मिरजेची राणी दुर्गावती हिला पराभुत करुन मिरजेच्या किल्ल्याचा ताबा घेतला. शेख मुहम्मद याने शहराचे नाव बदलून मुबारकाबाद ठेवले. इ.स. १४९० मधे बहामनी साम्राज्य लयास गेले व मिरजेवर आदिलशाही अंमल सुरु झाला. इब्राहिम आदिलशहाच्या काळात अली आदिलशहाला येथे नजरकैदेत ठेवण्यात आले होते. १६५९च्या नोव्हेंबर महिन्यात अफजखान वधानंतर महाराजांच्या फौजा अदिलशाही प्रदेशात घुसल्या. त्यांनी वाईपासून दक्षिण महाराष्ट्रातील अनेक गावे जिंकत कर्नाटक सीमेलगत असलेल्या मिरजेतील भुईकोट किल्ल्यावर धडकल्या. किल्ल्यातील सैन्याने विरोध केल्याने महाराजांनी किल्ल्याला वेढा घातला पण किल्ला ताब्यात येईना. याचवेळी अदिलशाहाने सिद्दी जौहारबरोबर मोठी फौज देऊन पाठविल्याची बातमी महाराजांना लागली. त्यामुळे त्यांनी मिरजेचा वेढा उठवून पन्हाळगडाकडे कूच केले. पुढे संभाजीराजांच्या काळात संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी त्यांच्या कुटूंबाला मिरजेच्या किल्ल्यात सुरक्षिततेसाठी ठेवले होते. १६८७ मध्ये विजापूरच्या पराभवानंतर मिरज मुघलांच्या ताब्यात गेले व त्यानंतर ३ ऑक्टोबर १७३९ रोजी शाहु यांनी तब्बल दोन वर्ष वेढा देउन मिरज ताब्यात घेतले. इ.स १७६१ मध्ये थोरल्या माधवराव पेशव्यांनी गोविंदराव पटवर्धन यांनी कर्नाटकांत महत्त्वाची कामगीरी पार पाडल्याने माधवराव पेशव्यांनीं मिरजेचा किल्ला व आसपासचा प्रांत गोविंदराव व त्याचे पुतणे परशुरामभाऊ आणि नीळकंठ त्र्यंबक या तिघांच्या नांवें ८ हजार स्वार ठेवण्यासाठीं २५ लाखांचा प्रांत सरंजाम म्हणून दिला. परशुराम पटवर्धनांच्या मृत्यूनंतर १८०८ मध्ये कुटुंबात झालेल्या वाटण्यांत मिरज सांगलीपासून वेगळे गंगाधरराव पटवर्धन यांच्याकडे आले.--------सुरेश निंबाळकर