हलशी

जिल्हा - बेळगाव

श्रेणी  -  सोपी

प्रकार- विष्णु व शिवमंदिर

बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात हलशी गाव आहे. कदंब राजवंशातील राजा रविवर्मन याची एकेकाळी राजधानी असलेले हे शहर आज येथे असलेल्या अनेक प्राचीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात असलेला हे गाव बेळगावहुन ४० कि.मी.वर तर खानापुर या तालुक्याच्या शहरापासुन नंदगड मार्गे १५ कि.मी.अंतरावर आहे. हलशी गावात असलेली प्राचीन मंदीरे व जवळच असलेला नंदगड किल्ला एका दिवसात सहजपणे पाहुन होतो पण त्यासाठी सोबत खाजगी वाहन असणे गरजेचे आहे. नंदगड ते हलशी हे अंतर फक्त ६ कि.मी. असले तरी या भागात वाहनाची सोय नाही. हलशी गावात १२ व्या शतकातील भुवराह, रामेश्वर, गोकर्णेश्वर, सुवर्णेश्वर, लक्ष्मी-नृसिंह, गणपती यांची प्राचीन मंदीरे असुन एक प्राचीन जैन मंदीर आहे. पण या सर्व मंदिरात उजवे ठरते ते नृसिंह-वराह मंदिर. या मंदिरात नृसिंह, वराह नारायण, सूर्य, विष्णु यांच्या प्राचीन मुर्ती आहेत. या मंदिराच्या आत दोन गर्भगृह समोरासमोर असुन मध्यभागी एक विशाल कासव आहे. एका गाभाऱ्यात विष्णुची मुर्ती असुन समोरील गाभाऱ्यात वराह अवतारातील विष्णूची अतिशय सुंदर मूर्ती आहे. स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ठ नमुना असलेली हि सर्व मंदीरे पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहेत. या भागात आल्यावर या गावाला अवश्य भेट दयायला हवी. इसवी सनाच्या सुरुवातीच्या काळात आजच्या कोल्हापुरावर शातकर्णी किंवा आंध्रभृत्या राजा यांचे राज्य असावे. आंध्रभृत्या राजाकडून कदंब राजा रविवर्मन याने हा प्रदेश जिंकून घेतला व हलशी हे राजधानीचे शहर केले. हलशी येथे गोव्याचा राजा जयकेशी याच शिलालेख सापडलेला हा शिलालेख कित्तुर किल्ल्यातील संग्रहालयात पहायला मिळतो. या हलशी कदंबांची एक शाखा गोव्यात चंद्रपूर (चांदोर) येथे राज्य करत होती. -------------सुरेश निंबाळकर